विसाव्या शतकातील मोनालिसा आणि जगातील सर्वात सुं...

विसाव्या शतकातील मोनालिसा आणि जगातील सर्वात सुंदर स्त्री, अशा उपाधी लाभलेली हॉलिवूडची अभिनेत्री जिना लोलोब्रिजीडा हिचे ९५व्या वर्षी निधन (Hollywood Actress Gina Lollobrigida Renowned As Monalisa Of The 20th Century And The Most Beautiful Woman In The World, Dies At 95)

जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री आणि विसाव्या शतकातील मोनालिसा, असा गौरव प्राप्त झालेली हॉलिवूडची अभिनेत्री जिना लोलोब्रिजीडा हिचे काल, निधन झाले. ती ९५ वर्षांची होती. १९५०-६०च्या दशकात जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सेक्स सिम्बल अशी कीर्ती तिने मिळवली होती. टपोरे पिंगट डोळे आणि कमनीय बांधा ही तिची सौंदर्यस्थळे होती.

सॉलोमन आणि शेबा, बिट द डेव्हिल, द माल्टेस फाल्कन, क्रॉस स्वोर्डस्‌, ट्रॅपीझ अशा असंख्य हॉलिवूडपटांमध्ये जिनाने मादक नायिका म्हणून कारकीर्द गाजवली होती. परंतु ‘कम सप्टेंबर’ या १९६१ साली आलेल्या रोमॅन्टिक चित्रपटातील तिची भूमिका संस्मरणीय ठरली. रॉक हडसन या देखण्या अभिनेत्याची ती नायिका होती. भारतीय प्रेक्षकांच्या मनात तिचा हाच चित्रपट घर करून राहिला आहे. या चित्रपटाचे थिम सॉन्ग अजूनही आपल्याकडे वाजते. व्हॉटस्‌ ॲप वर त्याची धून आजही लोकांच्या आवडीची आहे.

हॉलिवूड आणि इटालियन अशा सुमारे ७० चित्रपटांमधून जिनाने भूमिका केल्या. रॉक हडसन, हम्पफ्रे बोगार्ट, एरॉल फ्लिन, बर्ट लॅन्केस्टर, टोनी कर्टिस, ॲन्थनी क्विन, पॉल न्यूमन अशा हॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तिने काम केले होते.

‘शालिमार’ या हिंदी-इंग्रजी चित्रपटासाठी जिना मुंबईत आली होती. परंतु त्याच्या मुहूर्त-दृश्यानंतर तिने लगोलग त्यात काम करण्यास नकार दिला व परत निघून गेली.