जुल्फे: एक मोहक बेडी (Hairstyle Appreciations I...

जुल्फे: एक मोहक बेडी (Hairstyle Appreciations In Film Songs)

जुल्फे एक मोहक बेडी

शुभांगी नाबर


 • अनेक कवींनी, शायरांनी स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी अक्षरशः शब्दांची उधळण केली आहे. उर्दू शायरांना तर चाँद-सा मुखडा, झील-सी आँखें, सुनहरी जुल्फें या गोष्टी काव्यात्मकच वाटतात. त्यांच्या मते ‘लंबे घने बाल’ ही स्त्रीला लाभलेली ईश्‍वरदत्त देणगीच आहे, जी तरुणांच्या हृदयावर गारूड करते.
  रुषाला स्त्री सौंदर्याचं आकर्षण वाटणं नैसर्गिकच आहे. अनेक कवींनी, शायरांनी स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी शब्दांची उधळण केली आहे. भाषा कुठलीही असली तरी मतितार्थ एकच असतो. उर्दू शायरांना तर चाँद-सा मुखडा, झील-सी आँखें, सुनहरी जुल्फें या गोष्टी काव्यात्मकच वाटतात. त्यांच्या मते ‘लंबे घने बाल’ ही स्त्रीला लाभलेली ईश्‍वरदत्त देणगीच आहे, जी तरुणांच्या हृदयावर गारूड करते. सूनहरी जुल्फें, महकते बाल हे जणू प्रेमनगरीच्या प्रवेश द्वारावरील भालदार, चोपदार असावेत व त्यांना खूष केल्याखेरीज प्रीतीच्या विश्‍वात प्रवेश मिळत नसतो. म्हणून प्रत्येक आशिकआपल्या माशुकाला ‘तेरी जुल्फे सजानेके लिये मै तारी तोडके लाऊँगा’ असे भरघोस आश्‍वासन देत असतो.
 • मोहक बेडी
  एकदा प्रीतीच्या नगरीत प्रवेश झाला की, तेथील अनेक आयुधं प्रियकराला बांधून ठेवत असतात. जुल्फे ही एक मोहक बेडी आहे, जी प्रेमवीराला गुंतवीत असते.
  ‘ये जुल्फे कैसी है, जंजीर जैसी है’ हे
  शब्दच या विधानाला पुष्टी देतात. स्पष्टीकरणाची गरजच नाही. गंमत म्हणजे या बेडीत प्रियकर स्वतःहून अडकत असतो आणि त्याला तिथून सुटकाही नको असते. ‘तेरी जुल्फोंसे जुदाई तो नही माँगी थी, कैद माँगी थी रिहाई तो नही माँगी थी’ या मागणीतच सारे काही उघड होते.
  प्रीत जेव्हा नवी असते तेव्हा प्रियकराला खेळवण्यासाठी प्रेयसी उगीच नाराजी दाखवीत असते, चेहरा फिरवीत असते. तो आपली किती आर्जवे करतो हे अजमावीत असते. अशा वेळी तिच्या अवखळ बटा तिच्या चेहर्‍यावर झेपावतात. त्या पाहून प्रियकर म्हणतो-
  ‘चेहरे पे गिरी जुल्फे, कह दे तो हटा दू मैं’ आणि मग आपला आगाऊपणा लक्षात येऊन तो कान पकडण्याचा अभिनय करत म्हणतो, ’गुस्ताकी माफ…’ते पाहून ती खुदकन् हसते आणि दिलजमाई होते.

 • केसांची सावली
  आपले महकते बाल प्रियकराला आपल्यापाशी खेचून आणतील अशी खात्री असलेली प्रेयसी त्याला आपला ठावठिकाणा अप्रत्यक्षपणे सुचविण्यासाठी म्हणते,‘जहाँ तक महक है मेरे गेसुओं की चले आईये’ अशा मार्गदर्शनाने तिच्यापर्यंत पोहोचलेला प्रियकर तिच्या खांद्यावर रुळणारा लडिवाळ केशसंभार पाहून अभावितपणे उद्गारतो, ‘जुल्फे है जैसी कांधे पे बादल गिरे हुए.’ एवढेच बोलून तो थांबत नाही तर त्याच्या मनात एक अनिवार इच्छा निर्माण होते की सायंकाळच्या वेळी आपण प्रियेच्या मांडीवर मस्तक ठेवून पहुडावे व ती आपल्याशी प्रेमालाप करीत असताना या घनदाट केसांनी आपल्या चेहर्‍यावर सावली धरावी. या स्वप्नरंजनात तो एवढा दंग होतो की त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, ‘तुम्हारी जुल्फ के साये में श्याम कर लुँगा सफर-ए उम्र का पल तमाम कर लूँगा’ या ठिकाणी प्रियेच्या केसांच्या छायेत आयुष्याचे काही क्षण सुखाने व्यतित करणारा प्रियकर दिसतो तर दुसरा एखादा प्रियकर आपले सारे दुःख प्रियेच्या केसात चेहरा लपवून विसरू पाहतो. ‘तेरी गेसुओंमे छुपकर, मैं जहाँ के गम भुला दूँ।’ असे म्हणत असताना त्याला प्रियेचे मोकळे केस हे सुरक्षित ठिकाण वाटते हे उघड आहे.
 • केसातील मोती
  मुळातच स्त्रीचे मोकळे भरगच्च केस पुरुषाला आकर्षित करीत असतात. त्यात ते ओले आणि सुगंधित असतील तर ‘सोने पे सुहागा’ म्हणावयास हरकत नाही. आपले ओले केस झटकून त्यातील पाणी निपटून टाकीत असलेल्या आपल्या प्रियेस प्रियकर विनवतो, ‘ना झटको जुल्फ से पानी, ये मोती फूट जायेंगे, तुम्हारा कुछ ना बिगडेगा, मगर दिल टूट जायेंगे’ झटकताना ओल्या केसांतून पडणारे पाण्याचे थेंब मोती म्हणणारा प्रियकर रसिकच म्हणावा लागेल. ते मोती जमिनीवर पडून फुटतील ही त्याची भिती वरकरणी आहे. त्याला वेगळीच भिती वाटत असते की आपली सुस्नात, प्रफुल्लित प्रिया केस झटकताना मानेला थोडा बाक देऊन उभी असताना इतकी आकर्षक दिसते की तिला पाहणारी हृदये घायाळ होतील. म्हणून तिला तो त्या कृतीपासून परावृत्त करीत असावा.
 • प्रीतीचे शिक्कामोर्तब
  अनेक हृदयांना आपल्या प्रियेने घायाळ करण्यापूर्वी आपणच तिच्या भांगात सिंदूर भरून आपल्या प्रीतीचे शिक्कामोर्तब करावं, अशी त्याला घाई होते. पण त्यावेळी तिच्या भालप्रदेशावर रुळणार्‍या बटा अटकाव करतील असे वाटून तो म्हणतो, ‘तेरी जुल्फ को सवारूँ, तेरी माँग फिर सजा दूँ।’ अशी ही जुल्फे इतकी जादूभरी असतात की, प्रियकराच्या मनात काय काय कल्पना निर्माण करतील भरवसा नाही.
  केवळ प्रियकरच प्रियेच्या केसांची वाखाणणी करतो असे नाही तर प्रेयसीही त्यात मागे नाही. ती म्हणते, ‘उडे जब जब जुल्फे तेरी, कवाँरियोंका दिल मचले’ तरुणाचे वार्‍यावर उडणारे केस तरुणींची हृदये घायाळ करतात हे यातून स्पष्ट होते. असे अनेक संदर्भ देता येतील. पूर्वीपासूनच इष्काचा लंबी रेस का घोडा दौडत आहे. कधी प्रीती सफल होते, कधी नाही. म्हणून हार न मानता प्रेमनगरीत जुल्फे आपली कामगिरी इमाने-इतबारे पार पाडतच राहतील यात संशय नाही.