कोहिनूर हिऱ्याचा काय आहे इतिहास? (History Of Mo...

कोहिनूर हिऱ्याचा काय आहे इतिहास? (History Of Most Precious Diamond Kohinoor)

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं अलिकडेच निधन झालं. ९६ वर्षाच्या राणीच्या या निधनाबद्दल ब्रिटनमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. तर त्यांच्या ताब्यात असलेला भारतीय कोहिनूर हिरा, याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हा कोहिनूर हिरा, भारतात परत आणावा, अशी मागणी काही नेटकरी करू लागले आहेत.

अतिशय मौल्यवान असलेला हा कोहिनूर नेमका आला कुठून व त्याचा इतिहास काय आहे, ते जाणून घेणे मनोरंजक ठरेल.

अख्ख्या जगाला भुरळ पाडणारा हा भारतीय हिरा १३ व्या शतकात आंध्र प्रदेशातील गुंटूर या गावाजवळ काकतीय राजवंशाच्या काळात सापडला होता. तो कित्येक वर्षे निरनिराळ्या राजवंशाच्या ताब्यात होता. दिल्लीचा सुलतान अलाऊद्दीन खिलजीकडे पण होता. त्यानंतर तो मोगलांकडे गेला. पुढे पर्शियन राजाने आक्रमण केल्यावर नादिर शाहने लुटून अफगाणिस्तानात नेला. त्यानंतर १८०९ साली पंजाबचे शीख महाराजे रणजित सिंग यांच्याकडे तो आला.

ब्रिटिशांचा अंमल आपल्या देशावर सुरू झाला. त्यांनी आपली श्रीमंत संस्थाने खालसा करायला सुरुवात केली. त्यानुसार ब्रिटिशांनी पंजाब प्रांत जिंकला. तेव्हा महाराजा रणजित सिंग यांचे वारस दुलिपसिंग यांनी हे मौल्यवान जवाहिर ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांच्याकडे सुपुर्द केले. ही घटना १८०९ सालची आहे.

सुरुवातीला महाराणी व्हिक्टोरियाने कोहिनूर हिरा आपल्या शाही गाऊनवर, ‘ब्रोच’ म्हणून परिधान केला. नंतर तो राणीच्या मुकुटात जडविण्यात आला. हा मुकुट सर्वप्रथम राणी अलेक्झांड्राने डोक्यावर ठेवला. त्यानंतर तो राणी मेरीच्या मस्तकावर सजला. वंशपरंपरेने तो मुकुट पुढील सर्व महाराण्यांनी वापरला.

हा कोहिनूर हिरा १०५.६ कॅरटचा आहे. त्याला कोणताही रंगच नाही. ब्रिटनच्या ज्या महाराणीच्या मुकुटाचा तो भाग बनला आहे; तो मुकुट ८०० हिऱ्यांनी जडलेला आहे. अन्‌ त्याच्या समोरच्या बाजूला, मध्यभागी कोहिनूर बसविण्यात आला आहे. हा हिरा सध्या टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवण्यात आला आहे. पर्यटक त्याला पाहू शकतात.

१३ व्या शतकात, आपल्या देशात सापडलेला हा हिरा शेकडो वर्षानंतर तेवढाच तेजस्वी आणि टिकाऊ ठरला आहे, यावरून त्याचे मूल्य लक्षात यावे.

हा हिरा भारतात परत आणण्याच्या वल्गना आपल्याकडील अनेक राजकीय नेत्यांनी वेळोवेळी केल्या होत्या. परंतु ब्रिटीश सरकारने तो परत करण्याची शक्यता नाकारली आहे.