‘हिंमत असेल तर अफगाणिस्तानात बुरखा न घालत...

‘हिंमत असेल तर अफगाणिस्तानात बुरखा न घालता वावरून दाखवा’ – कंगनाची हिजाब विवादात उडी (Hijab Controversy: Kangana Ranaut says-show courage by not wearing burqa in Afghanistan)

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. या वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. कोणी काय म्हटले आहे, हे जाणून घेऊया.

कंगना रणौत : हिंमत असेल तर अफगाणिस्तानात बुरखा न घालता फिरून दाखवा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत प्रत्येक मुद्यावर आपलं मत मांडताना दिसते. अन्‌ तिचे वक्तव्य नेहमीच चर्चेत असते. सध्या कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरून वाद सुरू आहे. या वादात उडी घेत कंगनानेही तिचं परखड मत मांडलं आहे. कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने इराणमधील ‘बिकनी टू बुरखा’ फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं की, ‘जर का हिंमत असेल तर अफगाणिस्तानात बुरखा न घालता फिरून दाखवा.’

कंगना रणौतने तिच्या पोस्टमध्ये काही महिला स्विमिंग सूटमध्ये बीचवर बसल्याचा आणि बुरख्यातील असा एक फोटो शेअर करून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “इराण. १९७३ आणि आता. पन्नास वर्षात बिकिनीपासून ते बुरख्यापर्यंत. जे इतिहासापासून धडा घेत नाहीत ते इतिहासाची पुनरावृत्ती करतात.”

तिने असेही लिहिले आहे, ‘जर तुम्हाला हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात बुरखा घालू नका. मुक्तपणे फिरा. स्वतःला पिंजऱ्यात ठेवू नका.’

जावेद अख्तर : मुलींना धमकावण्यात पुरुषार्थ नाही

यासंदर्भात जावेद अख्तर यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ‘मी कधीही हिजाब अथवा बुरख्याचे समर्थन केले नाही. यासंदर्भात माझी जी मतं आहेत, त्यावर आजही मी ठाम आहे. परंतू त्याबरोबरच या मुलींना धमकावणाऱ्या गुंडांबद्दल माझ्या मनात तीव्र संताप आहे. त्यांनी या मुलींना धमकावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा यांचा पुरुषार्थ आहे का? हे सर्व अत्यंत निराशाजनक आहे.’

ऋचा चड्ढा : मी अशाप्रकारच्या घटनांवर थुकते

ऋचा चड्ढाने कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाशी संबंधीत एक व्हिडिओ शेअर करत हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. तिने लिहिलंय – ‘तुमच्या मुलांचे योग्य पद्धतीने संगोपन करा. भ्याडांच्या झुंडीने एकट्या मुलीवर हल्ला केल्याचा अभिमान वाटत आहे. ते पराभूत आहेत.. हे लज्जास्पद आहे. येत्या काही वर्षांत हे सर्व बेरोजगार, हताश आणि गरीब होतील. अशांबद्दल सहानुभूती नाही, यांना मोक्ष नाही. अशा घटनांवर मी थुंकते.

स्वरा भास्कर : जंगली जनावर

स्वरा भास्करने हिजाबच्या वादावर अनेक पोस्ट आणि फोटो शेअर केले आहेत. या वादाचा व्हायरल व्हिडिओ रिट्विट करताना तिने ही घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय तिने विद्यार्थीनीला घेरणाऱ्या मुलांना जंगली जनावर असे म्हटले आहे.

कमल हासन: धर्माच्या नावाने विषारी भिंती उभ्या केल्या जात आहेत

याप्रकरणी अभिनेता आणि राजकीय नेता कमल हासन यांनी देखील ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘कर्नाटकमध्ये जे होत आहे त्यामुळे देशात अशांतता पसरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक विष पेरले जात असून त्यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे असे तामिळनाडूमध्ये घडता कामा नये. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे.

दिव्या अग्रवाल: साडी असो वा बुरखा, महिलांचा आदर केलाच पाहिजे

बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवालनेही ट्ठीट करत या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. तिने पाठवलेल्या फोटोत, एका महिलेने तिच्या अर्ध्या डोक्यावर साडी नेसलेली दाखवली आहे, तर तिच्या चेहऱ्याच्या दुसऱ्या बाजूला ती स्त्री हिजाबमध्ये दाखवली आहे. या पोस्टच्या माध्यमातून दिव्याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, महिलेने साडी नेसली किंवा हिजाब, प्रत्येक आउटफिटमध्ये ती सुंदर दिसते. साडी असो किंवा बुरखा, प्रत्येक पोशाखात त्या आकाशाला गवसणी घालताना दिसतात आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे.

याशिवाय बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हिजाबच्या वादावर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि खुलेपणाने बोलले आहेत.

फोटो सौजन्य – गुगल