बर्थडे स्पेशल : विनोदाचे बादशाह ‘अशोक माम...

बर्थडे स्पेशल : विनोदाचे बादशाह ‘अशोक मामा’ यांचा आज वाढदिवस… (Happy Birthday Ashok Saraf)

मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ म्हणजेच मामा यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची ७४ वर्षे पूर्ण केली आहेत. अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार आहेत.

मुंबईत जन्मलेले अशोक सराफ मुळचे बेळगावचे असून दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचे बालपण गेले. सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड असलेल्या अशोक सराफ यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. त्यांनी काही संगीत नाटकांतूनदेखील भूमिका केल्या आहेत. अभिनेते अशोक सराफ यांना सर्वजण प्रेमाने अशोकमामा असे म्हणतात.

आज वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात अशोक सराफ यांच्याविषयी बरंच काही…

गजानन जागीरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या सिनेमात अशोक सराफांनी एक छोटीशी भूमिका केली. अशोक सराफ यांनी साल १९६९ मध्ये ‘जानकी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत आपलं पाऊल टाकलं. त्यानंतर दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील इरसाल पोलीस, ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या.  

अशोक सराफ यांनी अनेक माराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक तसेच टिव्ही मालिकांमधून विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. विनोदी भूमिका सादर करतांनाचे त्याचे टायमिंग लाजवाब आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदी धाटणीच्या भूमिका न करता गंभीर आणि खलनायकी स्वरूपाच्या भूमिका देखील केल्या आहेत. आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयासाठी पुरस्कार मिळविले आहेत.

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा मूळ स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.

ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यांसारख्या सिनेमातून धमाल उडवून दिली.

दादा कोंडकेंबरोबर ‘पांडू हवालदार’, ‘कळत नकळत’, ‘भस्म’ यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. ‘वजीर’सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर ‘चौकट राजा’मधे सहृदय गुणाची व्यक्तिरेखा केली.

अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.

‘हम पांच’ या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली.

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘दामाद’ या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले.

पत्नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या.

अमेरिकेतील सिएटल येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन येथे विजय केंकरे दिग्दर्शित ‘हे राम कार्डिओग्राम’ या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवले.

पत्नी निवेदिता सराफ आणि मुलगा अनिकेत सराफ असं त्यांचं छोटंसं कुटुंब आहे. यावर्षीही करोनाचं सावट असल्यामुळे अशोक सराफ यांना आपला वाढदिवस साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. काही हरकत नाही मामा तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.