हर घर तिरंगा : तुमच्या घरावर तिरंगा फडकावणार अस...

हर घर तिरंगा : तुमच्या घरावर तिरंगा फडकावणार असाल, तर ‘या’ 10 गोष्टी लक्षात ठेवा (Har Ghar Tiranga : Rules To Be Followed While Hoisting Flag At Your Home )

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हर घर तिरंगा ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असं आवाहन लोकांना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा डीपी बदलला आहे. आता भारताचा राष्ट्रध्वज त्यांनी डीपी म्हणून ठेवला आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरही राष्ट्रध्वज लावला आहे.

मात्र घरी झेंडा फडकावायचा असेल तर त्याचे काही नियम आहेत. त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावात हे आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी भारताची ध्वजसंहिता काय आहे ते पाहूया.

ध्वजसंहिता काय आहे?

राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी ध्वजसंहिता २००२ चं पालन करावं लागतं. तसंच राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा १९७१चंही पालन करावं लागतं. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास मात्र तीन वर्षं तुरुंगवास आणि पहिल्यांदाच गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे. २६ जानेवारी २००२ ला ही संहिता अस्तित्वात आली. याआधी राष्ट्रीय प्रतिकं आणि नावं कायदा १९५० आणि राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा १९७१ अस्तित्वात होता.

या संहितेत नुकतेच दोन मोठे बदल करण्यात आलेत

२० जुलै २०२२ ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकवता येईल. मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकवण्याची परवानगी होती.

३०डिसेंबर २०२१ला केलेल्या बदलानुसार पॉलिस्टरच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी दिली होती. याआधी फक्त खादीच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी होती.

राष्ट्रध्वज फडकावताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात?

सरकारची ध्वजसंहिता याआधी अतिशय कडक होती. आता ती बऱ्यापैकी शिथिल करण्यात आली आहे. तरीही राष्ट्रध्वज फडकवताना खालील गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे.

१. ध्वज फडकवताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तो व्यवस्थित ठिकाणी फडकवावा.

२. भारताचा राष्ट्रध्वज ज्या उंचीवर फडकवला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकवू नये.

३. कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.

४. ध्वज फडकवताना नारिंगी रंग वर राहील याची दक्षता घ्यावी.

५. ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नये.

६. ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.

७. ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं गरज असल्यास ठेवता येतील.

८. राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसंच पाण्यावर तरंगलेला नसावा.

९. कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर, ध्वजाचा वापर करू नये. तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन, अंर्तवस्त्रं यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये.

१०. जेव्हा ध्वज फडकवतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.

तुमच्या घरी ध्वज फडकवण्याचा विचार करत असाल तर हे नियम नक्की लक्षात घ्यावेत.

‘हर घर तिरंगा’ अभियान नक्की काय आहे?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून हर घर तिरंगा उपक्रम साजरा होत आहे. केंद्र सरकारने या अभियानाअंतर्गत २० कोटी घरांवर झेंडा फडकावण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भारतीय राष्ट्रध्वज तयार केले जात आहेत. कामगारांकडून मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज विक्रीसाठी बनवले जात आहेत. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार झेंडे तीन वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असतील. त्यांची किंमत ९, १८ आणि २५ इतकी असेल.

अभियानाचा एकूण खर्च

केंद्र सरकारचं लक्ष्य २० कोटी घरांवर तिरंगा फडकावण्याचं आहे. झेंड्याची किंमत १० रुपये असेल तर या अभियानावर २०० कोटी रुपये खर्च होतील. इतक्या मोठ्या प्रमाणावर झेंड्याचा व्यापार आजपर्यंत झाला नसेल हे निश्चित. यासाठी बचत गट, छोटे आणि मध्यम व्यापारी आणि मोठ्या कंपन्यांना निविदा देण्यात आल्या आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना झेंडा उपलब्ध होईल.