बॉलिवूडचे हे टॉप श्रीमंत अभिनेते, वेगळ्या मार्ग...

बॉलिवूडचे हे टॉप श्रीमंत अभिनेते, वेगळ्या मार्गांनी कमावतात अमाप पैसा (These are The Top 5 Richest Actors of Bollywood, They Earn Big Money From These Sources)

बॉलिवूडचे टॉप सितारे सिनेमातील कामाबरोबरच त्यांच्या आलिशान जीवनशैलीवरून लोकांच्या मनात ठसले आहेत. अफाट संपत्ती, आलिशान घर आणि ऐषारामी मोटारगाड्या ही त्यांची आवडती जीवनशैली आहे. अतिशय परिश्रमाने या सिताऱ्यांनी इतकी संपत्ती कमावली आहे की, ती सामान्य जनांच्या कल्पनेपलिकडे आहे. मात्र ही कमाई फक्त चित्रपटात अभिनय करून त्यांनी मिळवली नाही. त्यांचे उत्पन्नाचे आणखी काही वेगळे मार्ग आहेत. सगळ्याच नाही पण ५ टॉप श्रीमंत अभिनेत्यांचे हे कमाईचे वेगळे मार्ग वाचा.

शाहरुख खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शाहरुखला बॉलिवूडचा बादशहा म्हटलं जातं. संपत्तीच्या बाबतीत तो कोणत्याही बादशहापेक्षा कमी नाहिये. तो चित्रसृष्टीतील सर्वाधिक धनवान अभिनेता समजला जातो. उपलब्ध माहितीनुसार या घडीला त्याची संपूर्ण मालमत्ता अदमासे ६९० मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ५४९० कोटी रुपयांपेक्षा  अधिक आहे. त्याच्या या एकंदर मालमत्ते मध्ये मुंबई आणि दुबई येथील बंगले, आलिशान मोटारगाड्या तसेच अलिबाग येथील फार्म हाऊस यांचा समावेश आहे. तो एका चित्रपटासाठी अंदाजे १०० कोटी रुपये मानधन घेतो आणि एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी ५ ते १० कोटी रुपये घेतो.

अमिताभ बच्चन

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडच्या धनवान कलाकारांमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांचा दुसरा नंबर लागतो. अमितजी यांची एकंदर मालमत्ता ४५१ मिलियन डॉलर्स म्हणजे अदमासे ३६२० कोटी रुपये एवढी सांगितली जाते. यामध्ये त्यांचे मुंबई मधील ४ आलिशान बंगले, तसेच ऐषारामी मोटारगाड्या आहेत. बिग बी एका चित्रपटासाठी १२ कोटी रुपये मानधन घेतात. तर एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी ३ ते ८ कोटी रुपये घेतात.

सलमान खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

धनवान कलावंतांमध्ये तिसरा नंबर भाईजान सलमान खानचा लागतो. त्याची एकूण मालमत्ता ३६० मिलियन डॉलर्स म्हणजे २८६४ कोटी रुपये इतकी भरते. यामध्ये त्याचं मुंबईतील आलिशान घर, बिईंग ह्युमन संस्था, पनवेलचे फार्म हाऊस आणि कित्येक ऐषारामी मोटारगाड्या यांचा समावेश आहे. तो एका चित्रपटासाठी अंदाजे १२५ कोटी रुपये घेतो तर उत्पादनांच्या जाहिरातीसाठी ४ ते १० कोटी रुपये घेतो.

अक्षयकुमार

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडच्या धनवान कलावंतांमध्ये अक्षयकुमार चौथ्या नंबरवर आहे. त्याची एकूण मालमत्ता अदमासे ३२५ मिलियन डॉलर्स, अर्थात्‌ २५८६ कोटी रुपये भरते. यामध्ये त्याचं मुंबईतील आलिशान घर, ऐषारामी मोटारगाड्या, महागड्या आधुनिक बाईक्स यांचा समावेश आहे. अक्षय एका चित्रपटासाठी अंदाजे १३५ कोटी रुपये मानधन घेतो तर उत्पादनांच्या जाहिरातीसाठी ८ ते १० कोटी रुपयांची कमाई करतो.

आमीर खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ख्याती पावलेला आमीर खान, धनवानांच्या यादीत पाचव्या नंबरवर आहे. त्याच्या एकूण मालमत्तेची किंमत २२५ मिलियन डॉलर्स आहे. म्हणजे तो अंदाजे १७९० कोटी रुपये किंमतीच्या संपत्तीचा मालक आहे. यामध्ये त्याचे आलिशान घर, महागड्या ऐषारामी मोटारगाड्या यांचा समावेश आहे. तो एका चित्रपटासाठी ६० ते ७० कोटी रुपये आकारतो. तर उत्पादनांच्या जाहिरातीसाठी ५ ते ७ कोटी रुपये स्वीकारतो.