शमशेरामध्ये रणबीरला कसा मिळाला डबल रोल, अभिनेत्...

शमशेरामध्ये रणबीरला कसा मिळाला डबल रोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा (How Ranbir Kapoor Got A Double Role In Shamshera, The Actor Narrated An Interesting Anecote)

२२ जुलैला रणबीर कपूरचा शमशेरा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला तर काहीजण त्यातील उणीवा शोधून काढत आहेत. ट्रेलर पाहून लोकांनी चित्रपटात पुढे काय होणार याचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. ट्रेलर लॉन्चिंग वेळी रणबीरने त्याला या चित्रपटात रोल कसा मिळाला व त्याचे पात्र कोणते असणार याबद्दल सांगितले.

रणबीरला तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहायला मिळणार आहे. रणबीर या वर्षी शमशेरा आणि ब्रम्हास्त्र या २ बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. पण कोणता चित्रपट सुपरहिट ठरेल हे वेळ आल्यावरच कळेल.

शमशेरामध्ये रणबीर डबल रोल मध्ये दिसणार आहे. ट्रेलर लॉन्चिंग वेळी रणबीरने सांगितले की, चित्रपटात वडीलांचे नाव शमशेरा आहे तर मुलाचे नाव बिल्ली असे आहे. रणबीरने पुढे सांगितले की,  सुरुवातीला डबल रोल विषयी काहीच माहित नव्हते. जेव्हा त्याला या चित्रपटाची कथा ऐकवण्यात आली त्यावेळी त्याला डबल रोल ऑफर केला नव्हता. पण चित्रपटाची संपूर्ण कथा ऐकल्यावर मी स्वत:च आदित्य चोप्रा आणि करण मल्होत्राला सांगितले की वडीलांचा रोल पण मीच करतो कारण ती भूमिका खरंच खूप छान आहे.

वडीलांचे पात्र खूपच वेगळे असल्याने माझ्यासाठी ते खास होते. त्यासाठी मी करण आणि आदित्यला समजावले. करणने काही लूक टेस्ट घेतल्या त्यानंतर तो त्यासाठी तयार झाला. सुरुवातीला ही भूमिका मला मिळाली नव्हती पण एक कलाकार असल्याच्या नात्याने ती भूमिका मला करायचीच होती. माझ्या सारख्या अभिनेत्यासाठी ही दोन्ही पात्र साकारणे व त्यांचे वेगळेपण जपणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. पण ते करायला खूप मजा आली.