स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी (Happy Mothe...

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी (Happy Mother’s Day)

आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. क्षमाशील वृत्तीने मुलांचा अपराध पोटात घालणारी, संकटाच्या वेळी मुलांवर मायेचा पदर पांघरून मुलांना कुशीत घेणारी, त्यांच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारी आई ही परमेश्वराचेच दुसरे रूप आहे, असेच म्हणावे लागेल… हे सगळं या आईसाठीच्या खास दिवशी आपल्याला आठवतं. इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी अशी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरिक्षण सर्वांनाच लागू पडते असे नाही. पण, आईबद्दल भरभरुन बोलले जाते ते म्हणजे ज्या दिवशी असतो मातृदिन. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदाही हा दिवस जगभरात साजरा केला जाईल. असा हा मातृदिन अर्थातच मदर्स साजरा करण्यास नेमकी सुरुवात कशी झाली? जाणून घेऊयात मदर्स डे इतिहास आणि बरंच काही…आईला सन्मान देण्यासाठी जगभरात मे महिन्यातील दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. या वर्षी ९मे म्हणजे आज मदर्स डे साजरा केला जाणार आहे.

कशी झाली मदर्स डेची सुरुवात ?

आईला सन्मान देणाऱ्या मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस आपल्या आईवर खूप प्रेम करायची. तिने ना लग्न केले ना मुले जन्माला घातली. आईचा मृत्यू झाल्यावर तिने या दिवसाची सुरुवात केली. मग हळूहळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली.

मेच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मदर्स डे ?

९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये लिहिले होते की, मेच्या दुसऱ्या रविवारी मदर्ड डे साजरा केला जाईल. त्यानंतर मदर्स डे अमेरिकासह इतर देशांमध्ये याच दिवशी साजरा केला जाऊ लागला.

आई या स्त्री चे प्रत्येकाच्या आयुष्यात खास स्थान असते. आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही असं आपण नेहमीच म्हणतो आणि ते खरंही आहे. देवाला सर्व ठिकाणी पोहचणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आई बनवली असं म्हटलं जातं. आज मदर्स डे (Mother’s Day) आहे. आपण आपल्या आईवर खूप प्रेम करतो पण सर्वात जास्त तिलाच गृहीत धरतो. त्यामुळे किमान आजच्या दिवशी तरी तिचा दिवस साजरा करून तिला आराम देण्याचा आपला विचार असतो.

इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतलता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं…

सांप्रतकाळी आपण प्रचंड श्रीमंत झालेलो आहोत, आपले खिसे पैशांनी तुडुंब भरलेले आहेत, त्याच्या जोरावर जगात काहीही विकत घेण्याची भाषा आपण करू लागलोय. एवढं सगळं विकत घेण्याची दानत असलेल्या आपल्यातला माणसाला आई मात्र विकत घेताच येणार नाही. म्हणून माणूस कितीही म्हणत असला की मी श्रीमंत आहे, तरीही तो आईशिवाय मात्र दरिद्रीच राहील. आईचा मुलगा कुठल्याही मोठ्या हुद्द्यावर असू दे…अगदी देशाचा राजा जरी असला तरी तो आईसाठी लेकरूच असतो. ही खरी ताकद आहे आईपणाची!

आई असते जन्माची शिदोरी

सरतही नाही उरतही नाही

आई एक नाव असतं

घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं

– कविवर्य फ. मुं. शिंदे