आंब्याचा गोडवा आणि कटुता (Health Benefits Of Ma...

आंब्याचा गोडवा आणि कटुता (Health Benefits Of Mango)

वर्षातून एकदाच खायला मिळणारं फळ म्हणून आपण आंब्यावर, तसंच त्यापासून बनवण्यात येणार्‍या पदार्थांवर चांगलाच ताव मारतो. आपली रसना तृप्त करणारा आंबा आरोग्यवर्धक आहे. परंतु, तो अति प्रमाणात खाल्ल्यास आपला कडवटपणा दाखवल्याशिवाय
राहणार नाही.

फळांच्या राजाचं आगमन झालं आहे. या मधुर, स्वादिष्ट फळाचा आस्वाद अत्यंत आल्हाददायक असतो. आंबा आवडणार नाही, असा माणूस विरळाच. वर्षातून एकदाच खायला मिळणारं हे फळ खास भारतीय आहे. तरीपण जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्याकडे आंब्याचे 12 प्रकार उपलब्ध आहेत. या आंब्यापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. कैरीचं पन्हं, चटणी, लोणचं, आमरस, कॅन्डी, पोळी, मिल्कशेक, पापड आदी प्रकार चवीचवीने खाल्ले जातात. आपली रसना तृप्त करणारा आंबा आरोग्यवर्धक आहे. त्याचे औषधी गुणदेखील आहेत.
उष्णतेपासून संरक्षण
आंबा हे तसं उष्ण फळ आहे. तरीपण उष्णतेपासून संरक्षण करण्याची यात क्षमता आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसात जर आपल्याला ऐन दुपारी घराबाहेर पडायचं असेल तर ग्लासभर पन्हं प्या आणि बाहेर पडा. याच्यानं ऊन बाधणार नाही. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्याचे गुणधर्म या पन्ह्यात आहेत. त्यामुळे उष्णतेच्या दिवसातील हे सर्वोत्कृष्ट पेय आहे.

स्मरणशक्ती वाढवते
ज्या लोकांमध्ये विसराळूपणा जास्त आहे किंवा एखादी गोष्ट लक्षात राहत नाही, अशी ज्यांची तक्रार आहे, त्यांनी आंबा अवश्य खावा. आंब्यात ग्लुटॅमिन
अ‍ॅसिड नावाचं एक तत्त्व असतं. ते स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतं.

रोगप्रतिबंधक क्षमता
आंबा इतका गुणी आहे की, त्याच्या सेवनानं आपल्या शरीरातील रोगप्रतिबंधक क्षमता वाढीस लागते. यामध्ये व्हिटॅमीन सी व फायबर्स यांचं प्रमाण जास्त असतं. परिणामी शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल
नियंत्रित ठेवलं जातं.

कॅन्सरला अटकाव
आंब्यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे कोलॉन कॅन्सर, ल्युकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सर यांना मोठ्या प्रमाणात अटकाव केला जातो. यामध्ये क्युर्सेटिन, अ‍ॅस्ट्रागालिन आणि फिसेटिन यांसारखी अनोखी तत्त्वं आहेत. ह्या तत्त्वांनीही कॅन्सरच्या पेशींना अटकाव होतो.

चेहर्‍यास तजेला
आंब्याच्या गराचा पॅक चेहर्‍यास लावा आणि हातानं चोळा. त्यामुळे चेहर्‍यास छान तजेला प्राप्त होईल.

डोळ्यात चमक
आंब्यामध्ये अ जीवनसत्त्वाचं प्रमाण जास्त असतं. हे जीवनसत्त्व डोळ्यांसाठी पोषक असतं. यामुळे डोळ्यातील चमक वाढते.

सेक्स क्षमता वाढते
आंब्याच्या सेवनानं सेक्स क्षमता वाढीस लागते. त्याच्यानं पौरुषत्त्व वाढीस लागतं, असं पूर्वापाड लोक सांगत आले आहेत. कारण आंब्यात इ जीवनसत्त्वाचं प्रमाण अधिक असतं. त्याच्यानं सेक्स संवर्धन होतं.

हावरटपणा नको
आंबा हा सगळ्यांचा खूप आवडीचा असल्यानं व तो वर्षातून एकदाच तेही (दोन महिने) खायला मिळत असल्यानं तो
खूप खावासा वाटतो. अगदी हावरटासारखा खाल्ला जातो.
हा अतिरेक टाळला पाहिजे. कारण अति प्रमाणात आंबा खाल्ल्यास तो हानिकारक ठरू शकतो. आंब्याच्या अतिरेकाने काही विकार उद्भवू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबा खाण्यापूर्वी किमान अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवावा. म्हणजे तो बाधत नाही.

पोट बिघडतं
एकतर आंबा असतो उष्ण व पचायलाही जड; त्यामुळे पोटाला तड लागेस्तोवर तो खाल्ल्यास किंवा आमरस हाणल्यास अपचन होतं, पोट बिघडतं. अतिसार होतो
अन् आवदेखील पडू शकते.
आंबा किंवा आमरसाच्या सेवनानंतर लगेच पाणी पिऊ
नये. तो बाधू नये म्हणून आमरसात चिमूटभर मीठ
(सैंधव मीठ अधिक चांगले) मिसळून खा.

मधुमेहींचा शत्रू
आंबा गोड लागतो. तसं पाहिलं तर त्यामध्ये नैसर्गिक साखर असते. तरी पण मधुमेह असलेल्यांनी त्याचं सेवन अगदी चवीपुरतं करावं. खाण्याचा अतिरेक करू नये. तसं केल्यास
तो मधुमेहींना हॉॅस्पिटलात नेऊ शकतो.

फोड, चट्टे येतात
आंब्यात उष्णता जास्त असल्याने त्याचं अति सेवन केल्यास चेहर्‍यावर पुरळ येतं. फोड येतात व चट्टेही पडतात. ते जास्त दिवस टिकल्यास चेहर्‍यावर डाग पडू शकतात. म्हणून आंबा, आमरस अधिक प्रमाणात खाऊ नका.

लठ्ठपणा येतो
आंब्यामध्ये जसे रोगप्रतिबंधक घटक आहेत, तशा कॅलरीज्सुद्धा आहेत. साधारण आकाराच्या एका आंब्यात सुमारे 135 कॅलरीज् असतात. शिवाय तो पचायलाही जड असतो. आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यास चरबी साठते आणि वजन वाढतं. माणूस लठ्ठ होतो. तेव्हा आंबा माफक प्रमाणातच खाल्लेला बरा.

खाज सुटते
आंब्याच्या तोंडावर एक चिकट पदार्थ असतो. खाण्यापूर्वी हा चीक नीट साफ केला गेला नाही तर त्रासदायक ठरतो. हा
चीक तोंडाला, हाताला लागल्यास किंवा पोटात गेल्यास अंगाला खाज सुटते. अंगावर पुरळ उठते. इतकेच नव्हे तर घशात खवखव निर्माण होते. घसा बसतो. तेव्हा आंबा खाण्यापूर्वी नीट धुऊन घ्यावा.