भारतीय तरुणांमध्ये झपाट्यानं वाढत आहे नैराश्य; ...

भारतीय तरुणांमध्ये झपाट्यानं वाढत आहे नैराश्य; याचं गांभीर्य लक्षात घ्या (Health Alert: Shocking! India leads The World In Teenage Depression)

Health Alert, Teenage Depression

नैराश्य म्हणजे काय… याचं गांभीर्य लक्षात घ्या, कारण हे जीवावर बेतू शकतं.

नैराश्य हा शब्द आपण नेहमीच ऐकत तसेच बोलत असतो, त्यामुळे तो आपल्याला अगदी साधासा शब्द वाटतो आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु यापुढे याबाबत दुर्लक्ष व्हायला नको. कारण ही एक मानसिक समस्या असून जिवघेणी ठरू शकते. यापूर्वी आपण सेलिब्रिटींच्या नैराश्याबाबत बोलून झालो आहोत, काहींनी तर नैराश्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत.

नैराश्याचं गांभीर्य जाणून घेण्याआधी आपल्याला नैराश्य म्हणजे काय हे नीट समजून घ्यायला हवं.

Health Alert, Teenage Depression

नैराश्य म्हणजे काय आहे?

तर ही एक मानसिक समस्या आहे, ज्यात व्यक्ती हळूहळू निराशेच्या दिशेने जाऊ लागते. रोजच्या दैनंदिन कामांतील रस कमी होत जातो. ती व्यक्ती स्वतःमधेच गुरफटून जाते, कोणालाही भेटण्याची, खाण्या-पिण्याची अगदी कोणाशी बोलण्याचीही यांना रुचि नसते. खाण्या-पिण्याच्या सवयींमधेही बदल संभवतो. मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. ऊर्जा कमी होते. वेळेत या नैराश्याच्या परिस्थितीवर इलाज केला नाही तर ती व्यक्ती आत्महत्येचे पाऊल उचलू शकते.

Health Alert, Teenage Depression

कारणं

विशेष तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शारीरिक, मानसिक आणि समाजिक अशा कोणत्याही कारणांनी नैराश्य येऊ शकतं.

शारीरिक कारणं : एखाद गंभीर वा दीर्घकाळ लांबलेला आजार, हॉर्मोन्स, अनुवांशिकता, औषधांचं सेवन, दुष्परिणाम, व्यसनं इत्यादी.

मानसिक कारणं : नात्यांमधील ताणतणाव, फसवणूक, भावनात्मक कारण, जवळच्या व्यक्तीचा विरह वा मृत्यू इत्यादी.

समाजिक कारणं : नोकरी, आर्थिक चणचण, आजूबाजूचं वातावरण व लोकं, वातावरणातील बदल, अप्रिय घटना, तणाव आदी.

या कारणांमुळे मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल होतो. आणि याचा परिणाम विचार करण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेवर होतो. ज्यामुळे मेंदूच्या काही न्यूरल सर्किट्सच्या कामात बदल होतो.

मेंदूमध्ये न्यूरोट्रांसमीटर्सच्या कमतरतेमुळे नैराश्य येते. न्यूरोट्रांसमीटर हे मेंदूमध्ये आढळणारे रसायन आहे, जे मेंदूच्या विविध भागांमध्ये आणि शरीरामध्ये सुसंवाद किंवा सामंजस्य स्थापित करतात. त्यांच्या कमतरतेमुळे व्यक्तीमध्ये नैराश्याची लक्षणे दिसू लागतात. हे अनुवांशिक आहे म्हणून काही लोकांना इतरांच्या तुलनेत नैराश्यात जाण्याची अधिक शक्यता असते.

Health Alert, Teenage Depression

खूप धोकादायक असू शकतं नैराश्य!

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नैराश्याची समस्या भारतासह संपूर्ण जगात वेगाने पसरत आहे. नैराश्याच्या बाबत भारत हा जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे, चीन दुसऱ्या क्रमांकावर आणि अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील ५६, ६७५, ९६९ लोक नैराश्याने ग्रस्त आहेत, जे भारताच्या लोकसंख्येच्या ४.५% आहे. एवढेच नाही, डब्ल्यूएचओची आकडेवारी असेही दर्शवते की ३६% भारतीय त्यांच्या आयुष्यात कधीना कधी तरी नैराश्याने ग्रस्त असतात.

विशेषतः भारतीय तरुणांमध्ये नैराश्याचं प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. प्रत्येक ४ किशोरवयीनांमध्ये १ जण नैराश्यग्रस्त असल्याचे संशोधनांती समोर आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये नैराश्याचं प्रमाण अधिक आढळून आलं आहे. दहा पुरुषांपैकी एकाला तर दहा महिलांमध्ये पाच जणींना नैराश्याची समस्या असते.

Health Alert, Teenage Depression

नैराश्याच्या ९० टक्के रुग्णांना झोपेची समस्या असते.

नैराश्यामुळे व्यक्ती आपला जवळपास ६५ टक्के वेळ चिंतेत घालवते.

तज्ञांच्या मते, कोणत्याही अप्रिय घटनेचा परिणाम एखाद्या माणसावर जास्तीत जास्त १०० दिवस टिकतो, परंतु काही लोक जुन्या घटनांना पुन्हा पुन्हा खोदून काढत राहतात. ज्यामुळे त्यांच्या जखमा भरत नाहीतच शिवाय त्यांचे मन निराशा आणि वेदनांनी भरलेलं राहतं. जेव्हा ताण मर्यादेच्या पलीकडे वाढतो, तेव्हा हळूहळू तो नैराश्याकडे नेतो. त्यावेळी कोणत्याही कामात मन लागत नाही. उदास वाटतं.

नैराश्याची तीव्रता मनुष्यास आत्महत्येस प्रवृत्त करते. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार दरवर्षी आठ लाखांहून अधिक लोक आत्महत्येमुळे आपला जीव गमावतात. १५ ते २९ वर्षांच्या तरुणांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.

अशा परिस्थितीत, नैराश्य आणि त्याचे गांभीर्य समजून घेऊन, आपल्या जीवनातून ते वेळीच काढून टाकलं पाहिजे. विशेषत: भारतात, जिथे नैराश्यानं लोकांना मोठ्या प्रमाणावर ग्रासलं आहे आणि आजच्या जीवनशैलीमुळे ते येत्या काळात अधिकाधिक वाढण्याची शक्यता आहे.

Health Alert, Teenage Depression

नैराश्य कमी कसं करायचं?

नैराश्य वेळेत आटोक्यात आणणं गरजेचं आहे. त्यासाठी नैराश्यग्रस्त व्यक्तीने यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच स्वतःची मदत केली पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम, नैराश्याचे कारण समजून घ्या आणि ते कारण दूर करण्याचा प्रयत्न करा. निराश होऊन काहीही साध्य होणार नाही.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नैराश्यात असताना व्यक्ती हताश होऊन प्रयत्नच करायचे सोडतात. असं न करता नैराश्याग्रस्त व्यक्तीने आपली दिनचर्या ठरवली पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे.

सगळ्यात आधी दैनंदिन ध्येय ठरवा आणि ते ध्येय असं असावं की तुम्ही ते साध्य करू शकता. जसे की – तुम्ही स्वतःशी ठरवायचं की, रोज सकाळी उठल्यावर मला प्रत्येकासाठी चहा बनवायचा आहे किंवा रोजची भांडी घासायची आहेत, बेडशीट नीट करायची आहे इत्यादी. हे विचित्र वाटलं, तरी जगातील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ यास अत्यंत प्रभावी उपाय मानतात. वास्तविक, यामागे स्वतःला व्यस्त ठेवणे आणि ध्येय साध्य करण्याच्या भावनेने नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास जागृत करणे, असा हेतू आहे.

झोप पूर्ण घ्या, यामुळे उत्साह राहील. झोप येत नसेल तर रूममध्ये बदल करा, अरोमाची मदत घ्या, संगीत ऐका, मात्र मोबाइल आणि टीव्हीपासून दूर राहा. चांगली झोप ही नैराश्य कमी करते आणि आपल्याला ऊर्जाशील बनववते.

आपल्याला होणारा त्रास जवळच्या व्यक्तीला सांगा. मनात ठेवू नका. स्वतःला घरात कोंडून ठेवू नका, बाहेर पडा, लोकांना भेटा.

अगदीच काही नाही जमलं तर निदान बाहेर उन्हामध्ये काही वेळ फेरफटका मारा. यामुळे निराशेकडे दुर्लक्ष करणे सोपे होईल. थंड हवामानात नैराश्य वाढतं आणि ऊन नैराश्य कमी करण्यास मदत करतं. संगीताचा परिणाम थेट हृदय, मेंदू आणि भावनांना प्रभावित करतो. त्याने मन शांत आणि आनंदी बनतं.

Health Alert, Teenage Depression

काहीतरी नवीन करा. जेवायला बाहेर जा, स्वीमिंग वा डान्स क्लासला जा. यामुळे तुम्ही व्यस्त राहाल आणि चांगला अनुभव घ्याल.

सकस आहार घ्या. असं पाहण्यात आलं आहे की, नैराश्यात व्यक्ती जंक फूड वा शरीरास अपायकारक आहार करतात. त्यामुळे नैराश्य अधिक वाढते. यापासून दूर राहा.

आहारात हिरव्या पालेभाज्या, मौसमी फळं आणि सुका मेवा यांचा समावेश करा. यातून मिळणाऱ्या ओमेगा 3 फॅटी ॲसिड्‌स आणि फॉलिक ॲसिडमुळे नैराश्य कमी होते. पालक, एवोकॅडो देखील खाल्ले पाहिजे. 

मद्यपान करू नका किंवा कमी करा.

जेवण बनविताना ते बनविणाऱ्या व्यक्तीच्या भावना चांगल्या असाव्या लागतात. तिनं आनंदी मनाने स्वयंपाक केला पाहिजे. यामुळे खाणाऱ्याच्या भावना देखील संतुलित आणि आनंदी होतात. ही देखील उपचारपद्धतीच आहे.

डायरी लिहिण्याची सवय करा. आपल्या मनात काय चाललं आहे, ते रोज या डायरीत लिहून ठेवत जा. यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत मिळेल. शिवाय छान झोप लागेल.

नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहा. स्वच्छंदी माणसांच्या संपर्कात राहा.

स्वतःच्या उणीवांची गिनती न करता, स्वतःमधील गुणांचा विचार करा.

स्वतःसाठीही कधीतरी वेळ काढा. अधूनमधून कामातून सुट्टी घेऊन आपल्या आवडीच्या गोष्टी करा. रोजची जबाबदारीची कामंही अवश्य करा. कारण कामात व्यस्त राहिल्यामुळे नैराश्याची जाणीव कमी होते.

सकाळी चालायला जा. सकाळची ताजी हवा मन प्रसन्न ठेवते. योग आणि व्यायाम करा, यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करू लागता. फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी राहता. सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा. उशिरा उठल्याने नैराश्य वाढते.

मंत्रांचं उच्चारण करा. यामुळे मन एकाग्र आणि शांत होण्यास मदत होते. याशिवाय सकारात्मक ऊर्जेसाठी ध्यानधारणेचा मार्ग देखील उत्तम आहे.