अंडरआर्म्सचा काळेपणा घालवा ...

अंडरआर्म्सचा काळेपणा घालवा करा हे घरगुती उपाय (Home Remedies To Clean Blackish Underarms)

अंडरआर्म्सचा काळपटपणा ही फार मोठी समस्या नाही, तरीही काही वेळेस लज्जित करणारी समस्या आहे. सतत येणारा घाम, परफ्यूम अथवा डिओड्रंट अंडरआर्म्सवर डायरेक्ट लावल्यामुळे सहसा ही समस्या निर्माण होते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे अंडरआर्म्सला क्रीम लावून अथवा शेव्ह करून साफ करण्याऐवजी वॅक्स करणं हा सोपा आणि चांगला उपाय आहे. कारण यामुळेदेखील अंडरआर्म्सना काळेपणा येतो. पण बरेचदा अचानक प्लॅन तयार होतात, त्यावेळी पटकन वॅक्स करणं शक्य होत नाही. अशावेळी क्रीम अथवा शेव्ह करणं हाच एक उपाय उरतो. त्याचाच परिणाम अंडरआर्म्स काळे पडण्यामध्ये होतो. अशावेळी आपल्याला स्लीव्हलेस कपडे कितीही आवडत असले तरी ते घालण्याची लाज वाटते. पण आता अशी वेळ येऊ द्यायची नाही. आता आपण घरच्या घरीच अंडरआर्म्स स्वच्छ करून त्याचा काळेपणा घालवू शकतो. त्यासाठी करा हे घरगुती उपाय –

उपाय 1 : 2 चमचे हळद, 1 चमचा बेकिंग सोडा, 3 चमचे मध आणि अर्ध्या लिंबाचा रस एकत्र करून घट्ट पेस्ट करून घ्या. हा एक नैसर्गिक ब्लीचचा प्रकार आहे. हे मिश्रण साधारण 15 ते 20 दिवस फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवता येतं. हे मिश्रण अंडरआर्म्सना लावण्यापूर्वी अंडरआर्म्स वॅक्स्ड आणि स्वच्छ असायला हवेत. ही पेस्ट आपल्या बोटांनी काखेत लावा. 20 मिनिटांनंतर हे धुऊन घ्या आणि गरम पाण्यात ओल्या केलेल्या टॉवेलने पुसून घ्या. त्यानंतर त्वचेला नारळाचे तेल अथवा मॉईस्चराईजर क्रीम लावा. पहिल्याच वेळी अंडरआर्म्समध्ये बदल दिसण्यास सुरुवात होईल. असं आठवड्यातून तीन वेळा करू शकता.

उपाय 2 : एका वाटीत 1/4 कप साखर, 1 चमचा मीठ, 1 मोठा चमचा मध, 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे 3 थेेंब घालून याची एक पेस्ट करून घ्या. आता ही पेस्ट थोडं पाणी लावून अंडरआर्म्सला लावा आणि साधारण 3 मिनिटांपर्यंत मसाज करा. काही आठवड्यातच अंडरआर्म्समधील काळेपणा निघून जाईल.

उपाय 3 : 1 चमचा मध आणि 1 मोठा चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर यासह 2 चमचे दही मिक्स करा. ही पेस्ट थोड्या जाड्या थरामध्ये अंडरआर्म्सच्या त्वचेला लावा. 20 मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

उपाय 4 : अंडरआर्म्समधील काळेपणा दूर करण्यासाठी बटाटे हा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय आहे. बटाटा त्वचेवर नैसर्गिक ब्लीचप्रमाणे काम करतो. बटाट्याचे काप काढून ते त्वचेवर घासा अथवा बटाट्याचा रस काढून अंडरआर्म्सला लावा. साधारण 15 मिनिटं ठेवून धुऊन टाका. यामुळे काहीच दिवसात अंडरआर्म्स स्वच्छ दिसू लागतील.

उपाय 5 : 1/2 चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे दही मिक्स करा. याची एक पातळ पेस्ट बनवा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने हा भाग स्वच्छ करा. तुम्हाला काही दिवसातच याचा चांगला परिणाम दिसून येईल.