हॅपी बर्थडे एकता कपूर : टेलिव्हिजन क्वीन एकता क...

हॅपी बर्थडे एकता कपूर : टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरबद्दल या गोष्टी माहित आहेत का? (Happy Birthday Ekta kapoor: 10 Unknown Facts About Television Queen)

टेलिव्हिजन क्वीन अशी ओळख असलेल्या एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयातच एकताने मालिका आणि सिनेमांच्या निर्मिती क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. आजवर अनेक मालिकांची निर्मिती करत एकताने टेलिव्हजन क्षेत्रात अनेक बदल घडवून आपलं वर्चस्व निर्माण केलंय. मालिकाच नाही तर सिनेमा आणि वेब सीरिजच्या निर्मितीतूनही तिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. एकता कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

१) एकता कपूर ही दिग्गज अभिनेते जितेंद्र यांची मुलगी असून एकताचा जन्म ७ जून १९७५ला झाला होता. अवघ्या १७व्या वर्षांची असतानाच एकताला निर्मिती क्षेत्रात काम करण्याची रुची निर्माण झाली होती.

२) करिअरच्या सुरुवातीला एकता कपूरने जाहीरात आणि चित्रपट निर्माता कैलाश सुरेंद्रनाथ यांच्यासोबत शुटिंगमध्ये सहभाग घेतला होता.

३) एकताने आपल्या करिअरची सुरुवात दूरदर्शनपासून केली. टी. व्ही. शो ‘हम पांच’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर-घर की’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’, ‘ये हैं मोहब्बतें’ यांसारख्या अनेक मालिका तिने बनवल्या, ज्या अतिशय लोकप्रिय ठरल्या. एकताच्या बहुतांशी टी. व्ही. मालिका टीआरपीत अव्वल ठरल्या आहेत.

४) एकता कपूरने टेलिव्हिजन क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला आणि त्यास एक नवी ओळख दिली. एकताने टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. आता टेलिव्हिजन क्षेत्र इतकं व्यापक बनलं आहे की येथील स्टारपासून स्पॉट बॉयपर्यंत प्रत्येकाचं व्यवस्थित उदरभरण होत आहे. याचं बरंचसं श्रेय एकताला जातं.

५) टि.व्ही.च्या छोट्या पडद्यापासून बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत तसेच वेब सीरिजमध्येही एकता कपूरचे वर्चस्व आपण पाहतो. एकताने संधी दिलेले अनेक अभिनेता तसेच अभिनेत्रीही आज अतिशय यशस्वीपणे मोठ्या पडद्यावरही काम करताना दिसतात. विद्या बालन, प्राची देसाई, सुशांत सिंह राजपूत, सुरवीन चावला यांसारख्या कलाकारांना पहिली संधी देण्याचे श्रेय एकताकडे जातं.

६) एकता अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात विश्वास ठेवते. ती तिचं कोणतंही काम मुहूर्त पाहून करते. मालिका किंवा सिनेमाचं नाव ठेवतानाही ती या गोष्टींना ध्यानात ठेवूनच नाव ठरवते. तिच्या बहुतांशी मालिकांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एक्स्ट्रा शब्द दिसतात.

७) बोल्ड विषयांवरील वेब सीरीज आणि वेब सिनेमा यामुळेदेखील एकता कपूर अनेकदा चर्चेत आली आहे. एकता ने वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, शोर इन द सिटी, रागिनी एमएमएस, द डर्टी पिक्चर असे बोल्ड सिनेमे बनवून सिनेसृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

८) एकता ४६ वर्षांची झाली असून ती अजूनही सिंगल आहे. एकताला रवि हा मुलगा आहे. सरोगसीच्या मदतीने २७ जानेवारी २०१९ला रविचा जन्म झाला. एकता सिंगल मदर असून मुलाचा सांभाळ करतेय. आपल्या मुलासोबतचे अनेक फोटो एकता सोशल मीडियावर शेअर करत असते. एकताने आपल्या एका मुलाखतीमध्ये अविवाहित राहण्याचे कारण सांगताना म्हटलं होतं की -”ती १७ वर्षांची असताना तिचे वडील जितेंद्रजीनी तिला एकतर काम कर किंवा लग्न असं म्हटलं होतं. ‘तू आधी काम करावंस, असं मला वाटतंय’, असंही ते पुढे म्हणाले. त्यानंतर एकताने ॲड एजन्सीपासून कामाला सुरुवात करत आज आपल्या क्षेत्रात नवा इतिहास रचून दाखवला. आज जितेंद्रजींना आपल्या मुलीचा अभिमान आहे. परंतु लग्नाची इच्छा असतानाही एकताला आजपर्यंत लग्नाचा योग आलेला नाही.”

९) बोल्ड विषयांवरील वेब सीरीज आणि वेब सिनेमा यामुळे एकता कपूरवर आरोपही लावले गेले होते. तिच्या ट्रिपल एक्स (XXX), गंदी बात यांसारख्या वेब सीरीज वादग्रस्त ठरल्या होत्या.

१०) एकता कपूरची बालाजीवर अमाप श्रद्धा आहे आणि ती भरपूर पूजाअर्चा करते. या व्यतिरिक्त तिच्या बोटांमध्ये भरपूर अंगठ्या घातलेल्या असतात. हा माझ्या विश्वास आहे, अंधविश्वास नाही असे एकता म्हणते.