शुक्राणू किती काळ जिवंत राहू शकतात? ( How Long ...

शुक्राणू किती काळ जिवंत राहू शकतात? ( How Long does Sperms Survive)

बाळंतपण हा बाईचा दुसरा जन्म असतो असं म्हणतात. त्याची सुरुवात गर्भधारणेपासूनच होते. कारण गर्भधारणा ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. काही स्त्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय गर्भवती राहतात, तर काही स्त्रियांना महिनोन महिने आपल्या ओव्हुलेशन पिरियेडवर नजर ठेवावी लागते. परंतु गर्भधारणेसाठी केवळ स्त्रियांचं शरीर कारणीभूत नसून पुरुषांच्या शुक्राणूचाही त्यात सहभाग असतो. पुरुषातील शुक्राणू स्त्रीच्या शरीरात किती काळ जिवंत राहू शकतात यामुळेही गर्भधारणेवर फरक पडत असतो. शुक्राणूंचा प्रवास आणि त्यांचं आयुष्य याबद्दल मोनिका अग्रवाल यांनी दिलेली विस्तृत माहिती  लक्षात घेण्याजोगी आहे.

असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला १००० पुरुष बीजं तयार होतात. आणि त्यातलं एकच गर्भधारणेसाठी पुरेसं असतं!  लैंगिक संबंधा दरम्यान पुरुषांच्या वीर्यातून लाखो-करोडो शुक्राणू (पुरुष बीजं) बाहेर येत असतात परंतु, त्यातील अगदी एक-दोन शुक्राणूच असे असतात की जे स्त्री बीजामध्ये शिरतात आणि फलित गर्भ तयार होतो. बहुतांशी लोकांना शुक्राणूंबद्दल अत्यल्प माहिती असते. परंतु शुक्राणूशी निगडित अशा अनेक गोष्टी असतात की ज्याची माहिती प्रत्येक स्त्री-पुरुषास असणे आवश्यक आहे.

स्त्रीच्या शरीराच्या आत –
बहुतेक स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय, बीजवाहिन्या आणि बीजकोष असतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बीजकोषामध्ये अनेक स्त्री बीजं असतात.  वयात येण्याच्या काळात बीजकोषातली बीजं परिपक्व किंवा तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला ओव्हुलेशन म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मीलन होऊन गर्भधारणा होऊ शकते.  मात्र पुरुष बीज न आल्यास हे बीज तिथेच विरघळून जाते.

ओव्हुलेशनच्या दरम्यान हे बीज फक्त ३-५ दिवसच जिवंत राहू शकते.

अमेरिकन प्रेग्नेंसी असोसिएशनचे असे म्हणणे आहे की, शुक्राणूंस जर अनुकूल परिस्थिती मिळाली तर ते अधिक काळ जिवंत राहू शकतात. त्यासाठी ती जागा उष्ण आणि आर्द्र असावी लागते. ओव्हूलेशनच्या काळात शरीरातील तापमान वाढते. हार्मोन्समध्ये बदल होत असतात. या काळात स्त्री योनी आणि गर्भाशय हे उष्ण आणि आर्द्र असते, त्यामुळे त्या दरम्यान स्त्रियांच्या शरीरात शुक्राणू अधिक काळ जिवंत राहतात. यात सर्विकल फ्लूइड कमी झालं तर शुक्राणू लवकर नष्ट होतात.

शरीराच्या बाहेर –
मानवी शरीर हे उष्ण आणि आर्द्र असते, त्यामुळे अधिक काळ तेथे शुक्राणू जिवंत राहतात. परंतु कपडे आणि इतर ठिकाणांचा विचार केला तर तेथे शुक्राणूंचं आयुष्य अतिशय कमी असतं. शरीराबाहेर शुक्राणू काही मिनिटं किंवा जास्तीत जास्त एक-दोन तासच जिवंत राहू शकतात. वीर्य सुकलं की तेथे शुक्राणू जिवंत राहू शकत नाहीत.

हे जाणून घ्या
शुक्राणूंची संख्याः एका स्खलनात अंदाजे २८० मिलियन इतके शुक्राणू असतात.

शुक्राणूंची संख्या आणि प्रजननक्षमताः पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या १० मिलियनपेक्षा कमी झाल्यास , प्रजननक्षमता कमी होते. नॅशनल इंफर्टिलिटी असोसिएशनने सांगितल्याप्रमाणे शुक्राणूंची संख्या ४० मिलियन आणि ३०० मिलियन यांच्या दरम्यान असल्यास पुरुष सामान्य श्रेणीमध्ये येतो.

शुक्राणू तयार होण्यासाठी लागणारा काळः पुरुषांच्या बीजकोषामध्ये दररोज शुक्राणू तयार होत असतात. परंतु प्रत्येक शुक्राणूस परिपक्व आणि प्रजननासाठी पूर्णपणे तयार होण्यासाठी जवळपास ४६ ते ७२ दिवसांचा कालावधी लागतो.

सक्षम शुक्राणू पुरुषाच्या बीजकोषातून बाहेर पडणारे सर्वच शुक्राणू हे पूर्णतः निरोगी नसतात, त्यातील ९० टक्के शुक्राणू हे नष्ट होतात. याचा अर्थ त्या पुरुषामध्ये काही कमतरता आहे असा होत नाही. ही सामान्य बाब आहे. ज्यावेळेस शुक्राणू बीजाच्या दिशेने जात असतात, तेव्हा वेगाने पुढे सरकणाऱ्या शुक्राणूंमध्ये काही मागेच राहतात आणि त्यातील जे अधिक सक्षम असतात तेच पुढे बीजापर्यंत पोहोचू शकतात.