मनाली येथील विलोभनीय हिडिंबा देवी मंदिर (Hidimb...

मनाली येथील विलोभनीय हिडिंबा देवी मंदिर (Hidimba Devi Mandir Is Heritage Site)

कविता नागवेकर

आपल्याला एखाद्या वास्तूकडे पाहताच मनःशांती मिळते. असा अनुभव देणारे हिडिंबा देवी मंदिर मनाली येथे आहे. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील मनाली येथे हे हिडिंबा देवीचं मंदिर आहे. भारतीय महाकाव्य महाभारतातील पांडवांपैकी भीमची पत्नी हिडिंबा देवीला समर्पित असे हे एक प्राचीन गुहा मंदिर आहे. हे मनालीतील सर्वात लोकप्रिय मंदिर असून धुंगीरी म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिराची ख्याती इतकी मोठी आहे की, हे मंदिर पाहण्यासाठी भारतातील पर्यटकांसह परदेशी पर्यटकही येथे आवर्जून येतात. खरंतर हिमवृष्टीच्या वेळी हे मंदिर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे गर्दी करतात. मंदिर म्हणजे जंगलाच्या मध्यभागी वसलेली चार मजली इमारत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरात हिडिंबा देवीच्या चरणांची पूजा केली जाते. 

Hidimba Devi Mandir, मनाली, हिडिंबा देवी मंदिर

हिमालय पर्वतांच्या काठावर डुंगरी शहरालगत पवित्र देवदार वृक्षांच्या जंगलाच्या मध्यभागी हिडिंबा देवी मंदिराची स्थापना केली आहे. भीम आणि पांडवांनी मनाली सोडल्यानंतर हिडिंबा राज्याची देखभाल करण्यासाठी परत आल्याचा समज आहे. असं म्हणतात की, हिडिंबा देवी ही अतिशय द्याळू आणि न्याय शासक होती. जेव्हा तिचा मुलगा घटोत्कच मोठा झाला तेव्हा हिडिंबाने त्याला सिंहासनावर बसवले आणि आपली आसुरी ओळख पुसण्यासाठी जंगलात जाऊन ध्यान करीत राहिली. बऱ्याच काळानंतर तिची तपस्या यशस्वी झाली अन् तिला देवी होण्याचा मान मिळाला. अशाप्रकारे हिडिंबा देवीचं हे मंदिर १९५३ सालामध्ये महाराजा बहादुर सिंग यांनी बांधले होते.

Hidimba Devi Mandir, मनाली, हिडिंबा देवी मंदिर

हिडिंबा देवीची कथा

हिडिंबा मंदिर हे पांडवांचा दुसरा भाऊ भीमाची पत्नी हिडिंबाला समर्पित आहे. हिडिंबा ही एक राक्षस कुळातील होती. ती तिचा भाऊ हिडिंब समवेत त्या भागात राहत होती. तिने शपथ घेतली होती की, जो कोणी तिच्या भावाला हिडिंबला लढाईत पराभूत करेल त्याच्याशी ती लग्न करेल. त्या काळात जेव्हा पांडव हद्दपार झाले होते, तेव्हा पांडवांचा दुसरा भाऊ भीम याने तेथील गावकऱ्यांना छळ व अत्याचारापासून वाचवण्यासाठी हिडिंबचा वध केला आणि अशा प्रकारे हिडिंबाने महाबली भीमाशी लग्न केले. भीम आणि हिडिंबा यांना घटोत्कच हा एक मुलगा होता, जो कुरुक्षेत्र युद्धात पांडवांसाठी लढताना मारला गेला. अशाप्रकारे हिडिंबा देवीला अर्पण केलेले हे मंदिर हिडिंबा मंदिर म्हणून ओळखले जाते.

★हिडिंबा मंदिराची रचना

Hidimba Devi Mandir, मनाली, हिडिंबा देवी मंदिर

हिडिंबा मंदिर हे इतर मंदिरांपेक्षा वेगळे असून मुख्य म्हणजे त्याचे बांधकाम पागोडा आर्किटेक्चरमध्ये बांधले गेले आहे. यामुळे हे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्याचप्रमाणे ते लाकडापासून बांधलेले असून मंदिराला चार छप्पर आहेत. त्यापैकी तीन देवदार वृक्षाच्या लाकडापासून बनविलेले आहेत. यानंतर मंदिराचे चौथे आणि शेवटचे छप्पर हे तांबे आणि पितळ यापासून बनविले आहे.

Hidimba Devi Mandir, मनाली, हिडिंबा देवी मंदिर

हिडिंबा मंदिराच्या छताबाबत एक वैशिष्ट आहे, पहिलं छप्पर तळापासून सर्वात मोठं आहे, दुसरं छप्पर पहिल्यापेक्षा छोटं आहे, तिसरं छप्पर दुसऱ्या छतापेक्षा छोटं आहे आणि चौथ्या किंवा शेवटच्या शिखराचं छत सर्वात लहान आहे, जे दूरवरुन पाहिल्यास फुलदाणीच्या आकाराप्रमाणे दिसतं.

हिडिंबा मंदिर जर दूरुन पाहिले तर अंदाजे ४० मीटर उंच शंकूच्या आकाराचे दिसते आणि या मंदिराच्या भिंती दगडांनी बांधल्या आहेत. तसेच मंदिराचे प्रवेशद्वार आणि भिंतींवर सुंदर आणि आकर्षक कोरीव काम केले आहे.

मंदिराचे प्रवेशद्वार लाकडी असून त्यावर देवी, प्राणी आणि इतर लहान चित्रं रेखाटली आहेत. श्रीकृष्णाच्या एका आख्यायिकेचे नवग्रह आणि महिला नर्तकी मंदिराच्या चौकटीच्या चौकटीत रेखाटलेले पाहावयास मिळतील. तेथे देवीच्या पावलांची मनोभावे पूजा केली जाते. शिवाय हिडिंबा मंदिरापासून सुमारे सत्तर मीटर अंतरावर हिडिंबा देवीचा पुत्र घटोत्कच मंदिर आहे.

Hidimba Devi Mandir, मनाली, हिडिंबा देवी मंदिर

हिडिंबा मंदिरातील उत्सव

प्राचीन कथेनुसार, ज्या राजा बहादुरसिंग यांने हिडिंबा मंदिर बांधले त्याच्या स्मरणार्थ येथे उत्सव साजरा केला जातो. याच कारणास्तव तेथील स्थानिक नागरिक श्रावण महिन्यात मेळा भरवितात. ही जत्रा बहादूरसिंग रे जटर या राजाच्या नावाने ओळखली जाते. यानंतर हिडिंबा मंदिरात दुसरा मेळा १४ मे रोजी म्हणजेच हिडिंबाच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात येतो. या दिवशी तिथल्या स्थानिक महिला डूंगरी वनक्षेत्रात संगीत आणि नृत्यासह या जत्रेचा आनंद घेतात. प्राचीन आख्यायिकेनुसार हे मंदिर सुमारे ५०० वर्ष जुने आहे. मंदिरातील तिसरी जत्रा सरोहीणी जत्रा म्हणून ओळखली जाते आणि धान्याची लागवड केल्यावर हा मेळा भरविला जातो. यानंतर  नवरात्रीच्या वेळी हिडिंबा मंदिरात दसरा महोत्सव देखील आयोजित केला जातो, अशावेळी मोठ्या संख्येने भाविक देवी हिडिंबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात. याचबरोबर हिमवृष्टीच्या वेळी या मंदिराचे दृश्य अतिशय सुंदर आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र मानले जाते.

जर तुम्हाला हिडिंबा मंदिरात जायचे असल्यास तीन पर्याय आहेत. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार हवाई मार्ग, रेल्वे मार्ग आणि रोडवेचा वापर करुन देवी हिडिंबा देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता.