दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला वाढदिवसाच्या अनेक श...

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा… (Happy Birthday To Sonakshi Sinha)

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आज वाढदिवस आहे. सोनाक्षीनं आजवर अनेक सिनेमांमध्ये तिच्या दमदार अभिनयाची जादू दाखवली आहे. २०१० सालामध्ये आलेल्या ‘दबंग’ सिनेमातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सोनाक्षीचे वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना तिने चित्रपटात यावे असे बिलकूल वाटत नव्हते, मात्र सलमानने विनवणी केल्यानंतर त्यांनी परवानगी दिली. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी सोनालीला मोठी मेहनत घ्यावी लागली होती. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सोनाक्षीचं वजनं तब्बल ९० किलो होतं. आणि नायिकेच्या भूमिकेसाठी तिनं ३० किलो वजन कमी केलं होतं, त्यासाठी तिला २ वर्षं लागली. सोनाक्षीबाबत अजूनही काही मजेशीर गोष्टी आहेत, त्या जाणून घेऊयात.
करोना काळात मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा इत्यादी सूचना देत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी वेळोवेळी सोनाक्षीनं तिचं योगदान दिलं आहे.
संजय लीला भन्साली हे सोनाक्षीचे आवडते दिग्दर्शक, हृतिक रोशन आणि रसेल पीटर्स हे आवडते अभिनेते आणि राणी मुखर्जी ही तिची आवडती अभिनेत्री आहे. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटापासूनच सोनाक्षीला हृतिक रोशन आवडू लागला होता.
सोनाक्षीने फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केली असून अभिनयात येण्यापूर्वी कॉश्च्युम डिझायनर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिने ‘दिल लेके देखो’ या चित्रपटासाठी कॉश्च्युम डिझाइन केलं होतं.
सोनाक्षी उत्तम पेंटर आहे. फावल्या वेळात घरी असलेल्या स्टुडिओमध्ये ती पेंटिंग करते.
सोनाक्षीने मॉडलिंगचाही अनुभव घेतला आहे. अनेक फॅशन शोज मध्ये तिने रॅम्प वॉक केलं आहे. चित्रपटांत येण्याकरिता तसेच वजन कमी करण्याकरिता सलमान खानने सोनाक्षीला बरीच मदत केली आहे. तो तिला खूप चालवायचा.
तिला झिरो फिगरचा मोह नाही. मात्र शरीर वळणदार असावं आणि सोबतच फिट असणं गरजेचं आहे. केवळ सडपातळ असून उपयोग नाही, हेल्दी असणं जास्त गरजेचं आहे, असं ती मानते.
आपल्या वडिलांच्या भावना व सन्मान यांचा आदर राखत सोनाक्षीने चित्रपटात कधीही किसिंग सीन दिले नाही, तसेच कधीही बिकिनी घातली नाही.
अभिनेत्री रिना रॉय आणि तिच्या चेहऱ्यातील साम्य ती नाकारते आणि आपला चेहरा आपल्या आईसारखा पुनम सिन्हासारखा दिसतो, असं ती म्हणते.
सोनाक्षी सिन्हा प्रचंड फूडी आहे. तिला इंडियन व थाई फूड आवडते.
सोनाक्षीला साडी नेसावयास आवडते. बरेचदा चित्रपटांमध्ये ती साडी नेसते. लुटेरा चित्रपटाच्या एका गाण्यासाठी तिने नऊ साड्या बदलल्या होत्या.
अभिनयासोबतच तिला गाणं देखील गाता येतं. ‘रियो २’ या चित्रपटातील ज्वेल नावाच्या पात्रासाठी ती गायली होती तसेच त्यासाठी तिने आवाजही दिला होता.
अभिनेता सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदेवसोबत सोनाक्षीचं नाव घेतलं जात होतं. त्यानंतर रणवीर सिंह, शाहिद कपूर यांच्याशीही तिचं नाव जोडलं गेलं. वजन कमी करण्यासाठी सोनाक्षीने शाहिद कपूरच्या ट्रेनरची मदत घेतली होती.
अक्षय कुमार सोबत तिची जोडी यशस्वी ठरली. या जोडगोळीचे सर्वच चित्रपट हिट झाले.
सोनाक्षीला कबड्डी खेळ आवडतो. यूनायटेड सिंग्स नावाच्या कबड्डी टीम मध्ये इंग्लंड येथील हायरे ग्रुप कंपनीशी तिची भागिदारी आहे.
प्राण्यांचा लळा असल्यामुळे पेटाच्या कॅम्पेनमध्येही ती सहभाग घेते.
फिट राहण्यासाठी व्यायामापासून डाएटपर्यंत सगळ्या गोष्टींचे ती पालन करते. तिच्या वर्कआऊटमध्ये कार्डियो एक्सरसाइज, साइकलिंग, स्विमिंग, पिलाटे, स्किपिंग, बेटल रोप्स, हॉट योग, टेनिस आदीचा समावेश असतो.
फिटनेसच्या बाबत निरोगी शरीर आणि निरोगी मन यावर तिचा विश्वास आहे. आनंदी राहण्यासाठी ती नेहमी सकारात्मक राहते. आणि मन निरोगी ठेवण्यासाठी ध्यानधारणा करते.
सोनाक्षीने एखाद्या समजुतदार मुलाला डेट करावे असे तिच्या आई-वडिलांना वाटते. परंतु चित्रसृष्टीत असा एकही मुलगा नाही… सगळ्यांपासून लपवून ठेवून एका सेलिब्रिटीला डेट केलं होतं… पण तिनं कधी त्याचं नाव सांगितलं नाही.
तिचे आगामी चित्रपट ‘क्रेझी हम’ आणि ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’ मध्ये सोनाक्षीचा वेगळाच अवतार पाहावयास मिळणार आहे. वडिलांची लाडकी सोनाक्षीचे बालपणीचे आणि आजचे फोटो पाहुया.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अनेक चाहते सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याने सोनाक्षी ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आली होती. मात्र सोनाक्षी ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आल्यानंतर काही वेळेतच तिचे अनेक विनोदी मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले आहेत. काही युजर्स सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर काहींनी मीम्स शेअर करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी तर तिच्यावर बॉडी शेमिंग कमेंट केल्या आहेत.