नवचैतन्य आणणारा सण (Holi Is The Festival Of Vig...

नवचैतन्य आणणारा सण (Holi Is The Festival Of Vigour)


होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा काळ. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते. मोठ्या उत्साहाने साजरा होणार्‍या या सणामुळे थकवा, निराशा दूर होऊन सकारात्मकता आणि चैतन्य निर्माण होते.
भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, प्रथा, चालिरिती आहेत. हिंदू धर्मात अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीतील सण, उत्सव, अनेक विधी यांना केवळ धार्मिक, सांस्कृतिक नाही, तर वैज्ञानिक महत्त्वही तेवढेच आहे. निसर्गाच्या कालचक्रानुसार आपल्याकडे अनेक सण-उत्सव साजरी करण्याची पद्धत आहे. सण-उत्सव साजरे करण्यामागील कथा, मान्यता आणि परंपरा याबरोबरच वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर सण साजरे करण्याचा आनंद अधिक द्विगुणित होईल, हे नक्की.

निसर्गातील बदल
होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा काळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ. थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते. यामुळे शारिरीक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते. होलिका दहनाचे पौराणिक व सांस्कृतिक महत्त्व आपल्याला माहिती आहे. असे मानले जाते की, भक्त प्रल्हादची भक्ती आणि भगवान विष्णू यांच्याद्वारे प्रल्हादाच्या प्राणांची केलेली रक्षा याचा आनंद व्यक्त करण्यासाठी होळी हा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे हा उत्सव साजरा करण्यामागे शास्त्रीय कारणंही आहेत.

अबीर आणि गुलाल त्वचेसाठी तजेलदार
होलिकादहनानंतर दुसर्‍या दिवशी धुळवड साजरी करण्याची पद्धत आहे. यामध्ये अनेकविध रंगांचा आपण वापर करतो. अबीर आणि गुलाल यांचा वापर हा त्वचेसाठी चांगला असतो, या गोष्टीला शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे. थंडीमुळे कोरडी पडलेली त्वचा गुलाल आणि अबीरमुळे टवटवीत होते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच धुळवडीला आपण विविध खेळ खेळतो. शरीराची मोठ्या प्रमाणावर हालचाल करतो. एवढेच नव्हे तर होळी सणाच्या निमित्ताने लोकगीते, पारंपरिक गाणी म्हणण्याची परंपरा आहे. मोठमोठ्याने गाणी म्हटल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. थकवा, निराशा दूर होऊन सकारात्मकता आणि चैतन्य निर्माण होते, असेही सांगितले जाते. त्याचप्रमाणे सगळ्यांसोबत गाणी गायल्याने, नाचल्याने एक वेगळाच उत्साह संचारतो. त्याने मन अगदी आनंदी होऊन जाते.

गावाकडील लोकोत्सव
कोकणात गणपतीनंतर नवचैतन्य आणणारा सण म्हणजे होळी. गणपतीपेक्षा होळीला या भागात खूप महत्त्व. पाच दिवस, सात दिवस अग्नीच्या साक्षीने आनंद साजरा करायचा! तेथे खर्‍या अर्थाने हा लोकोत्सव असतो. प्रत्येक गावानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गावच्या ठिकाणीच हा सण साजरा करण्यामागच्या सांस्कृतिक, पौराणिक तसेच वैज्ञानिक कारणांची हमी मिळते. गावाकडे या सणास शिमगा असे म्हणतात, अन् होळी जळण्याच्या अगोदर सारी वाडी, सारा गाव शिमगामय होतो. शहराच्या ठिकाणीही होळी या सणाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या प्रियजनांसोबत मजामस्ती करत आणि स्वादिष्ट पक्वान्नाचा बेत करत मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.

होलिकादहनाचा शुभ मुहूर्त
यावर्षी होलिका दहन करण्यासाठीचा शुभ मुहूर्त 17 मार्च 2022, गुरुवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटे ते 10 वाजून 31 मिनिटांपर्यंत असेल. होलिका दहनाच्या दुसर्‍या दिवशी रंग खेळण्याचा प्रघात आहे.