कोविड-१९ लस कशाप्रकारे काम करते? (How Does the ...

कोविड-१९ लस कशाप्रकारे काम करते? (How Does the Covid-19 Vaccine Work?)

आजच्या घडीला देशातला करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि करोनाची साथ पूर्णपणे नियंत्रित करण्यासाठी करोना प्रतिबंधक लस घेणं हा एवढा एकच मार्ग आपल्यापुढे आहे. करोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम भारतात १६ तारखेपासून सुरू झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत मोठ्या संख्येने लसीकरणाचे टप्पे पार पडत आहेत. शिवाय १ मे पासून १८ वर्षाँवरील सगळ्यांनाच लसीकरण करता येणार आहे. परंतु, तरीही काही लोकांच्या मनात या लसीकरणामुळे जाणवणाऱ्या परिणामांमुळे अजूनही भिती आहे, शंका-कुशंका आहेत.

करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर एखाद्याला डोकेदुखी उद्‌भवली वा इतर काही त्रास जाणवला तर ‘ओह, याचा अर्थ माझी रोगप्रतिकारक शक्ती चांगलीच क्रियाशील आहे,’ असा विचार काहीजण करताना दिसतात. तर ज्यांना लसीकरणानंतर काहीच त्रास जाणवत नाहीत त्या व्यक्तींना वाटतंय की, ‘लस आपलं काहीच कार्य करीत नाही किंवा त्यांची रोगप्रतिकार यंत्रणा काहीच प्रतिक्रिया देत नाही.’

जाणून घेऊया लस आपल्या शरीरात कशाप्रकारे काम करते?

शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम लस करते. बाहेरील एखादे प्रोटीन किंवा विषाणू किंवा बॅक्टेरिया यांच्या स्वरूपात अँटीजेन शरीरात आल्यावर शरीर आपल्या अँटीबॉडीजच्या साठ्याच्या मदतीने प्रतिकारक्षमता वाढवते. आता या अँटीबॉडीज संसर्गाविरोधात लढण्यासाठी सज्ज झालेल्या असतात. रोगप्रतिकारक शक्ती काही दिवस, आठवडे किंवा काही महिन्यांच्या कालावधीत विकसित केली जाते.

कोविड – १९ लसीचे डोस

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रोगप्रतिकारक शक्तीचे विविध स्तर निर्माण करण्यासाठी विविध वेळी विविध स्तरावरील लसी दिल्या जातात. काही लसींना बूस्टर डोस आवश्यक असतात तर काही लसी दरवर्षी दिल्या जातात, काही लसी एकाचवेळी दिल्या जातात आणि त्या आयुष्यभर संरक्षण पुरवत राहतात. आजवरच्या बहुतांश लसींमध्ये, खास करून भारतात दिल्या जाणाऱ्या लसींचे दोन डोसेस आवश्यक असतात. या डोसेसच्या वेळांमध्ये फरक असू शकतो. दीर्घकालीन रोगप्रतिकारक शक्तीच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे असते. कोविडच्या लसीचे दोन डोस २१ दिवसांच्या अंतरानं घेतले, तर ९५ टक्के व्यक्तींमध्ये करोना प्रतिबंधक अँटिबॉडी निर्माण होतात, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे.

देशातील तळागाळातील लोकांपर्यंत लस पोहोचणे अत्यंत गरजेचे

संपूर्ण समाजात एखाद्या आजाराविरोधात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होणे ही एक महत्त्वाची सुरुवात आहे. आजाराची नैसर्गिक लागण होऊन किंवा लसीमार्फत हे घडून येते. ही सक्रिय रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली की त्या समाजात आजाराचा प्रसार होणे थांबते. यासाठी देशातील ६० ते ७० टक्के व्यक्तींनी लस घेतलेली असणे गरजेचे आहे. संपूर्ण जगभरात या लसी जितक्या वेगाने पसरतील तितक्या वेगाने या महामारीवरील आपली पकड घट्ट होत जाईल. पुढील काही महिन्यातच देशातील जवळपास ३० कोटी जनतेला कोविड – १९ प्रतिबंधक लस देण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.

रोगप्रतिकारक शक्तीच्या या स्तरावर पोहोचत असताना आपल्याला एक महत्त्वाची बाब विसरून चालणार नाही ती म्हणजे विषाणू आपले स्वरूप, गुणधर्म बदलतात. सक्रिय राहण्यासाठी त्याच्यामध्ये ही उत्क्रांती होत राहते आणि ही सर्वसामान्य गोष्ट आहे. यामुळे विषाणूचा संसर्ग अधिक जास्त वाढतो, तो अँटीबॉडीजना देखील पुरून उरतो. यासाठीच लसीकरण कार्यक्रम लवकरात लवकर आणि विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण होणे खूप गरजेचे आहे.

कोविड-१९चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हे सुद्धा लक्षात ठेवा

कोव्हिड-१९ लसीकरण हे महासाथीचा सामना करण्यासाठी आणि लोकांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.  निरोगी राहा. तुमच्या निर्णयावर अफवांचा परिणाम होऊ देऊ नका. शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. लस घेतल्यानंतर करोना होणार नाही, असं मानून मास्क न घातला आणि सुरक्षा न घेता फिरू नका.

– नियमितपणे मास्क घालणं, सुरक्षित अंतर राखणं आणि हात धुणं आवश्यक आहे.

– वारंवार स्पर्श केलेल्या वस्तू आणि पृष्ठभाग वेळोवेळी निर्जंतुक करा. जंतुनाशकाने स्वयंपाकघराचं काऊंटरटॉप, पाकिटं, फर्निचर, इमारतीचे मजले स्वच्छ करा.

– गर्दीच्या ठिकाणी आणि कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणं शक्यतो टाळा.

– मित्र-मैत्रिणींशी कॉल किंवा व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधा.

– घरी व्यायाम करा. ताजी फळं, भाज्या, शेंगदाणे आणि डाळी खाऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवा. प्रक्रिया केलेले आणि जंक फूड टाळा.

– मधुमेह, हृदयविकार, उच्चरक्तदाब यांसारखे आजार असणाऱ्या रूग्णांना करोना विषाणूची लागण होण्याची धोका सर्वाधिक आहे. म्हणूनच त्यांनी वेळेवर औषध घेऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आजारी असलेल्या लोकांच्या संपर्कात येण्याचं टाळा.