केसांना तेल केव्हा, कसं आणि किती लावावं? (How A...

केसांना तेल केव्हा, कसं आणि किती लावावं? (How And When To Apply Hair Oil)

सुंदर चेहऱ्याप्रमाणेच आपल्याला दुसऱ्यांच्या सुंदर केसांचाही हेवा वाटत असतो. काळेभोर, दाट केस म्हणजे सौंदर्याला चारचाँद… आपले केस सुंदर दिसावेत यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. पण अपेक्षित परिणाम साधत नाही. कारण कोणतीही गोष्ट नुसतीच करण्यापेक्षा ती योग्य पद्धतीने करण्याला महत्त्व असते. तेव्हाच आपल्याला पाहिजे तसा परिणाम दिसून येणार. आता पाहा, आपण केसांच्या वाढीसाठी निरनिराळी तेले आणून लावतो, पण रिझल्ट झिरो मिळतो.

कारण आपण तेल योग्य पद्धतीने लावत नाही. केसांना तेल लावलं की लगेच केस लांबसडक आणि दाट होतील असं वाटत असलं तरी ते वाटतं तितकं सोपं नाही. केसांना तेल केव्हा, कसं आणि किती लावावं आणि कोणतं तेल लावावं याबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे.

केसांना तेल लावताना कोणती काळजी घ्याल?

१. केसांना तेल लावण्यापूर्वी ते थोडे गरम करून घ्या. कोमट तेलामुळे केसांच्या फॉलिकल्स उत्तेजित होण्यास मदत मिळते. आणि लावलेले तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहचून केसांचे पोषण व्यवस्थित होते.

२. बरेच जणांना केसांत तेल ओतून ठेवायची सवय असते. ही तेल लावण्याची योग्य पद्धत नाही. एका बाऊलमध्ये कोमट तेल घेऊन हाताची बोटं तेलातबुडवून, केसांचे लहान लहान भाग करत केसांत तेल लावावे. यामुळे केसांच्या मुळाशी तसेच सर्वठिकाणी तेल व्यवस्थित लागते.

३. गरजेपेक्षा जास्त तेल लावू नका. जास्त तेल लावल्यामुळे जास्त फायदा होईल हा चुकीचा समज आहे. उलट जास्त तेल लावल्यास ते स्वच्छ करताना अधिक शाम्पू लागेल.

४. केसांना तेल लावताना मसाज करणं गरजेचं आहे. तेल लावताना १० ते १५ मिनिटं स्कल्पला मसाज करा. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊन केसांना पोषण मिळेल.

५. चांगल्या परिणामासाठी केसांना रात्रभर तेल राहू द्यावे. यामुळे तेलाचा पूर्णपणे आपल्याला फायदा मिळेल. जर तुम्हाला रात्रभर केसांत तेल ठेवायचे नसेल तर किमान दोन तास तरी केसांत तेल राहू द्यावे.

६. तेल लावून झाल्यानंतर केसांना वाफ द्या. यामुळे केसांना तेल शोषून घेणं सोपं जाईल. केसांना वाफ देण्यासाठी एक टॉवेल गरम पाण्यामध्ये भिजवा आणि १० मिनिटं केसांवर गुंडाळून ठेवा. असं करताना लक्षात ठेवा की, टॉवेल जास्त गरम होऊ देऊ नका. जास्त उष्णतेमुळे केसांचे नुकसान होऊ शकतं.

७. केसांना वाफ देऊन झाली की नंतर शाम्पूने केस धुवा. केसांसाठी शाम्पूची निवड करताना आपले केस तेलकट, कोरडे जसे असतील त्याप्रमाणे शाम्पू घ्या.

८. केस मऊ आणि सतेज दिसण्यासाठी केसांना कंडिशनर लावण्यास विसरायचं नाही.

९. केस ओले असताना त्यात कंगवा घालू नये. त्यामुळे केस तुटतात. केस वाळल्यानंतरच ते विंचरावे.

१०. काळे, घनदाट आणि मऊ केसांसाठी केसांना तेल लावणं, मसाज करणं, शाम्पू करणं, कंडिशनर लावणं हे तर महत्त्वाचं आहेच, सोबत निरोगी केसांसाठी सकस आहार आणि पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची आहे. असं केल्याने केवळ केसच नाही तर तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्यही खुलून दिसेल. केस आणि चेहरा दोन्ही निरोगी दिसतील.