हॅपी बर्थ डे माधुरी दीक्षित : ती सांगतेय् आपल्य...

हॅपी बर्थ डे माधुरी दीक्षित : ती सांगतेय् आपल्या सौंदर्याचं रहस्य (Happy Birthday Madhuri Dixit : She Shares Her Beauty Secrets)

काही व्यक्ती सदैव चिरतरुण राहतात. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे केवळ अशक्य असते. लाखो चाहत्यांच्या हृदयाची स्पंदने वाढवणाऱ्या माधुरी दीक्षितबाबत आपणास असं म्हणता येईल. आज माधुरीचा वाढदिवस आहे. आज ती ५४ वर्षांची झाली आहे, परंतु आजही तिचं खळाळतं सुहास्य आणि निरागस सौंदर्य वेड लावणारं आहे. माधुरीचे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन! माधुरीचा डान्स असो, अभिनय असो वा सौंदर्य… तिची एक झलक पाहण्यासाठी, आणि तिच्या या सौंदर्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झालेले असतात. आज तिच्या जन्मदिवशी तिनेच सांगितलेले तिच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घेऊया.
चाहत्यांचं प्रेम हेच माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे रहस्य

अत्यंत गोड आणि अगदी भारतीय सौंदर्याच्या सर्व व्याख्यांत फिट बसेल असा चेहरा माधुरीला लाभलाय. त्यामुळंच ती रूपेरी पडद्यावर येताच अनेकांनी मधुबालाच्या सौंदर्याशी तिची तुलना केली. आपल्या सौंदर्याचं रहस्य सांगताना माधुरी म्हणते की, जीवनात सर्वप्रथम शिस्त अंगी बाणवली पाहिजे. नियमित व्यायाम, योग आणि सकस आहार आपल्या शरीराबरोबरच मनाचं सौंदर्य देखील राखते. लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात, त्यांच्या प्रेमामुळेच मी सुंदर दिसते, असं माधुरी सांगते. चाहत्यांचं प्रेम हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे, असं ती सांगते.
माधुरीची नृत्यनिपुणता आणि तिचं खळाळतं, निरागस हास्य! या गोष्टीमुळं माधुरी इतर नायिकांपेक्षा वेगळी ठरते. एकापेक्षा एक जबरदस्त नृत्ये करून तिनं एका आख्ख्या पिढीला घायाळ केलं… आणि आजही करतेय. तर दुसरीकडे माधुरीच्या हास्याची ‘मोहिनी’… अशी आहे की सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. माधुरीने आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्याची खोटी, व्वाह, अफलातून.. अशी प्रतिक्रिया चाहत्यांकडून आल्याशिवाय राहत नाहीत.

पन्नाशीनंतरही माधुरीचं सौंदर्य अबाधित आहे. अलीकडेच माधुरीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या सुंदर केसांचंही रहस्य सांगितलं होतं. माधुरीने त्यात केसांची काळजी कशी घ्यावी, याबाबत काही टीप्स सांगितल्या होत्या.

केसांसाठी घरच्या घरी तेल बनवविण्याची पद्धत –
माधुरी ने बताया घर पर तेल बनाने का ये आसान तरीका :
अर्धा कप खोबरेल तेल, १ छोटा किसलेला कांदा, १५-२० कडिपत्त्याची पानं आणि एक चमचा मेथीचे दाणे हे सर्व साहित्य एकत्र करून मंद आचेवर शिजू द्या. तेल चांगलं उकळलं, की मग आचेवरून खाली घेऊन थंड होऊ द्या. नंतर ते तेल गाळून काचेच्या बाटलीत भरून ठेवा आणि दोन दिवस बाटली उघडू नका. दोन दिवसानंतर यातील तेल केसांना लावून व्यवस्थित मसाज करा. ४० मिनिटं केसांना तेल ठेवून मग शाम्पू करा. तुम्ही रात्री केसांना तेल लावून सकाळी शाम्पू केलं तरी चालतं.

माधुरीने सांगितलेली हेअर मास्कची कृती
माधुरी आपल्या केसांसाठी घरीच बनवलेला हेअर मास्क वापरते. ज्यामुळे तिचे केस मऊ आणि चमकदार दिसतात. हा मास्क बनविण्यासाठी – १ पिकलेलं केळ, २ चमचे दही आणि १ चमचा मध घेऊन हे मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण ३० मिनिटं केसांना लावून ठेवावे आणि मग शाम्पूने धुवून टाकावे. हा मास्क लावल्यानंतर केसांना वेगळा कंडीशनर लावण्याची गरज भासत नाही.

काही व्यक्तींना वयाच्या फूटपट्ट्या लावताच येत नाहीत. माधुरीच्या चाहत्यांसाठी माधुरी पंचविशीतच आहे. माधुरी दीक्षित नावाची ही मध्यमवर्गीय मराठी मुलगी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ्या जिद्दीनं सुपरस्टार झाली आणि तिनं भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या प्रेक्षकांच्या हृदयावर तब्बल दोन दशकं राज्य केलं आहे. आजही ती अनेकांच्या दिलाची धडकन बनून धक धक गर्ल म्हणूनच ओळखली जाते.