असं काय घडलं की हेमा मालिनीला अश्रू आवरले नाही&...

असं काय घडलं की हेमा मालिनीला अश्रू आवरले नाही… (Hema Malini Gets Emotional As Daughter Esha Deol Records Message For Her)

ड्रीम गर्ल म्हटलं की एकमेव अभिनेत्री हेमा मालिनी यांचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. आजही सर्व चाहत्यांवर त्यांचं व्यक्तिमत्त्व, सौंदर्य आणि नृत्य यांची जादू कायम आहे आणि म्हणूनच हेमा मालिनी यांची ड्रीम गर्ल ही कधीही न पुसली जाणारी ओळख आहे.
इंडियन आयडल १२ च्या महिला दिन विशेष भागामध्ये हेमा मालिनी प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये हेमाजींच्या बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासाची झलक त्यांना दाखविण्यात आली. शिवाय त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेली गाणी स्पर्धकांनी गायली. अशा सगळ्या आठवणींच्या अल्बमने सद्‌गदीत झाल्यानंतर हेमाजींनी शोलेमधील गाण्यावर नाच केला. स्पर्धकांना प्रोत्साहित केलं. हे सगळं होत असतानाच मुलगी ईशा देओल आपल्या आईबद्दल अर्थात हेमाजींबद्दल जे काही बोलली त्याने हेमाजी भावूक झाल्या. आपल्या मुलीच्या प्रेमाने त्यांचे डोळे भरून आले.
हेमा मालिनी सगळ्यांसाठी खास आहेत परंतु त्यांच्यासाठी खास असलेल्या त्यांच्या लेकीने ईशाने आईसाठी एक व्हिडिओ क्लिप पाठवली, जी इंडियन आयडलच्या शोमध्ये प्रदर्शित केली गेली. त्यात ईशाने असं म्हटलं आहे की, हेमा मालिनी यांचा जीवनप्रवास मी अगदी जवळून पाहिला आहे. सगळ्यांसाठी ती ड्रीम गर्ल आहे परंतु आमच्यासाठी ती आमची अम्मा आहे.

त्यानंतर ईशाने तिच्या लग्नाच्या वेळचा एक किस्सा सांगितला. ती म्हणाली – लग्न झाल्यानंतर मी जेव्हा सासरी जायला निघाली, त्या वेळेपर्यंत हेमा मालिनी यांनी स्वतःला सावरलं. तिच्यासमोर त्या अजिबात रडल्या नाहीत. परंतु ईशा सासरी पोहोचल्यानंतर त्यांनी तिला फोन केला आणि काही न बोलता त्या फक्त रडल्या. ईशाच्या लग्नाला आता काही वर्षं झालीत तरीही त्यावेळचा हा किस्सा ऐकल्यानंतर आजही हेमाजी स्वतःला रडण्यापासून थांबवू शकल्या नाहीत. त्या अतिशय भावूक झाल्या.
ईशा म्हणाली, आज माझी ओळख केवळ माझ्या आईमुळे आहे. मी तिचा आदरच करत नाही तर तिची पूजा करते आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तूझी बिट्टू नेहमी तूझ्यासोबत आहे आणि राहील, असा विश्वास तिने आपल्या आईला दिला.

त्यानंतर हेमीजींनीही आपल्या दोन्ही मुली आणि जावयांची स्तुती केली. माझ्या मुलींनी माझं आयुष्य आनंदाने भरून टाकलं आहे, असं त्या म्हणाल्या. इतक्या प्रेमळ मुली, नाती, जावई असं परिपूर्ण कुटुंब दिल्याबद्दल त्यांनी पती धर्मेंद्रजींचाही आवर्जून उल्लेख केला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान हेमाजींनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.