प्रत्येक जन्मी तुझ्याच पोटी जन्म घेईन, कार्तिक ...

प्रत्येक जन्मी तुझ्याच पोटी जन्म घेईन, कार्तिक आर्यनची वाढदिवसानिमित्त आई-वडिलांसाठी खास नोट (HBD Kartik Aryan: Kartik Aaryan celebrates birthday with his parents, Shares Pics with special note- In every birth I would like to be born as your Koki)

कार्तिक आर्यनची कारकीर्द सध्या प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर आहे. 2022 हे वर्ष कार्तिकसाठी लाभदायक ठरले. यावर्षी, अभिनेत्याच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. त्यामुळे त्याचे नाव देखील बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या यादीत समाविष्ट झाले. कार्तिक आर्यन आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्तिकला त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून आणि मित्रमंडळींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. कार्तिकने आपल्या वाढदिवसाची सुरुवात कुटुंबासोबत केक कापून केली. त्यासंदर्भातला फोटो आणि एक नोट त्याने शेअर केली आहे.


कार्तिक आर्यनने रात्री उशिरा आपला 32 वा वाढदिवस आई-वडिलांसोबत साजरा केला. कार्तिकच्या आईवडिलांनी त्याला वाढदिवसाचे सरप्राईज दिले. या सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशनचे दोन फोटो कार्तिकने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या एका फोटोत कार्तिक केक कापताना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत तो आपल्या आई-वडील आणि पाळीव कुत्र्याला सोबत घेऊन फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.


फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजुबाजुला फुग्यांची सजावट केली असून त्याच्यासमोर केक ठेवण्यात आला आहे. कुटुंबाकडून मिळालेल्या या सरप्राईजने कार्तिक खूप खुश दिसत आहे. हे फोटो शेअर करताना कार्तिकने एक खास नोटही शेअर केली आहे. त्याने लिहिले, “मला प्रत्येक जन्मात तुझ्याच पोटी जन्म घ्यायला आवडेल. वाढदिवसाच्या या सुंदर सरप्राईजसाठी आई-पप्पा, कटोरी आणि किकीचे आभार.” कार्तिकचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. तसेच ते कमेंट करून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.


एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच, कार्तिक आर्यन एक उत्तम माणूस देखील आहे. त्याचे आपल्या कुटुंबाशी एक खास नाते आहे. कार्तिकचे आई-वडील आणि बहिणीसोबतचे नाते खूप छान आहे. तो अनेकदा त्यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. याशिवाय नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान कार्तिकने तो आपला वाढदिवस कसा साजरा करतो ते सांगितले. त्यांने सांगितले की माझ्या वाढदिवसाला माझी आई सत्यनारायणाची कथा ठेवते. यानंतर ती माझ्यासाठी माझे आवडीचे पदार्थ बनवते. त्यात दाल मखनी, पनीर, रायता, पुलाव, पुरी आणि स्पेशल खीर ​​यांचा समावेश असतो. या सर्व गोष्टी लहानपणापासूनच केल्या जात आहेत. आता तर या सर्व आमच्या घरच्या परंपराच झाल्या आहेत.