अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी… (How To Avoid Acid...

अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी… (How To Avoid Acidity)

अ‍ॅसिडिटी झाली आहे, ही तक्रार हल्ली सर्रास ऐकायला मिळते. आधुनिक जीवनशैलीचा ती एक भागच झाली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. असं असलं तरी, ही अ‍ॅसिडिटी टाळता येते. त्यासाठी-
‘अ‍ॅसिडिटी’ हा शब्द सर्रास वापरात असला, तरी अ‍ॅसिडिटी होणं म्हणजे नक्की काय, हेच बहुतेकांना माहीत नसतं. तर… आपल्या पोटात, म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो अ‍ॅसिडिक, म्हणजेच आम्लयुक्त असतो. आपण सेवन केलेल्या अन्नाच्या पचनासाठी हा पाचक रस अत्यंत गरजेचा असतो, हे खरं असलं तरी त्याचं प्रमाण योग्य असावं लागतं. हा पाचक रस जास्त प्रमाणात किंवा जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त, अर्थात अवेळी निर्माण झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. पोटाच्या वरच्या भागात किंवा छातीत जळजळ होणं, ढेकरांबरोबर आंबट द्रव किंवा अन्नाचे कण तोंडात येणं, पोट फुगणं, घशात जळजळणं अशी लक्षणं दिसू लागतात. यालाच आपण ‘अ‍ॅसिडिटी’ असं म्हणतो. तर अशी ही अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून, काय टाळावं आणि काय करावं हे जाणून घेऊ.

हे टाळा
– भराभर जेवणं.
– अवेळी खाणं.
– मसालेदार, तेलकट पदार्थ खाणं.
– रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाणं.
– शीतपेयं, कॉफी, चॉकलेट इत्यादी.
– फास्ट फूड.
– उपाशी पोटी किंवा अति प्रमाणात चहा, कॉफी इत्यादी पेय पिणं.
– रात्रीच्या वेळी मसालेदार किंवा तेलकट खाणं.
– शिळं अन्न खाणं.
– भरपूर खाणं.
– अधिक काळ उपाशी राहणं.
– भरपेट जेवून तत्काळ झोपणं.
– सतत आणि अति काळजी करणं.
– जागरण करणं.
– धूम्रपान आणि मद्यपान करणं.
– अधिक काळ वेदनाशामक औषधं घेणं.

हे करा
– ताजा आणि पौष्टिक आहार घ्या.
– जेवणात भरपूर फळं, भाज्या, तसंच कडधान्यांचा समावेश करा.
– जेवणाच्या वेळा ठरवा.
– दर दोन तासांनी थोडं थोडं खा.
– भुकेपेक्षा दोन घास कमी खा.
– दिवसभरात भरपूर पाणी प्या.
– पुरेशी झोप घ्या.
– नियमितपणे व्यायाम करा.

अ‍ॅसिडिटीचा त्रास अधिक काळ राहिल्यास, पित्ताशयातील पिशवीत पित्ताचे खडे तयार होण्याची शक्यता असते. तेव्हा अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून दक्ष राहणं आणि झाल्यास त्यावर तज्ज्ञांच्या साहाय्याने योग्य उपचार करणं महत्त्वाचं ठरतं.