झोप आणि हृदय यांच्यावर चंद्राचा प्रभाव (How The...

झोप आणि हृदय यांच्यावर चंद्राचा प्रभाव (How The Moon Rays Affect On Your Sleep And Heart Beats)

चंद्रावर जेवढी संशोधने झालीत, त्यातील अधिकांश संशोधनातून असे निष्कर्ष निघाले आहेत की, चंद्र आपल्या आरोग्याला जास्त प्रभावित करतो. आपल्या हृदयाशी देखील चंद्राचा जवळचा संबंध आहे. यासंबंधी संशोधनातून आश्चर्यकारक बाब अशी समोर आली आहे की, पौर्णिमा व अमावस्येला आपल्या हृदयाचं कार्य, नेहमीपेक्षा चांगलं चालतं. तसेच एरव्ही गाढ झोपी जाणारे लोक पौर्णिमेच्या रात्री शांतपणे झोपू शकत नाहीत.


चंद्रावर मानव उतरला, त्याला बरीच वर्षे झाली. चंद्रावर यान पाठवून देशोदेशीचे संशोधन चालूच आहे. आपल्याला सर्वात जवळचा आणि शीतल प्रकाश देणारा चांदोबा साहित्य, संगीत आणि संशोधन याद्वारे घराघरात पोहचला आहे. चंद्रावर जेवढी संशोधने झालीत, त्यातील अधिकांश संशोधनातून असे निष्कर्ष निघाले आहेत की, तो आपल्या आरोग्याला जास्त करून प्रभावित करतो.
आपण सगळेच जाणतो की पौर्णिमेच्या रात्री समुद्राला भरती असते. चंद्रावरील वातावरणाचा दर्यासागरातील पाण्यावर एवढा परिणाम होतो.
त्यामुळेच आपल्या लक्षात येईल की, पौर्णिमा आणि अमावस्येला पृथ्वीवरील हवेच्या दाबावर परिणाम होतो आणि वातावरणात बदल होतो.
वातावरणात जर बदल होतो, तर त्या वातावरणात राहणार्‍या आपल्या मानवी शरीरावर चंद्राचा प्रभाव होत असणार, हे उघड आहे. आपल्या शरीराचे हार्मोन्स आणि विचारशक्ती या दिवशी प्रभावित होतात.


वरील सर्व गोष्टींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. तो कसा काय? याबाबत शास्त्रीय आधार काय आहे नि संशोधनातून काय निष्पन्न झालं आहे, हे पाहूया.
स्वित्झर्लंडच्या बेसिल युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनातून हे उघड झालं आहे की, पौर्णिमेच्या रात्री अधिकांश लोकांची झोपमोड होते. एरव्ही गाढ झोपी जाणारे लोक पौर्णिमेच्या रात्री शांतपणे झोपू शकत नाहीत.
याचं कारण त्यांनी असं दिलं आहे की, या काळात शरीरातील मेलाटोनिन हार्मोन्स कमी होतात. जे झोपणे व उठणे यांचा क्रम संचालित व संतुलित करतात. हे संतुलन कमी झाल्याने झोप नीट लागत नाही.
आपल्या हृदयाशी देखील चंद्राचा जवळचा संबंध आहे. परदेशात व आपल्या देशात चांदोबा आणि आपल्या हृदयाच्या आरोग्याबाबत बर्‍यापैकी संशोधने झाली आहेत. त्यातून आश्चर्यकारक बाब अशी समोर आली आहे की, पौर्णिमा व अमावस्येला आपल्या हृदयाचं कार्य, नेहमीपेक्षा चांगलं चालतं.
या संशोधनांनी हेही सिद्ध केलं आहे की, आपल्या मूडचे चढउतार आणि मानसिक समस्या पौर्णिमेच्या दिवशी वाढतात. चंद्राच्या गुरुत्त्वाकर्षणाचा मानवी मेंदुतील द्रवावर प्रभाव पडतो आणि माणसाचे मन हिंदोळे खाते. त्यामुळे आपल्याकडे कित्येक लोकांचे असे अनुभव आहेत की, वेडसर माणसाला पौर्णिमेच्या दिवशी वेडाचे झटके जास्त येतात.
पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाण्याचे प्रमाण अधिक आहे. अन् आपल्या शरीरातही पाण्याचे प्रमाण 70 टक्के आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे समुद्र खवळतो, त्याप्रमाणे आपल्या शरीरातील पाणी अथवा पित्त खवळते, अन् त्याचा प्रभाव आरोग्यावर दिसून येतो.