लांबसडक केसांसाठी घरगुती उपाय (Homemade Solutio...

लांबसडक केसांसाठी घरगुती उपाय (Homemade Solutions For Long Hair)

मी 32 वर्षांची आहे. मला लहानपणापासून लांबसडक केसांचे आकर्षण आहे. पण त्यांची देखभाल करण्यासाठी विविध प्रकार करणे मला नापसंत आहे. त्यामुळे मी केस तोकडे ठेवणेच पसंत करते. तरीपण मला केसांच्या वाढीसाठी एखादा घरगुती उपचार सुचवावा.
माधुरी, गोरेगाव

उष्णता, धुकं आणि प्रदुषणामुळे आरोग्याबरोबर त्वचा व केसांच्या समस्यांचा प्रत्येकीला सामना करावा लागतो. तरीपण आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये सोपा घरगुती उपाय म्हणजे खोबरेल तेल व कोरफड जेल एकत्र करून रात्री केसांना मसाज करावा व सकाळी केस कोमट पाण्याने धुवून टाकावे. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास केस दाट व मुलायम होण्यास मदत होते व केसांची नैसर्गिकरित्या वाढ होते. केसगळती पण थांबते. मात्र हा उपाय कमीत कमी तीन महिने तरी करावा.

माझी त्वचा सावळी आहे आणि उन्हामध्ये ती बरेचदा काळी पडते. थोडे काळे चट्टे पण यायला सुरुवात झाली आहे. माझी स्कीन तजेलदार दिसण्यासाठी उपाय सुचवा.
निशा, बीड

सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही घराबाहेर पडताना सनस्क्रिन लोशन लावणं फार गरजेचं आहे. त्वचा सावळी असणं हे चिंतेचं कारण नाही. पण त्वचा निस्तेज असणं योग्य नाही. त्वचा तजेलदार होण्यासाठी ग्रीन टीचा वापर करून तुम्ही घरच्या घरी फेस पॅक बनवू शकता. ग्रीन टी मध्ये हर्बस् असल्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. एका ग्रीन टी पाऊच मध्ये 1 चमचा बेसन व अर्धा चमचा हळद घेऊन त्यात ओलसरपणासाठी गुलाबपाणी टाकून हे मिश्रण चांगले मिक्स करावे. हा पॅक चेहर्‍यावर साधारण वीस मिनिटे ठेवावा. नंतर हलक्या हाताने चेहर्‍यावर मसाज करावा. म्हणजे हा पॅक स्क्रबरचेही काम करील. त्यामुळे चेहरा उजळण्यासोबत पिंपल्सची पण समस्या राहत नाही. मात्र हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करावा, लगेच चेहर्‍यात फरक पडून त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

माझं वय 45 वर्ष आहे. माझ्या डोळ्यावर ताण म्हणजे डोळे जड होऊन सुजलेले दिसतात. मला यावर काही घरगुती उपाय सुचवावे?
पल्लवी, सावंतवाडी

चाळीशीनंतर आपल्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात गाजराचा समावेश करून घ्या व घरगुती उपाय म्हणून तुम्ही आय पॅड घरच्या घरी बनवू शकता. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक छोटी काकडी, ग्रीन टी पाऊच व कॉटन पॅड किंवा कापुस इत्यादी. सर्वात आधी काकडी व ग्रीन टीचे पाणी मिक्सरला वाटून घेणे. नंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये घेऊन त्यात आय पॅड व्यवस्थित पिळून झिप लॉक बॅगमध्ये हवाबंद करून ठेवणे व आवश्यकतेनुसार हे डोळ्यावर 15 मिनिटे ठेवावे. डोळे अगदी गार होऊन ताजेतवाने होतील व तुमची समस्या दूर होण्यास मदत होईल.