विनोदाचा बादशहा अशोक सराफ यांचे 75 व्या वर्षात ...

विनोदाचा बादशहा अशोक सराफ यांचे 75 व्या वर्षात पदार्पण [Happy Birthday: Comedy King Ashok Saraf Enters Into His 75 th Year]

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशहा म्हणून ज्यांनी गेल्या ४ दशकांहून अधिक काळ गाजवला ते सर्वांचे लाडके अशोकमामा आता त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करणार आहेत. येत्या ४ जूनला त्यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष साजरं होईल. अशोक सराफ हे एक उत्तम अभिनेता आहेत. विनोदी भूमिका हा त्यांचा हातखंडा आहे या गोष्टी आपण सारेच जण जाणतो. पण त्याही पलिकडे मराठी सिनेसृष्टीला अशोक ‘मामा’ कसे मिळाले. वयाच्या ७५ वर्षाच्या पडद्या मागे अशोकमामांचं आयुष्य कसं होतं याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

सगळ्यांच्या लाडक्या अशोकमामांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबईतील चिखलवाडी येथे झाला. १९४७ चा काळ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक कुमार गाजवत होते. अशोकमामांचे आईवडिल अशोक कुमारांचे फार मोठे चाहते त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव देखील अशोकच ठेवले. पुढे दक्षिण मुंबई मधील चिखलवाडी या भागात ते लहानाचे मोठे झाले. मुंबईतील शेठ डी. जी. टी . हायस्कूल मधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे महाविद्यालयीन वयात ते रंगभूमीवर कार्यरत होते.

आपल्या मुलाने मोठं झाल्यावर चांगल्या पदावर चांगल्या पगाराची नोकरी करावी हा हट्ट साधारण सगळ्याच सर्वसामान्य घरातल्या पालकांचा असतो. तसाच हट्टवजा आग्रह अशोक मामांच्या पालकांचा देखील होता. त्यामुळे त्यांच्या इच्छेखातर अशोकमामांनी १९६७ साली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी स्विकारली. ही नोकरी त्यांना आर्टीस्ट कोट्यातून मिळाली होती. असे म्हणतात की, एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडत असेल तर ती आपल्याला कशीही मिळते. तसेच काहीसे अशोकमामांच्या बाबतीत झाले. बॅंकेत नोकरी करत असतानाच त्यांना आंतरबॅंक एकांकिकेत सहभाग घेण्याची संधी मिळाली व त्याचे सोने करत त्यांनी त्यात प्रथम पारितोषिक मिळवले. पुढे १० वर्षे नोकरी सांभाळत ते नाटकामार्फत त्यांचे अभिनयाचे वेड जिवंत ठेवत होते.

मात्र पुढे दोन्ही गोष्टींचा एकत्र मेळ घालणे त्यांना थोडे अवघड जाऊ लागले. त्यामुळे नोकरी की अभिनय या दोघांपैकी एक निवडण्यावाचून त्यांना काही पर्याय नव्हता. पण तरीही त्यात गोंधळून न जाता अशोकमामांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजेच अभिनयाकडे मोर्चा वळवला. वि.स. खांडेकरांच्या ‘ययाति’ या कादंबरीवर आधारित नाटकात त्यांनी भाग घेतला होता. या नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका साकारुन अभिनयातील करिअरची मुहूर्तमेढ रोवली. पुढे १९७१ मध्ये “दोन्ही घरचा पाहुणा” या चित्रपटात त्यांना छोटासा पण दमदार रोल मिळाला. त्यानंतर अशोकमामांनी ४ वर्षे त्यांच्या कामात ब्रेक घेतला. दरम्यानच्या काळात त्यांनी त्यांच्याकडून घडलेल्या अभिनयातल्या चुकांवर सखोल अभ्यास केला. त्यात काय नावीन्य आणता येईल या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार केला. आणि अचानक एक दिवस अशोक मामांना दादा कोंडके यांच्याकडून बालावणे आले. त्यांनीच पांडु हवालदार ही अशोकमामांच्या करियरला दिशा देणारी भूमिका त्यांचा पदरात टाकली. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या “दामाद ” या चित्रपटामधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर अशोकमामांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. किंबहुना त्या काळी अशोक सराफ जर चित्रपटात असतील तर चित्रपट चालतोच असंच समीकरण बनून गेलं होतं. त्यामुळे बऱ्याच चित्रपटांच्या कथा त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिल्या जात होत्या.

सर्वकाही बरं चालू असताना अचानक तमाशापटांचा काळ आला आणि मराठी चित्रपटसृष्टीला उतरती कळा लागली. अशावेळी प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटांकडे खेचून आणण्याचे आव्हान अशोकमामांनी पेललं आणि त्यांना साथ मिळाली ती दस्तुरखुद्द लक्ष्मीकांत बेर्डेंची. त्याकाळी आमच्या जोडीने मराठी चित्रपटसृष्टी जगवली असे अशोकमामा अभिमानाने सांगतात.

अशोकमामा जरी विनोदी बादशहा म्हणून नावारुपाला आले असले तरी त्यांना गंभीर भूमिका साकारायला जास्त आवडतात. सुरुवातीच्या काळात अनेक विनोदी भूमिका केल्याने तोच ठप्पा त्यांच्यावर बसला होता. मात्र तो पुसून टाकण्यासाठी त्यांनी काही खलनायकी पात्र सुद्धा साकारली (अरे संसार संसार, पंढरीची वारी). प्रेक्षक त्यांना वेगळ्या भूमिकेत स्विकारतील का याबाबत साशंक असताना त्यांच्या या भूमिका सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडल्या. अशोकमामांनी बॉलिवुडमध्ये सुद्धा काम केले. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना हवीतशी किंमत नाही पण मराठी कलाकार हे रंगभूमीचे कलाकार असल्याची जाणीव असल्याने ते आपल्याला टरकून असतात, असे अशोकमामा सांगतात. 

मघापासून आपण अशोक सराफ यांचा उल्लेख अशोकमामा म्हणून करत आहोत. खरेतर अख्खी इंडस्ट्रीच त्यांना प्रेमाने अशोकमामा म्हणून संबोधते. पण त्यांच्या या ‘मामा’ बनण्यापाठी सुद्धा एक कहाणी आहे बरं का ! …सुरुवातीच्या काळात त्यांना सर्वजण अशोकजी अशीच हाक मारायचे. पण त्यांच्या सेटवर कोल्हापुरातली बरीच माणसे कामाला होती. त्यांना हे अशोकजी म्हणणं थोड अवघडल्यासारखं वाटायचं. एकदा एका कॅमेरामनची मुलगी त्यांना भेटायला गेली. त्यावेळी तिच्या वडिलांनी हे अशोक मामा अशी ओळख करुन दिली. पुढे तो कॅमेरामनसुद्धा त्यांना अशोकमामा म्हणूनच हाक मारु लागला. त्याचे पाहून इतरांनी पण अशोकमामा बोलायला सुरुवात केली. व पुढे अशोकजींचा अशोकमामा झाला.

अशोकमामा त्यांचं पुस्तक लिहीत आहेत हे फारच कमी जणांना माहीत आहे. त्यांच्यामते पुस्तक लिहिण्याएवढं त्यांनी काहीही केलेले नाही. पण गेल्या ५० वर्षात त्यांनी जे काय झपाट्याने काम केलं, त्या आठवणी लिखीत स्वरुपात असायला हव्या असा अशोकमामांच्या पत्नी म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास घेतले आहे.

वयाच्या पंचाहत्तरीत आलेल्या अशोकमामांना पाहून त्यांच्या स्वभाव, शरीर व काम करण्याच्या स्फुर्तीला अजूनही वयाने स्पर्श केलेला नाही असेच वाटते. मामांनी त्यांच्या कारकिर्दीत २५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून त्यापैकी १०० व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले. त्यांनी बहुतेक विनोदी चित्रपटांत काम केले. त्यातल्या अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, पांडू हवालदार, कळत नकळत, भस्म हे चित्रपट विशेष गाजले. त्यांचे विख्खी, व्याख्या, वुख्खु…, ७० रुपये वारले, धनंयज माने इथेच राहतात का..हे डायलॉग अजरामर झालेत.  त्यानंतर त्यांनी स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस “अनिकेत टेलीफिल्म्स” चालू केले, जे त्यांची पत्नी निवेदिता सराफ हाताळतात.