आज शाहरूख खानचा वाढदिवस : त्या निमित्ताने त्याच...

आज शाहरूख खानचा वाढदिवस : त्या निमित्ताने त्याचा ‘दिलवाले दुल्हनियां – ’ पुन्हा पीव्हीआर चित्रपटगृहातून प्रदर्शित (Happy Birthday Shah Rukh Khan : His ‘Dilwale Dulhaniya….’ Film To Be Released In PVR Cinemas Again On This Occassion)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) मनोरंजन विश्वाचा किंग खान आज त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे‌. शाहरुख खानचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुख खानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एका सणापेक्षाही कमी नाही. शाहरूख खानचा फॅन्सने रात्रीपासून शाहरूखच्या ‘मन्नत’ बंगल्या बाहेर गर्दी केली असून आपल्या लाडक्या शाहरूखला ते शुभेच्छा देत आहेत. कुणी त्याच्यासाठी फुलं आणली आहेत तर कुणी भेटवस्तू, तर कुणी पोस्टर घेऊन पोहोचलं आहे.

आपल्या फॅन्सचे प्रेम पाहून शाहरूख खानने पण बाल्कनीतून त्यांना अभिवादन केले. तेव्हा त्याचा लहान मुलगा अबरामही त्याच्यासोबत होता. शाहरुखने त्याची नेहमीची पोज देत म्हणजे हात पसरवून चाहत्यांचे प्रेम स्वीकारले.

आज २ नोव्हेंबर रोजी शाहरुखच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील पीव्हीआरच्या चित्रपटगृहांतून शाहरुख आणि काजोल यांच्या एव्हरग्रीन जोडीचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येत आहे. २७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे जगभरात लाखो चाहते आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, अहमदाबाद, लखनऊ, पुणे आणि सुरतमध्ये या चित्रपटाचे आधीच ॲडव्हान्स बुकिंग झालेले आहे. २० ऑक्टोबर १९९५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हापासून गेली २७ वर्षे मुंबईतील मराठा मंदिरमध्येही दिलवाले दुल्हनिया… चे अजूनही शो पाहिले जात आहेत. यावरून या चित्रपटाची क्रेझ लक्षात आलीच असेलच.

शाहरुख खान चार दशकांहून अधिक काळ कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. मग तो राज असो किंवा राहुल. शाहरूख ने 1989 मध्ये ‘दीवाना’ चित्रपटातून पदार्पण केले‌. त्यानंतर ‘कुछ कुछ होता है…’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कल हो ना हो’, ‘स्वदेस’, ओम शांती यांसारख्या चित्रपटांतून आपली अभिनयाची छाप पाडली. ओम’, ‘चक दे!’, ‘रईस’ आणि बरेच काही न संपणारी लिस्ट आहे.

आज शाहरुखच्या वाढदिवशी त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. पाच वर्षानंतर शाहरुख खान पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सिद्धार्थ आनंद यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांना पाहता येईल.