संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’...
संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’चा फर्स्ट लूक टीझर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित (Heeramandi Teaser Out)

बॉलिवूड निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘हीरामंडी’ची पहिली झलक प्रेक्षकांसमोर नुकतीच सादर केली आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’नंतर आता संजय लीला भन्साळी ‘हिरामंडी’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘हीरामंडी’ ही एक वेब सीरिज आहे. आत्तापर्यंत या सीरिजमध्ये कोण असणार, याची कथा काय असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. अखेर ‘हीरामंडी’चा फर्स्ट लूक समोर आला आहे.

‘हीरामंडी’चा फर्स्ट लूक टीझर नेटफ्लिक्सवर शेअर करण्यात आला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर अनेकांना ८०च्या दशकाची आठवण येईल. या वेब सीरिजमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल ६ बॉलिवूड अभिनेत्री झळकणार आहेत. या अभिनेत्रींमध्ये मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख आणि शर्मीन सेगल या अगदी रॉयल स्टाईलमध्ये दिसत आहेत. बॉलिवूडच्या बहुचर्चित नायिकांना एकत्र पाहून ही सीरिज नक्कीच कल्ला करेल, याचा अंदाज येत आहे.
संजय लीला भन्साळी त्यांच्या रॉयल टच कथांसाठी अधिक प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘देवदास’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’सारखे हिट चित्रपट देऊन रसिकांची मने जिंकली आहेत. संजय लीला भन्साळी यांनी नेहमीच आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वाची सफर घडवली आहे. आता त्यांचा हा आगामी प्रोजेक्ट देखील अशाच एका हटके विषयावर असणार आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ची कथा वेश्या आणि राण्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सीरिजचा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. अद्याप याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.