एकता कपूरचा आज वाढदिवस :ऐका तिची यशोगाथा (Happy...

एकता कपूरचा आज वाढदिवस :ऐका तिची यशोगाथा (Happy Birthday Ekta Kapoor : Take A Look At Her Success Story )

हम पांच, क्योंकि सास भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी  की यांसारख्या अजरामर मालिकांची निर्माती म्हणजे एकता कपूर. सध्याच्या घडीला एकता कपूरही सर्वात यशस्वी निर्माती म्हणून ओळखली जाते. ही टेलिव्हिजन क्वीन तिचा ४७ वा वाढदिवस आज साजरा करत आहे. एकताने तिच्या करियरमध्ये 39 चित्रपट, 45 वेबसिरीज आणि 135 हून अधिक डेली सोपची निर्मिती केली. पण तिच्या करियरची सुरुवात मात्र एका साध्याशा नोकरीतून झालेली. विशेष म्हणजे एकताचे वडिल जितेंद्र हे हिंदी सिनेसृष्टीतले एक प्रसिद्ध नट. पण त्याच्या स्टारडमचा वापर न करता एकताने तिचे आजचे इंडस्ट्रीतले स्थान पक्के केले.

एकताचा जन्म 7 जून 1975 मध्ये मुंबईत झाला. वडिल अभिनेते आणि आई निर्माती असल्यामुळे तिचे बालपण फिल्मी वातावरणातच गेले. स्टारकिड असल्यामुळे एकताचे सारे लाड पुरवले जायचे. त्यावेळी तिचा कल पार्टी वगैरे सारख्या गोष्टींकडे अधिक होता. त्यामुळे अचानक घरातून पैसे मिळणे बंद झाले व या पार्ट्या करण्यापेक्षा लग्न तरी कर नाहीतर स्वत: पैसे कमवायला सुरुवात कर अशी तिच्या वडिलांनी तंबी दिली.

वडिलांचे हे बोलणे एकताच्या इतके मनाला लागले की तिने निर्माते कैलाश सुरेंद्रनाथ यांच्याकडे इंटर्नशिप करण्यास सुरुवात केली. ती  पूर्ण झाल्यावर तिने तिथल्याच अॅड कंपनीत नोकरी केली. त्यावेळी ती केवळ 17 वर्षांची होती. आपल्या मुलीची कामाची आवड आणि त्यातली प्रगती पाहता जितेंद्र यांनी एकताला आर्थिक मदत देऊ केली. त्या पैशांनी एकताने बालाजी टेलिफिल्मचे काम सुरु केले.

त्यानंतर एकताने काही शो बनवले व त्यातले काही एपिसोड चॅनलला दाखवले पण सगळ्या चॅनल्सनी तिचे शो रिजेक्ट केले. या सर्व प्रकारात तिचे तब्बल 50 लाखांचे नुकसान झाले.  1995 मध्ये आलेल्या हम पांच या मालिकेने इतिहास रचला व एकताला एक निर्माती म्हणून ओळख दिली. एकताचा ज्योतिष शास्त्रावर फार विश्वास. 1999 मध्ये एकताची कन्यादान मालिका हिट ठरल्यानंतर तिने तिच्या 27 वर्षांच्या करियर मध्ये क अक्षरापासून सुरु होणाऱ्या तब्बल 63 मालिका बनवल्या. त्यामध्ये  क्योंकि सास भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी की, कहानी घर-घर की, कभी सौतन कभी सहेली, कोई अपना सा, कहीं किसी रोज, कुटुंब, कुसुम, कितनी मोहब्बत है, काव्यांजलि, कयामतसारख्या मालिकांचा समावेश होतो. एकताने तिच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये कृष्णा कॉटेज, लव सेक्स और धोखा, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, द डर्टी पिक्चर, रागिनी एमएमएस, हाफ गर्लफ्रेंड, एक विलेन, ड्रीम गर्ल सारख्या 39 चित्रपटांची निर्माती केली.

एकताच्या बालाजी फिल्म प्रॉडक्शन हाऊसची किंमत 400 करोड आहे. तिने 2012 मध्ये मुंबईत घर खरेदी केले होते त्याची किंमत आता 7 करोड रुपये आहे. घराव्यतिरिक्त तिची देशभरात खूप रिअल इस्टेट प्रॉपर्टी आहे. 2017 मध्ये एकताने ओटीटी प्लेटफॉर्मवर अल्ट बालाजी लॉन्च केले जे भारतीय टीव्ही शो स्ट्रीम करणारे पहिले डिजिटल अॅप आहे. एकता कपूरने लग्न केले नाही हे सर्वजण जाणतात पण तिला आई व्हायचे होते. वयाच्या 36 व्या वर्षी एकताने तिचे एग फ्रीज करुन घेतले. त्यानंतर 44 व्या वर्षी सरोगसीद्वारे तिला मुलगा झाला त्याचे नाव तिने रवि कपूर ठेवले आहे.