हरिद्वारमध्ये सुरु झालेल्या कुंभमेळ्यात सहभागी ...

हरिद्वारमध्ये सुरु झालेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी काय आहेत सूचना? (Haridwar Maha Kumbh 2021: Registration, COVID-19 Guidelines & More you Need To Know)

कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम असून हिंदू धर्माचं हे महत्त्वाचं पर्व आहे. कालपासून हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. १२ वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्याचे देशभरातील भाविकांना आकर्षण असते. परंतु यावर्षी करोनामुळे भाविकांची संख्या नेहमीपेक्षा कमी दिसत असून कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करत हा सोहळा साजरा करावयाचा आहे. त्यामुळे भाविकांमधील उत्साहावरही भीतीचं सावट दिसत आहे. सर सलामत तो पगडी पचास असा विचार करत स्थानिक तसेच काही पुरोहितांनीही कुंभमेळ्यात सहभागी होणे टाळले आहे.
याआधी १२ वर्षांपूर्वी म्हणजे २०१०मध्ये हरिद्वारमध्ये कुंभमेळा झाला होता. या मेळ्याला तब्बल ७० लाखांहून जास्त भाविकांनी हजेरी लावली होती. त्यासोबतच पवित्र स्नानासाठीच्या घाटांवर दीड कोटींहून जास्त भाविकांनी उपस्थिती लावली होती.  एरवी कुंभमेळा किमान २ महिन्यांच्या कालावधीसाठी भरवला जातो. मात्र, यंदा करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा कालावधी फक्त ४८ दिवसांचाच ठेवण्यात आला आहे. तसेच कुंभमेळ्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने करोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत.

कुंभमेळ्यासाठी सूचना :
१. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ७२ तास आधी करोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
२. कुंभमेळ्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट पास दिले जातील. ते मिळवण्यासाठी ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
३. महाकुंभमेळा २०२१च्या वेबसाईटवर प्रत्येक भक्ताने नोंदणी करणे आवश्यक आहे. फक्त नोंदणी झालेल्या भाविकांनाच कुंभमेळ्याच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.
४. करोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा परिसरामध्ये सामुहिक भजन किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे
५. पवित्र स्नानाच्या दिवशीच कुंभमेळा परिसरातील दुकानं उघडण्याची परवानगी असेल. त्यातही औषधे, अन्न, दूध, पूजा साहित्य आणि ब्लँकेट्स अशा वस्तूंची किंवा पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांनाच परवानगी देण्यात आली आहे.
६. पवित्र स्नानासाठी प्रत्येक भाविकाला जास्तीत जास्त २० मिनिटांचा कालावधी मिळणार आहे.
७. कुंभमेळा परिसरामध्ये तैनात करण्यात येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ७० हजार करोना व्हॅक्सिनचे डोस मिळावेत, अशी सुविधा स्थानिक जिल्हा प्रशासनाने केली आहे
८. ६५ वर्षांवरील वृद्ध, मुले आणि गर्भवती महिलांनी यंदाच्या वर्षी कुंभमेळ्यास येऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
९. भाविकांच्या फोनवर आरोग्य सेतु ऍप असणे आवश्यक आहे.
कुंभमेळ्यात भाविकांच्या सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. बिनतारी दळणवळण यंत्रणेबरोबरच संपूर्ण कुंभमेळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तेव्हा कुंभमेळा व्यवस्थित पार पडावा यासाठी भाविकांनीही नियमांचे पालन करत प्रशासनाच्या व्यवस्थेस सहकार्य करणे अपेक्षित आहे.