हिंदी भाषा विवाद विकोपाला : आरआरआरच्या नव्या ट्...

हिंदी भाषा विवाद विकोपाला : आरआरआरच्या नव्या ट्रेलरमधून अजय देवगन आणि आलिया यांची नावं हटवण्यात आली (Hindi Controversy: Ajay Devgn and Alia’s name dropped from the title of the new RRR trailer)

अजय देवगण (Ajay Devgn) आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिंदी भाषेवरून सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. हिंदी भाषेबाबत बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या या वादामुळे ब्लॉक बस्टर चित्रपट ‘RRR’ च्या नवीन ट्रेलरमधून अजय देवगणचे नाव हटवण्यात आले असून, हा वाद कायम राहणार असल्याचे दिसत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया.

ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणार RRR

थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर, RRR आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २० मे रोजी झी 5 वर तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम इत्यादी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. झी 5 ने या प्रीमियरचा नवा ट्रेलर चारही भाषांमध्ये काल यूट्यूबवर रिलीज केला, पण हा ट्रेलर पाहून लोकांना धक्काच बसला, कारण या ट्रेलरच्या शीर्षकातून अजय देवगण आणि आलिया भट्टचे नाव गायब आहे, तर टॉलीवूड स्टार रामचरण आणि एनटीआर यांची नावं त्यात आहेत. गेल्या वर्षी ९ डिसेंबरला जेव्हा तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतील ‘RRR’चा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा एनटीआर, रामचरण तसेच अजय देवगण आणि आलिया भट्ट यांचीही नावं या शीर्षकात सामील झाली होती.

नवीन ट्रेलरमधून अजय आणि आलियाचं नाव वगळलं.

आता नव्या ट्रेलरच्या शीर्षकातून अजय देवगण आणि आलिया भट्ट यांची नावे हटवल्याने हिंदी भाषेतील वादाचा याच्याशी संबंध जोडला जात आहे. हिंदी भाषेमुळे बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील ट्विटर वॉरमुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीने जाणूनबुजून हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

वास्तविक हा वाद कन्नड अभिनेता किचा सुदीपच्या एका ट्विटने सुरू झाला. या ट्विटमध्ये सुदीपने लिहिले की, हिंदी आता राष्ट्रभाषा नाही. त्याच्या या ट्विटवर अजय देवगण भडकला आणि त्याच्या ट्विटला उत्तर देताना त्याने लिहिले की, “किच्चा सुदीप, माझ्या भावा, तुझ्या मते जर हिंदी आमची राष्ट्रभाषा नाही तर तू तुझ्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करतोस? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन.”

यानंतर दोघांमध्ये ट्विटरवर वाद झाला आणि बघता बघता बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीनेही या वादात उडी घेतली आणि हिंदी राष्ट्रभाषेवरून नव्या वादाला सुरुवात झाली. मात्र, साऊथ इंडस्ट्री सुदीपच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. चित्रपटाच्या ट्रेलरमधून अजय देवगणचे नाव काढून टाकणे हा त्याचाच परिणाम असल्याचे दिसते.

RRR साठी अजय देवगनला मिळाले सर्वाधिक मानधन

अजय देवगणने RRR मध्ये १० मिनिटांची भूमिका केली असली तरी त्याच्या छोट्याशा व्यक्तिरेखेने करोडोंना प्रभावित केले. अजयला त्याच्या या केवळ १० मिनिटांच्या भूमिकेसाठी भरमसाठ फीही देण्यात आली होती. या चित्रपटासाठी अजयने ७ दिवसांचे शूटिंग केले होते आणि अजयला ७ दिवसांच्या कामाचे ३५ कोटी रुपये मानधन मिळाले होते, तर आलिया भट्टला ९ कोटी रुपये मिळाले होते.