हिंदी सिनेमांमुळे मराठी सिनेमांची महाराष्ट्रातच...

हिंदी सिनेमांमुळे मराठी सिनेमांची महाराष्ट्रातच गळचेपी, दिग्दर्शक हेमंत ढोमेने व्यक्त केला संताप (Hindi Films Are Giving Step Motherly Treatment To Marathi Films: Director Hemant Dhome Express His Agony)

चित्रपटगृहात हिंदी सिनेमा आल्यावर मराठी सिनेमांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. हा प्रकार पूर्वापार चालत आला आहे. आता पुन्हा एकदा हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळत आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा सनी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकरने सनी हे प्रमुख पात्र साकारले आहे. घरापासून दूर असलेल्या तरुणाची कथा या चित्रपटात दाखवली गेली आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता.

चित्रपट प्रदर्शित झाल्यावरही लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी चित्रपटाच्या टीमला आशा होती. पण चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाल्यामुळे त्यादिवशी फारशी गर्दी जमली नाही. पण त्यामुळे बऱ्याच चित्रपटगृहातून दुसऱ्या दिवशीचे सनी चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. तसेच शनिवार रविवार बुकींग असूनही शोचे पैसे प्रेक्षकांना परत देऊन त्याजागी अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट लावण्यात आला.

या प्रकारामुळे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा राग अनावर होऊन त्याने तो सोशल मीडियावर व्यक्तही केला आहे. प्रेक्षकांना पैसे परत केल्याचे स्क्रीनशॉट त्याने आपल्या अकाउंटला पोस्ट केले आहेत. याशिवाय एका मुलाखतीत तो म्हणाला, “शुक्रवारी माझा ‘सनी’ चित्रपट प्रदर्शित झाला. १८१ चित्रपटगृह आणि जवळपास ३०० पेक्षा अधिक स्क्रिनवर ‘सनी’ दाखवण्यात आला. शुक्रवारी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक संख्या कमी असल्याने त्यादिवशी रात्रीचे तसेच शनिवारचे या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले.”

हेमंत पुढे म्हणाला, “रविवारी व सोमवारी या चित्रपटाचे शो आणखीनच कमी झाले आहेत. म्हणजे माझ्या मराठी चित्रपटाला हक्काचा विकेण्डही मिळू दिला नाही. आता निम्म्यापेक्षा कमी शो आहेत. काही भागांमध्ये तर चित्रपट दिसतही नाही. दादर, पार्ले, सांगली, सातारा अशा अनेक भागांमधून यासंदर्भात मला फोन आले आहेत. प्रत्येक चित्रपटाला हक्काचा एक आठवडा मिळायलाच हवा. ‘सनी’च्या आधीही ‘गोदावरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटालाही हक्काचे एक आठवड्याचे शो मिळाले नाहीत. हे फक्त या दोन चित्रपटांबाबतच नाही. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक मराठी चित्रपटाला त्याचा हक्काचा एक आठवडा, एक शो मिळायलाच हवा.”

मराठी चित्रपटांसाठी हेमंतने सरकारला साद घातली, त्यावेळी तो म्हणाला, “माझी सरकारला एक विनंती आहे की, कृपया एक कठोर कायदा अंमलात आणावा. ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक भागात हक्काचा एक शो मिळेल. तसेच कमीत कमी एक आठवड्याचा वेळ मराठी चित्रपटाला मिळेल. अशी पुन्हा एकदा मी सरकारला कळकळची विनंती करतो.”

“प्रेक्षक तिकिटं बुक करत आहेत तरीही त्यांची तिकिटं रद्द करून शो कॅन्सल झाले असल्याचा मॅसेज प्रेक्षकांना करण्यात येत आहे. कारण समोर सुरू असलेला एक हिंदी चित्रपट जोरात चालू आहे. आणि तो चालावाच याचा मला आनंद आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी ही आनंदाची बातमी आहे. पण या सगळ्यामध्ये मराठी चित्रपट डावलला जात आहे. ते ही आपल्या महाराष्ट्रातच.”

येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मराठी सिनेमांना योग्य स्थान मिळते की नाही हे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.