क्रूर औरंगजेबास टक्कर देणाऱ्या ताराराणीची शौर्य...

क्रूर औरंगजेबास टक्कर देणाऱ्या ताराराणीची शौर्यगाथा (Heroic Queen Tara Rani To Appear On Small Screen: She Gave Tough Fight To Aurangzeb)

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असं जिचं वर्णन केलं गेलं आहे, त्या ताराराणीची पराक्रमी गाथा सोनी मराठी वाहिनीवर दिनांक १५ नोव्हेंबर पासून प्रदर्शित होत आहे.

‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल,’ हे ताराराणींचे शब्द होते. क्रूरकर्मा औरंगजेब, मराठ्यांना धुळीस मिळविण्याच्या उद्देशाने आपल्या अफाट सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरला होता. त्याला धीटाईने टक्कर देत ताराराणींनी स्वराज्य राखले. कारण थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करणारे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते.

या ताराबाईंच्या नेतृत्त्वाखाली स्वराज्य अबाधित राखण्याची कामगिरी दोन शूर सेनानींनी पार पाडली. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे ते सेनानी. ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी अतिशय कमी वेळात मराठी साम्राज्यात इतिहास घडवला. संताजी-धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती की, त्यांच्या घोड्यांना पाण्यात दिसतात की काय, असे मोगल सेनापती घोड्यांना विचारू लागले. या मालिकेत या दोघांची गोष्ट जोडण्यात आली आहे.

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ असे या मालिकेचे नाव असून ताराराणींची भूमिका स्वरदा ठिगळे करीत आहे. राज्यभरातील अनुभवी आणि ताज्या दमाच्या ४०० कलावतींची ऑडिशन घेतल्यानंतर स्वरदाची निवड करण्यात आली आहे. अभिनयाबरोबरच तलवारबाजी आणि घोडेस्वारीचा तिने कसून सराव केला आहे. तर इतिहासातील क्रूर, कपटी, जुलमी बादशहा औरंगजेब; मुरब्बी अभिनेता यतीन कार्येकर जिवंत करत आहेत.

संताजी आणि धनाजी यांच्या भूमिका अमित व रोहित देशमुख साकारत आहेत. त्या दोघांनी घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा चालविण्यासाठी कसून मेहनत घेतली आहे.

डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशनची ही मालिका असून संभाजी, जिजामाता यांच्या जीवनावरील ऐतिहासिक मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे.