ताणतणावामुळे तुमचे कामजीवन धोक्यात आलं असेल, तर...

ताणतणावामुळे तुमचे कामजीवन धोक्यात आलं असेल, तर कसे सावराल? (How Stress Can Affect Your Sex Life?)

घाईगर्दीची आणि स्पर्धात्मक जीवनशैली यामुळे जीवनात ताणतणाव वाढले आहेत. पती-पत्नी जर दोघेही नोकरीधंदा करणारे असतील, तर हा प्रभाव त्यांच्यावर जास्त प्रमाणात दिसून येतो. घरातील व ऑफिसातील जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन यामुळे त्यांना संसार करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्याच्याने ताणतणाव वाढतात. पुष्कळ लोकांमध्ये नैराश्याची भावना बळावल्याचे दिसून येते. या दडपणांनी जोडप्यांच्या कामजीवनावर विपरीत परिणाम दिसून येतो. लैंगिक सुख मनासारखं मिळालं नाही तर मनाने व शरीराने दुरावा निर्माण होतो. तेव्हा हे टाळण्यासाठी आपली दिनचर्या कितीही व्यस्त असली तरी कामसुखास वंचित राहू नये. आपले सेक्स लाईफ रिचार्ज करणे गरजेचे ठरते. अन्यथा आरोग्य आणि नाते दोघांवरही विपरीत परिणाम दिसून येईल.

तणावाचा कामजीवनावर होणारा परिणाम

ताणतणावामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य तर बिघडतेच. पण कामजीवनावर देखील परिणाम दिसून येतो.

पाहूया कसं ते –

जोम गमावतो

तणाव जर वाढला तर शरीरातील जोम, उत्साह कमी होतो. त्यामुळे सेक्स करण्याची इच्छा होत नाही. त्यात पुन्हा पती-पत्नी, असे दोघेही जर नोकरीधंदा करणारे असतील तर, त्यांच्याकडे सेक्ससाठी वेळ उरत नाही अन्‌ जोमही राहत नाही. परिणामी त्यांच्यात दुरावा वाढतो.

व्यसनाधीनता

काही लोकांचा असा अपसमज असतो की, सिगारेट अथवा दारू पिण्याने तणाव कमी होतो. अन्‌ तणाव सहन करण्याची शक्ती अंगी येते. पण हे साफ खोटं आहे. कारण सिगारेट, दारू अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या नशेमुळे शरीर कमजोर होते. अन्‌ हे कमजोर शरीर कामजीवनात उपयुक्त ठरत नाही.

दुरावा

पती अथवा पत्नी यापैकी कोणीही एकजण जर तणावाखाली राहिला, अन्‌ तो प्रकट केला नाही तर, त्याच्याबद्दल जोडीदाराच्या मनात संशय निर्माण होतो. अन्‌ कामोत्तेजना कमी होऊ लागते.

नपुंसकत्त्व

तणावामुळे नपुंसकत्त्व येऊ शकतं. हे स्त्री अथवा पुरुष, असं कोणामध्येही येऊ शकतं. शारीरिक दोष असल्यास नपुंसकत्त्व येतं, हा भाग सोडला तरी सेक्समधील असमाधान वाढले तरी ते येऊ शकतं.

बेडौल शरीर

तणावामुळे शरीराला लठ्ठपणा येतो. अन्‌ शरीर बेडौल होतं. अशा बेडौल शरीराने आत्मविश्वास कमी होऊ लागतो. अन्‌ आपल्याला वाटतं की, जोडीदार पहिल्यासारखं प्रेम करत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.

तणावाची कारणे काय?

शरीरातील हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होणं, मासिक पाळीच्या दरम्यान टेन्शन येणं, शारीरिक आजार, कामकाजातील स्पर्धा, लक्ष्य गाठण्याची कसोटी, मुलांचे अभ्यास व आजारपण इत्यादी गोष्टींनी तणाव येऊन कामजीवन धोक्यात येतं.

तणावमुक्त कसे व्हाल?

आपल्या बेडरूमपासून तणाव लांब ठेवा. त्यासाठी एकमेकांसाठी वेळ काढा. आणि या गोष्टींकडे लक्ष द्या.

टाइम मॅनेजमेन्ट

ऑफिसच्या वेळेनंतर उशीरापर्यंत काम केल्याने दांपत्याला थकवा येतो, तणाव निर्माण होतो. परिणामी कामेच्छा मंद होत जाते. एकमेकांसाठी वेळ देता न आल्याने नात्यामध्ये तणाव येतो. तुम्ही जर याच अवस्थेमधून जात असाल तर वेळीच सावध व्हा, अन्‌ आपल्या कामजीवनाकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या जोडीदारासाठी वेळात वेळ काढा आणि त्याच्या सहवासात राहा. थकव्यामुळे रात्री शक्य झालं नाही तर सकाळी कामसुख घ्या. तेव्हा तुम्ही ताजेतवाने असता. किंवा न चुकता वीकएन्डला कामसुख घेऊन आपल्या जीवनातील रोमान्स टिकवू शकता.

परस्पर सामंजस्य

आपली कामेच्छा पूर्ण करण्यासाठी जोडीदारावर अजिबात जबरदस्ती करू नका. तो तणावग्रस्त असेल, तर त्याची कारणे जाणून घ्या. तो निवळण्यासाठी तुमची मदत हवी असेल, तर जरूर करा. त्याचबरोबर बेडरूममध्ये रोमॅन्टिक वातावरण तयार करा. जोडीदाराशी प्रेमाच्या गप्पा मारा. सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी जागवा. आणि हळूहळू प्रणयचेष्टा करत जोडीदारला उत्तेजित करा.

पसंती-नापसंतीकडे लक्ष द्या

कामसुख घेताना आपली क्रीडा जोडीदारास उत्तेजित करेल का? असा विचार मनात आणू नका. काम करत राहा. असे किंवा अन्य विचार करून आपल्याला मिळालेले एकांतवासाचे हे क्षण वाया घालवू नका. जोडीदाराला संतुष्ट करण्यासाठी त्याच्या पसंती किंवा नापसंतीकडे लक्ष द्या.