नीता अंबानी यांना वयाच्या 23 व्या वर्षी डॉक्टरा...

नीता अंबानी यांना वयाच्या 23 व्या वर्षी डॉक्टरांनी सांगितले होते की त्या आई होऊ शकत नाहीत, पण पुढे झाला चमत्कार…(#HBD Nita Ambani Was Told She Could Never Become A Mother At The Age Of 23, This Is How She Dealt With It)

मुकेश अंबानी यांची पत्नी आणि उद्योगपती नीता अंबानी यांची दोन शब्दांत व्याख्या करायची झाल्यास अष्टपैलू हा शब्द अगदी योग्य ठरेल. नवऱ्याला त्याच्या व्यवसायात मदत करणे असो, नवीन योजना आखणे असो किंवा एनजीओ चालवणे असो… नीता अंबानी सर्व काही अगदी चोखपणे करतात. आपण सर्वांनी अनेकदा नीता अंबानींना आयपीएल सामन्यांदरम्यान आपल्या संघाला पाठिंबा देताना पाहिले आहे. नुकताच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्यात त्या वरमाईची सर्व कर्तव्ये अगदी हौशीने पार पाडत होत्या. अनेक प्रसंगी नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी परिमलने आईने त्यांना कसे वाढवले ​​हे शेअर केले आहे. पण मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लग्नानंतर एक काळ असा आला होता, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना कधीच आई होऊ शकत नाही असे सांगितले होते. आज नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी खुलासा केला होता, “मला लग्नानंतर आई व्हायचं होतं, पण लग्नानंतर काही वर्षांनी डॉक्टरांनी सांगितलं की मी आई होऊ शकत नाही. माझ्यासाठी ते धक्कादायक होते. कारण मी शाळेत असतानाही निबंध लिहायचे की मी कधी आई होणार… त्यामुळे लग्नानंतर वयाच्या २३ व्या वर्षी जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मी कधीच आई होऊ शकत नाही, तेव्हा मी पूर्णपणे तुटून गेले होते. पण देवाच्या कृपेने आणि माझी जवळची मैत्रीण डॉ. फिरोजा पारीख यांच्या मदतीने मला जुळी मुले झाली.

याच मुलाखतीत नीता अंबानी यांनी सांगितले होते की, त्यांची गर्भधारणा खूप कठीण होती. त्यांना IVF द्वारे जुळी मुले झाली आणि त्यांचा जन्म लवकर झाला. पण तीन वर्षांनंतर अनंत अंबानींचा नैसर्गिकरित्या जन्म झाला. त्याच्यावेळची गर्भधारणा पूर्णपणे सामान्य होती, परंतु या गर्भधारणेदरम्यान नीता यांचे वजन खूप वाढले होते. याविषयी बोलताना त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मला आई झाल्याचा इतका आनंद झालेला की मी स्वत:ला खूप मोकळीक दिलेली आणि त्यामुळे माझे वजन खूप वाढले.

दुसऱ्या मुलाखतीत नीता यांची मुलगी ईशा अंबानी परिमल हिने सांगितले होते की तिचा आणि भाऊ आकाश अंबानीचा जन्म IVF द्वारे झाला आहे. आईबाबांच्या लग्नाच्या सात वर्षानंतर माझा आणि माझ्या भावाचा आयव्हीएफद्वारे जन्म झाला आणि त्यानंतर माझ्या आईने पूर्णपणे आमच्यावर लक्ष केंद्रीत केले. आम्ही पाच वर्षांचे झाल्यावर ती कामावर परतली.

एका मुलाखतीत, आपल्या मुलांच्या संगोपनाबद्दल मनोरंजक खुलासे करताना, नीता यांनी  सांगितले की, तिने आपल्या मुलांना सामान्य मुलांप्रमाणे वाढवण्याचा खूप प्रयत्न केला. “माझी मुलं लहान असताना मी त्यांना दर शुक्रवारी शाळेच्या कॅन्टीनमध्ये जेवायला पाच रुपये देत असे. एकदा माझा धाकटा मुलगा अनंत धावत माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडे 10 रुपये मागितले. जेव्हा मी त्याला कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याचे मित्र त्याच्यावर हसतात आणि 5 रुपये पाहून म्हणतात की तू अंबानी आहे की भिकारी… त्याचे बोलणे ऐकून मला हसू आवरले नाही.