पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य असे सांभाळा (Health...

पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य असे सांभाळा (Health Care Tips During Monsoon)


पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे विविध प्रकारचे संसर्ग जलद गतीने पसरत असतात. त्यात रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल, तर एक ना अनेक आजार होण्याची शक्यता बळावते. हे टाळण्यासाठी आरोग्य आणि आहाराच्या बाबतीत थोडी दक्षता बाळगायलाच हवी.
ऋतू बदलासोबत आरोग्याच्या तक्रारी सुरू होणं तसं सामान्यच आहे. मात्र पावसाळा सुरू झाला की, आरोग्याच्या कुरबुरी जरा जास्तच वाढू लागतात. यातही संसर्गजन्य रोगांचं प्रमाण अधिक असतं. कारण पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे विविध प्रकारचे संसर्ग जलद गतीने पसरत असतात. त्यात रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल, तर एक ना अनेक आजार होण्याची शक्यता बळावते. या आजारांपासून बचाव व्हावा, पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, असं वाटत असेल, तर आरोग्य आणि आहाराच्या बाबतीत थोडी दक्षता बाळगायलाच हवी.

मलेरिया
पावसाळ्यात अनेक ठिकाणी लहान-मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं. लहान-मोठी डबकी तयार होतात. या साचलेल्या पाण्यात होणारी मच्छरांची पैदास मलेरियाला कारणीभूत ठरते. म्हणूनच मलेरिया हा पावसाळ्यात हमखास होणारा आजार आहे.
लक्षणं
थंडी वाजून ताप येणं
डोकंदुखी
उलट्या होणं
अंगदुखी
मांस पेशींचं दुखणं
अशक्तपणा इत्यादी.
प्रतिबंधक उपाय
मच्छरांमुळे होणार्‍या या आजारास प्रतिबंध करण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे, मच्छरांना प्रतिबंध करणं.
घराच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचून देऊ नका.
मच्छरदाणी आणि मच्छरांना प्रतिबंध करणार्‍या इतर उत्पादनांचा वापर करा. अर्थात, मच्छर चावणार नाही, याची दक्षता घ्या.
मलेरियाची लक्षणं दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. रक्ताची चाचणी करून घ्या.

कॉलरा
दूषित पाणी किंवा अन्न कॉलराला कारणीभूत ठरू शकतं. विशेष म्हणजे, या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास, तो जिवावर बेतू शकतो. हे टाळण्यासाठी पावसाळ्यात स्वच्छता आणि आहाराकडे विशेष लक्ष द्या. कॉलरा हा त्वरित संसर्ग होणारा आजार असल्यामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं ठरतं, हे लक्षात ठेवा.
लक्षणं
तीव्र पोटदुखी
जुलाब
उलट्या
ताप येणं इत्यादी.
प्रतिबंधक उपाय
परिसरामध्ये कॉलरा पसरण्याची शक्यता अधिक असल्यास, पावसाळा सुरू होण्यापूर्वी कॉलराची लस अवश्य टोचून घ्या.
पाणी उकळून, गाळून प्या.
अन्न व्यवस्थित शिजवा
अन्न झाकून ठेवा. त्यावर माश्या बसणार नाही, याची काळजी घ्या.
उघड्यावर विक्री केले जाणारे पदार्थ खाऊ नका.

जेवण्यापूर्वी आणि शौचाला जाऊन आल्यानंतर हात व्यवस्थित अँटी-बॅक्टेरियल साबणाने स्वच्छ धुवा.
वैयक्तिक स्वच्छतेवर विशेष लक्ष द्या.
घर स्वच्छ ठेवा.
दुग्धजन्य पदार्थ टाळलेलेच बरे.
शरीर हायड्रेट राहील, याची विशेष काळजी घ्या.

टायफॉइड
पावसाळ्यात दूषित पाणी आणि अन्न यामुळे हमखास होणारा आणखी एक आजार म्हणजे, टायफॉइड. या आजाराच्या बाबतीत सर्वांत धोकादायक बाब म्हणजे, या आजारावर उपचार केल्यानंतरही तो गॉल ब्लॅडरमध्ये लपून राहू शकतो.
लक्षणं
खूप दिवस ताप येणं
तीव्र पोटदुखी
डोकंदुखी
प्रतिबंधक उपाय
पावसाळा सुरू होण्यापूर्वी टायफॉइडची लस जरूर टोचून घ्या.
स्वच्छतेविषयी विशेष दक्षता बाळगा.
टायफॉइडची लक्षणं दिसताच वैद्यकीय सल्ला घ्या आणि संबंधित तपासण्या करून घ्या.
टायफॉइडच्या रुग्णाला योग्य प्रमाणात द्रवरूप पदार्थ द्या, अन्यथा त्यांना डिहायड्रेशनची समस्या जाणवू शकते.
हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे अशा रुग्णांपासून दूर राहा.

वायरल ताप
वातावरणात बदल झाला की, हा आजार सर्रास होतो. त्यातही पावसाळ्यात हा आजार वेगाने पसरतो.
लक्षणं
ताप
वारंवार शिंका येणं
घसा खराब होणं इत्यादी.
प्रतिबंधक उपाय
वायरल ताप येऊ नये असं वाटत असेल, तर पावसात भिजणं टाळा.
पावसात भिजलातच, तर लवकरात लवकर कोरडे होऊन हळद घातलेलं गरम दूध प्या.
कोमट पाण्याच्या गुळण्या करा.
स्वतःला उष्ण ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे थंडी वाजणार नाही.

पोटात संसर्ग होणं
गॅस्ट्रोसारखे पोटाशी संबंधित आजार या मौसमात सामान्य आहेत. यामुळे वारंवार उलट्या आणि जुलाब होतात. पोटातील आतड्यांमध्ये जळजळ होत असल्यामुळे रुग्णाला खूप त्रास होतो. बॅक्टेरियल किंवा वायरल इंफेक्शनमुळे हा आजार होण्याची शक्यता बळावते.
लक्षणं
वारंवार उलट्या होणं
जुलाब होणं
प्रतिबंधक उपाय
साबण लावून हात व्यवस्थित
स्वच्छ धुवा.
स्वयंपाकघरातील भांड्यांच्या स्वच्छतेचीही विशेष काळजी घ्या.
भाज्या चिरण्याचा बोर्ड स्वच्छ ठेवा.
बराच वेळ चिरून ठेवलेली फळं किंवा भाज्या खाऊ नका.
पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुनिया, हेपिटायटिस ए, लेप्टोस्पायरॉसिस, कावीळ असे आजारही अधिक प्रमाणात होताना दिसतात. या आजारांना एकतर मच्छर जबाबदार असतात किंवा दूषित पाणी आणि अन्न. तेव्हा हे
आजार टाळण्यासाठी मच्छर आणि दूषित पाणी व अन्न यांपासून स्वतःचा बचाव करा. वैयक्तिक स्वच्छतेबाबत दक्ष राहा.

हेही लक्षात ठेवा

  • पावसाळ्यात माश्या-मच्छर यामुळे अनेक आजार होतात. म्हणूनच पावसाळ्यापूर्वीच घरामध्ये पेस्ट कंट्रोल करून घ्या.
  • पावसाच्या पाण्यात अधिक काळ राहू नका. अन्यथा पायामध्ये फंगल इंफेक्शन होण्याची शक्यता वाढते.
  • घरी पोहोचल्यावर हातपाय व्यवस्थित मेडिकेटेड साबणाने धुवा आणि कोरडे करा.
  • दमा किंवा मधुमेह असल्यास ओल्या भिंतींपासून दूर राहा. ओल्या भिंतीमध्ये असलेली बुरशी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
  • ऑफिसमध्ये एखादा कपड्यांचा जोड जरूर ठेवा, म्हणजे कधी अगदीच भिजून ऑफिसमध्ये पोहोचल्यास कपडे बदलता येतील.
  • पावसाळ्यात रस्त्यावर चिखल असतो. रस्ते निसरडे झालेले असतात, तेव्हा पाय घसरू नये यासाठी पावसाळी चपलांचा वापर करा.
  • सुती आणि सिंथेटिक कपड्यांचा वापर करा.
  • बॅक्टेरियल आणि फंगल इंफेक्शन होऊ नये, यासाठी अधिक काळ ओले राहू नका.