स्वर्गातल्या शापित अप्सरा (Heavenly Beauties Of...

स्वर्गातल्या शापित अप्सरा (Heavenly Beauties Of Film Industry Under A Curse)

स्वर्गातल्या शापित अप्सरा
– श्रीकांत धोंगडे

त्या काळात दोघी रजतपटाच्या तारांगणात चमकणार्‍या तारका होत्या. मर्लिन मन्रो या मदनिकेला ‘सेक्स सिंबॉल’ ही बिरुदावली रसिक प्रेक्षक आणि प्रसार माध्यमांनी बहाल केली होती, तर मधुबाला नावाच्या सुंदरीला ‘मलिका-ए-हुस्न’चं मुकुट चढवलं होतं!


प्रेम म्हणजे काय, हे कळायचं वय नसताना आमच्या पिढीनं ज्यांच्यावर जिवापाड प्रेम केलं, त्या दोन ललना, म्हणजे मधुबाला आणि मर्लिन मन्रो. वास्तविक त्यातील एक अठरा वर्षांनी आणि दुसरी बारा वर्षांनी आमच्यापेक्षा मोठी. जेव्हा आम्हाला मिशी फुटू लागली, तेव्हा त्या तारुण्यानं मुसमुसलेल्या होत्या आणि प्रेम म्हणजे काय, हे कळायच्या आतच आमची पिढी त्या दोघींच्या प्रेमात पडली होती.
‘म’च्या बाराखडीतल्या त्या दोघी आमच्या मनात घर करून हक्कानं राहू लागल्या. तसं तर मर्लिन मन्रो हॉलिवूड स्टार; पण ती कधीच हॉलिवूडची वाटली नाही. आपल्याच मातीतली वाटली. वास्तविक तिचा कोणताच चित्रपट मी पाहिला नाही, तसंच कुठल्याही नियतकालिकेत तिचे फोटोही पाहण्यात आले नाहीत; पण का कोण जाणे मर्लिन मन्रो मनात घर करून हक्कानं राहत होती. तसंच मधुबालाचंही होतं. दोघी मनाच्या एकाच घरात सुखानं नांदत होत्या.
त्या काळात दोघी रजतपटाच्या तारांगणात चमकणार्‍या तारका होत्या. मर्लिन मन्रो या मदनिकेला ‘सेक्स सिंबॉल’ ही बिरुदावली रसिक प्रेक्षक आणि प्रसार माध्यमांनी बहाल केली होती, तर मधुबाला नावाच्या सुंदरीला ‘मलिका-ए-हुस्न’चं मुकुट चढवलं होतं! ब्रिटनमधील ‘युनायटेड सिनेमाज इंटरनॅशनल’ या जागतिक कीर्तीच्या सिनेसमीक्षक माध्यमाने घेतलेल्या एका चाचणीत हॉलिवूडमधील सर्वकालीन, सर्वश्रेष्ठ, सर्वांगसुंदर आणि सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री कोण, याविषयी सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या चाचणीत मर्लिन मन्रोच्या पदरात सर्वाधिक मतं पडली होती. विशेष म्हणजे, तिच्या मृत्यूनंतरही चाळीस वर्षं तिची लोकप्रियता आकाशाला टेकलेलीच होती. अशीच चाचणी ‘इंडियन सिनेगिल्ड असोसिएशन’ या संस्थेने 2000 सालाच्या अखेरीस घेतली होती आणि या चाचणीत मधुबाला ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवडली गेली होती. अर्थातच, मधुबालाची तुलना मर्लिन मन्रोशी करण्यात आली.

तीन पिढ्यांवर मोहिनी
मर्लिन मन्रो आणि मधुबाला या दोघीही आमच्या, आमच्या आधीच्या आणि आमच्या नंतरच्या अशा रसिकांच्या तीन पिढ्यांवर मोहिनी घालणार्‍या अभिनेत्री ठरल्या. वास्तविक त्या गेल्या, तेव्हा आमच्या नंतरच्या पिढीचा जन्मसुद्धा झाला नव्हता. त्या दोघींच्या मृत्यूनंतर आजही त्यांचं गारुड वर्षानुवर्षं आमच्या मनावर रेंगाळत राहिलं.


तशा दोघीही अल्पायुषीच ठरल्या. मर्लिन मन्रोचा जन्म 1 जून 1926 रोजी आणि मृत्यू 5 ऑगस्ट 1962 रोजी झाला, तर मधुबाला 14 फेब्रुवारी 1933 साली जन्मली आणि तिचा मृत्यू 23 फेब्रुवारी 1969 साली झाला. दोघीही वयाच्या साधारण छत्तीस वर्षांच्या आसपासच गेल्या. त्या दोघीही गरिबीतच वाढल्या. त्यांचं बालपण गरिबीतच गेलं. पण त्यांच्या असाधारण सौंदर्याने त्यांच्यासाठी रुपेरी दुनियेची द्वारं खुली केली होती. आणि पाहता पाहता आम्हा रसिकांच्या हृदयावर त्या आरूढ झाल्या आणि आजही त्यांच्या आठवणी आमच्या मनात ठाण मांडून बसल्या आहेत.
सौंदर्याचं वरदान
खरं तर, दोघींमध्ये बर्‍याच गोष्टींचं साम्य होतं. दोघी असाधारण सौंदर्याचं वरदान घेऊन आल्या होत्या. दोघी गरिबीतच वाढल्या. दोघीही अल्पायुषी ठरल्या. मर्लिन मन्रोला हॉलिवुडचं सर्वाधिक मानाचं समजलं जाणारं ‘ऑस्कर अ‍ॅवॉर्ड’ एकदाही मिळालं नाही; तसंच बॉलिवूडचं ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड’ मधुबालाला कधीच मिळालं नाही. दोघी आपली डायरी रोज लिहीत असत. मधुबालाची डायरी तिच्या बरोबरच दफन करण्यात आली आणि मर्लिन मन्रोची डायरी तिच्या मृत्यूपूर्वीच गायब करण्यात आली. कारण त्यात राजकारण्यांच्या राजकीय हितसंबंधांना बाधा आणू शकणार्‍या गोष्टी होत्या.
डेट्राईटमधला अर्नाल्ड जॅकलीन हा अब्जाधीश उद्योगपती. तो मर्लिन मन्रोचा ‘सेवन इयर इच’ चित्रपट पाहून वेडापिसा झाला होता. त्यानं मर्लिन मन्रोला निरोप पाठवला. ‘तू मला जर एका रात्रीचा सहवास दिलास, तर माझी अर्धी संपत्ती मी तुला देईन… माझ्याशी विवाह केलास, तर माझी संपूर्ण संपत्ती तुझ्या नावे करीन.’ पण मर्लिन मन्रोने त्याचा प्रस्ताव झिडकारून टाकला. मधुबालासमोरही असाच एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पतियाळा संस्थानच्या महाराजांनी ‘महल’ चित्रपट पाहून मधुबालाला अशीच ऑफर दिली होती; पण मधुबालानेही त्याला झिडकारलं होतं.

लहरी आणि चंचल मर्लिन
मर्लिन मन्रो आणि मधुबाला यांच्यातला एक फरक मात्र सहज लक्षात येण्यासारखा आहे. तो म्हणजे, मर्लिन मन्रोनं अनेक चित्रपटांमध्ये अत्यंत अल्प वस्त्रांत म्हणजे, अगदी अर्धनग्न अवस्थेतही भूमिका केल्या आहेत. 1962 साली तर, ‘समथिंग गॉट टू गीव्ह’ या चित्रपटात तिनं पूर्ण विवस्त्र अवस्थेत स्विमिंग पूलवर पोहण्याची दृश्यं दिली होती. मधुबालानं मात्र कधीही अपुर्‍या कपड्यात शॉट्स दिले नाहीत. अंगभर कपड्यात तिचं सौष्ठव उठून दिसत असे. मर्लिन मन्रोनं कमीत कमी कपडे घालून तिच्या शरीराचं सौंदर्यप्रदर्शन केलं. मृत्यू पावली त्या वेळीही ती पूर्ण विवस्त्र होती. मधुबाला मात्र संपूर्ण कपड्यात वावरली आणि मृत्युसमयीही संपूर्ण कपड्यातच दफन झाली.
तशी मर्लिन मन्रो लहरी आणि चंचल मनोवृत्तीची होती. प्रचंड रक्कम घेऊनही ती वेळ पाळेलच असं नव्हतं. या उलट मधुबाला कडक शिस्तीची होती. ठरल्या वेळी शूटिंगला हजर असायची. बेशिस्तपणामुळे शूटिंगला अवेळी येणार्‍या आघाडीच्या नायकांना फैलावर घेण्यास मागेपुढे पाहायची नाही.
मर्लिन मन्रो म्हणजे प्रणयाचा कैफ आणि लावण्याचा जुलूस होता, तर मधुबालाच्या अंगभर कपड्यात तिचं लाजरंबुजरं सौंदर्य सरोवरातील तरंगासारखं हळुवारपणे काळजाच्या किनार्‍यावर धडकत राहायचं. दोघींवरही आमच्या पिढीनं अमाप प्रेम केलं. वास्तविक त्या दोघी गेल्या, ते वय आमचं प्रेम समजण्याचं वय नव्हतं; पण जसजसं आम्ही वयात येऊ लागलो आणि प्रेमाची भाषा समजू लागली, ती त्या दोघींकडे पाहूनच. मधुबालाचा ‘महल’ पुण्याच्या अपोलो सिनेमात मॅटिनी शोला कधी तरी पाहिला होता. तिचा संपूर्ण पाहिलेला तो एकमेव चित्रपट. तोही त्यातील ‘आयेगा आने वाला’ या गाण्यासाठी पाहिला आणि मधुबालाच्या प्रेमात पडलो.

मधुबालाची जादू अजरामर
मधुबाला काळाच्या पडद्याआड जाऊन आज अनेक वर्षं झाली; परंतु तिनं रसिकजनांवर केलेली जादू आजही अबाधित आहे. अजूनही ती जादू तसूभरही ओसरलेली नाही. मधुबालानंतरच्या अनेक नायिका प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचून गेल्यानंतर त्यांच्या आठवणी आठवायला विचार करावा लागतो. एवढंच नव्हे, तर त्यांची नावं आठवायलाही स्मृतीला ताणावं लागतं. पण मधुबालाचं असं नाही. ज्या दुर्धर आजाराने मधुबाला पीडित होती, तो लक्षात घेता ती जाणार हे नक्की होतं; परंतु तशी ती अकालीच गेली म्हटलं, तर अयोग्य ठरणार नाही. छत्तीस हे काही कुणा व्यक्तीचं मरण्याचं वय नाही. जाताना ती करोडो सिनेरसिकांच्या हृदयाला चटका लावून गेली. ‘राजहठ’ चित्रपटात प्रदीप कुमारने तिला पाहून म्हटलेल्या गाण्याच्या ओळी याची साक्ष देतील.
आये बहार बनके लुभाकर चले गये।
क्या राज था, जो दिलमें छुपाकर चले गये॥
‘राजहठ’मधल्या गाण्याच्या या दोन ओळी अक्षरश: सत्यात उतरवल्या तिनं.
स्वर्गीय सौंदर्य
छत्तीस वर्षांच्या आयुष्यातील तब्बल तीस वर्षं तिनं रुपेरी पडद्यावर काम करत रसिकांच्या मनावर राज्य केलं. समीक्षकांनी तिच्या सौंदर्याची खूप स्तुती केली, तिच्या सहज सुंदर अभिनयाचं कौतुकही केलं; पण तिला एखाद्या पुरस्कारानं सन्मानित करावं, असं कुणालाही वाटलं नाही. तिची अभिनय क्षेत्रातली कर्तबगारी असामान्य आणि अद्वितीय होती, तरीही तिला कुठलाच पुरस्कार कधीही मिळाला नाही. केवढं हे दुर्भाग्य! याविषयी ‘फिल्म इंडिया’ या इंग्रजी मासिकाचे संपादक बाबूराव पटेल परखडपणे म्हणाले होते, “तिच्या स्वर्गीय सौंदर्याने हे लोक भारावून गेले होते आणि त्यामुळे तिच्या अभिनयाकडे यांचं दुर्लक्ष झालं असावं.”
‘ब्लिट्झ’चे संपादक बी.के. करंजिया यांनी मधुबालाची एक मुलाखत घेतली होती, त्यात ते म्हणतात, “”At last, Madhubala has arrived with full vengeance. At Ten she was a Child Actor, at fifteen she became Matured Actress, and before Twenty she was the greatest star of Hindi Cinema. All set to sale in deep water of Hollywood.”


मधुबाला आणि मर्लिन मन्रो दोघीही सौंदर्याचं आगळं वरदान लाभलेल्या सौंदर्यवती; पण दोघींच्या सौंदर्याची व्याख्या वेगळी होती. मधुबालाच्या सौंदर्याचं वर्णन करायचं तर फुलावर बसलेलं फुलपाखरू हळुवारपणे हृदयाला स्पर्शून जातं. मधुबाला म्हणजे हृदयाला स्पर्शून जाणारी वार्‍याची झुळूक, तर मर्लिन मन्रो म्हणजे भावनेचा झंजावाती लोंढा होता. ‘नायगरा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल, प्रत्येक फ्रेममध्ये चित्रपटाच्या नावाइतकंच त्यांनी मर्लिन मन्रोच्या नावालाही महत्त्व दिलं होतं. मृत्यूच्या पन्नास वर्षांनंतर, 2012 साली तिच्यावर एक डॉक्युमेंटरी बनली, ‘लव्ह मर्लिन’.
खरंच, मधुबाला आणि मर्लिन मन्रो या स्वर्गातल्या शापित अप्सराच असाव्यात. देवेंद्रने त्यांना 36 वर्षं पृथ्वीवरील वास्तव्याचा शाप दिला असावा. आणि तीन तपांचा हा शाप भोगून, शापमुक्त होऊन त्या पुन्हा स्वर्गलोकी गेल्या असाव्यात.