गर्भारपणात प्रवास करणे कितपत सुरक्षित? (How Far...

गर्भारपणात प्रवास करणे कितपत सुरक्षित? (How Far Is It Safe To Travel In Pregnancy)

माझी मुलगी 5 महिन्यांची गर्भवती आहे. आम्ही कुटुंबिय दक्षिण भारतात सहलीसाठी जाणार आहोत. आम्ही तिला आमच्यासोबत नेऊ इच्छितो. तर न्यावे का? प्रवासात आम्हाला तिची काय काळजी घ्यावी लागेल?
– अनघा, अहमदनगर
साधारणतः गर्भारपणाचे पहिले तीन व शेवटचे तीन महिने गर्भवती स्त्रीला लांबच्या प्रवासासाठी सुरक्षित नसतात. या दरम्यान प्रवास केल्यास गर्भपात व मुदतपूर्व प्रसुतीचे धोके संभवू शकतात. मधले तीन महिने त्या मानाने सुरक्षित असतात. जर गर्भारपणात काही गुंतागुंत नसेल, तुमच्या मुलीची प्रकृती उत्तम असेल, सोनोग्राफी रिपोर्ट नॉर्मल असेल तर तिच्या स्त्रीरोग तज्ज्ञाच्या परवानगीने मुलीला प्रवासाला नेण्यास हरकत नाही. प्रवासामध्ये पाणी, खाणे स्वच्छ असावे. जड वजन उचलू नये. अति दगदग करू नये. स्वतःच्या डॉक्टरांची फाईल बरोबर ठेवावी. औषधे नियमित घ्यावीत. जास्त धक्के बसणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी त्वरित वैद्यकीय मदत मिळू शकेल अशा ठिकाणीच प्रवासास जावे. डोंगरदर्‍या व बेटे टाळावीत. जर काही त्रास झाला उदा. वांत्या, जुलाब, पोटदुखी, चक्कर, रक्तदाब इत्यादी. तर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःला जपावे, मास्क लावणे, सॅनिटाइझर वापरणे इत्यादी काळजी घ्यावी. जर प्रवासामध्ये वांती होण्याची सवय असेल तर वांती करण्यासाठी पिशवी बरोबर ठेवावी. हिंडता फिरताना कोठेही तोल जाऊन अथवा घसरून पडणार नाही ही काळजी घ्यावी. प्रवास जर सलग 3-4 तासांपेक्षा जास्त असेल तर प्रवासात पायाची बोटे व पाय अधूनमधून हलवित राहावे व पाणी भरपूर प्यावे. यामुळे पायाच्या रक्तवाहिन्यांत गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो.

गर्भारपणामध्ये विमान प्रवास सुरक्षित आहे का?
– जास्वंदी, कोल्हापूर
गर्भारपणामध्ये साधारणतः 35-36 आठवड्यापर्यंत विमान प्रवासास परवानगी असते. विमान प्रवासात पाणी भरपूर प्यावे. मधून मधून उठून फिरावे. कालावधी जर 3-4 तासांपेक्षा जास्त असेल तर इलॅस्टिक स्टॉकिंग घालावेत. बॉडी स्कॅनरमधून जाऊ नये.

गर्भारपणामध्ये कोणती वाहने प्रवासास सुरक्षित आहेत?
– स्वप्ना, डोंबिवली
गर्भारपणात ट्रेन, गाडी, विमान, बोट ही वाहने प्रवासासाठी सुरक्षित आहेत. बसने गेल्यास चाकावरची सीट टाळावी. कारण तीवर जास्त धक्के बसतात. दोन चाकी वाहन टाळावे, कारण तोल जाऊन पडण्याचा धोका असतो. शक्यतोवर रिक्शा टाळावी कारण धक्के जास्त बसतात.