घरातली स्त्री सुदृढ तर घर सुदृढ (Healthy Housew...

घरातली स्त्री सुदृढ तर घर सुदृढ (Healthy Housewife Keeps Family Fit)

आपण आजारी पडलो तर कुटुंबातील सदस्यांचे हाल होतील, असा विचार करून स्त्रीनं स्वतःच्या
आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचं सोडून दिलं पाहिजे. आणि घरातली स्त्री सुदृढ, तर घर सुदृढ, ही नवी विचारसरणी स्वीकारली पाहिजे.

मला बाईला सारखं सारखं आजारी पडून कसं चालेल? माझ्या नवर्‍याला रोज सकाळी डबा कोण बनवून देईल? माझ्या लहान मुलाला कोण सांभाळेल…? एकंदरीतच, आपण आजारी पडायचं नाही, तसं झालं तर कुटुंबातील सगळ्यांचे हाल होतील अशी विचारसरणी महिलांच्या मनात दडलेली असते. हेच तिच्या अनारोग्याचं मूळ बनतं. ही महिला आपल्या आरोग्याकडं सतत दुर्लक्ष करते आणि
केव्हा कोलमडून पडते याचं तिलाही भान राहत नाही.

दोष द्यायचा तरी कोणाला?
स्वतःच्या आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष. सगळ्या स्त्रियांमध्ये आढळणारा हा एक समान गुण. गृहिणी स्वतः लक्ष देत नाही म्हटल्यावर घरातले इतरही तिची काळजी घेत नाहीत. इथूनच सुरू झालेले आजार पुढे उतारवयापर्यंत आपले पाय

घट्ट रोवून बसतात.
आजकाल धावपळीत प्रत्येकजण इतका अडकून गेला आहे की, आपल्या आरोग्यासाठी वेगळा वेळ देणं कठीण होऊन गेलं आहे. ‘प्रत्येकानं आपल्या शरीराचं आरोग्य राखणं महत्त्वाचं आहे नाहीतर आपण आपलं मन कदापि खंबीर आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही,’ असं गौतम बुद्धांनी म्हटलंय. या त्यांच्या संदेशावर थोडं आत्मचिंतन केल्यावर लक्षात आलं की, आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबतही किती निष्काळजीपणा दाखवतो.

योग्य उपचारांकरिता टाळाटाळ
कधीकधी थोडी- थोडी दुखणारी पाठ, कंबर, डोकं याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि दिवसागणिक यांचं आजारपण वाढवत नेण्याची चूक करतो. थोडक्यात आपण आपल्या शरीराला काय पाहिजे हे लक्षातच घेत नाही. मग, एक दिवस शरीर दुर्धर आजारपणानं बंड करून उठतं आणि आपले सगळे व्यवहार ठप्प करून टाकतं. परिणामी, सक्तीनं विश्रांती घेण्याशिवाय आपल्या समोर काहीच पर्याय उरत नाही. डॉक्टरांची अव्वाच्या सव्वा बिलं पाहून चक्कर यायची वेळ येते. कामाच्या धबडग्यात आजकाल प्रत्येक वेळी थोडंसं काही दुखलं-खुपलं की लगेच डॉक्टरकडे धावता येत नाही. कधी-कधी वेळेअभावी तर कधी घरच्या घरी घरगुती उपचारांवर आपला अधिक विश्‍वास असल्यानं आपण योग्य उपचारांना टाळण्याचाच प्रयत्न करतो.
बरेचदा काही गंभीर आजारांचं निदान केवळ दुर्लक्ष झाल्यामुळे पुढे येतं. काही प्रसंगात वेळही आपल्या हातून निघून गेलेली असते. स्त्रियांमध्ये वयोमानानुसार अनेक बदल घडत असतात. त्यामुळे योग्य वेळी सावधपणा दाखवून जरुरी असलेले उपचार करून घेण्यातच शहाणपण असतं. आपल्याकडे स्त्रियांमध्ये थायरॉईड, कर्करोग, स्तनांचा कर्करोग, मासिक पाळीच्या समस्या, लठ्ठपणा, रक्ताची कमतरता, आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता हे सर्वसाधारणपणे आढळणारे आजार आहेत. त्यातले काही जीवघेणेही आहेत. त्यामुळे ठरावीक वेळेनंतर आणि विशेषतः लग्न करण्यापूर्वी सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचा नियम प्रत्येकीनं स्वतःहून स्वतःसाठी बनवून घ्यायला हवा.
घरातल्या इतर सदस्यांची काळजी घेताना, आपली नोकरी संसार सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत हे महिलांनी विसरता कामा नये. घरातली स्त्री सुदृढ तर घर सुदृढ होईल, हे लक्षात घ्यायला हवं.

  • दादासाहेब येंधे