गुलजार यांचा आत्मकथनपर लेखसंग्रह (Gulzar’s Auto...

गुलजार यांचा आत्मकथनपर लेखसंग्रह (Gulzar’s Autobiography Published In Marathi)

गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अशा बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलजार यांचा जन्म ऑगस्ट 18, 1934 रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. गुलजार यांचे सध्या वास्तव्य मुंबई येथील पाली हिल, बांद्रा पश्चिम येथे आहे.
त्यांनी लिहिलेले ‘धूप आने दो’ हे पुस्तक मराठीतले कवी,  लेखक आणि संपादक अरुण शेवते यांनी नुकतेच प्रकाशित केलेले आहे. अरुण शेवते ‘ऋतुरंग’ नावाचा एक दिवाळी अंक 1993 पासून प्रकाशित करत आलेले आहेत.  त्याचे संपादन अरुण शेवते यांचेच असते.  तर या ‘ऋतुरंग’ अंकात प्रसिद्ध झालेले गुलजार यांचे सर्व लेख पुस्तक रुपाने प्रकाशित केलेले आहेत. 
गुलजार हे कवी, गीतकार, दिग्दर्शक, निर्माते वगैरे आहेतच,  परंतु ते चांगले चित्रकार देखील आहेत. ‘ऋतुरंग’च्या मुखपृष्ठावर गुलजार यांची दोन चित्रं आत्तापर्यंत आलेली आहेत. तसेच या पुस्तकात गुलजार यांची काही रेखाटने देखील आहेत.  तर असा हा बहुमुखी प्रतिभेचा लेखक आणि कवी कशाबद्दल या पुस्तकात काय काय लिहीत आहे ते पाहू.

अजरामर गाण्यांच्या जन्मकथा
अभिनेत्री मीनाकुमारी या कवियत्री देखील होत्या. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी आपल्या कवितेचे हक्क गुलजार यांच्याकडे दिले होते. मीनाकुमारीच्या अत्यंत मनस्वी स्वभावाचे आणि एकाकीपणाचे चित्रण गुलजार यांनी एका लेखात केलेले आहे.  त्याचप्रमाणे संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्याविषयी देखील त्यांनी फार सुंदररित्या लिहिलेले आहे. यामध्ये ‘परिचय’, ‘घर’, ‘आंधी’पासून सर्व अजरामर गाण्यांच्या जन्मकथा दिल्या आहेत.
साहिर लुधियानवी आणि जावेद अख्तर ऊर्फ जादू या दोन कविंवर गुलजार यांनी लिहिलेला लेख या पुस्तकातला सगळ्यात सुंदर लेख आहे.
जावेद अख्तर यांचे त्यांच्या वडिलांशी पटत नव्हते, म्हणून त्यांनी बाप जिवंत असेस्तोवर त्यांच्यावर एकही कविता लिहिली नाही. जावेद अख्तर यांचे सर्व घराणे शायर होते.  बाप जॉनिसार अख्तर, मामा मजाज,  सासरा कैफी अशा सर्व शायरांमध्ये जावेद अख्तर यांची वाढ झाली. 
जॉनिसार अख्तर यांचं निधन झाल्यानंतरच काही दिवसात यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला’ मधील ‘देखा एक खाब तो… ’ हे गाणं जावेद अख्तर यांनी लिहिलं आणि जणू काही आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

प्रेमाने लिहिलेले लेख
कुलदीप नय्यर आणि पिरसाहेब हा देखील एक उत्तम लेख गुलजार यांनी लिहिलेला आहे.  त्याचप्रमाणे सत्यजित रे, पंडित रविशंकर, सलील चौधरी इत्यादींविषयी देखील फार मोठ्या प्रेमाने लिहिलेले आहे. 
आपली मुलगी बोस्की आणि आपला कुत्रा यांच्यावरही गुलजार यांनी खूप छान लिहिलेले आहे. 
गुलजार यांच्या कुत्र्याचे नाव पाली आहे.  कोणा एका माणसाला बॉक्सर जातीच्या दोघांपैकी एक कुत्रा विकायचा होता. म्हणून तो दोन्ही कुत्रे गुलजार साहेबांकडे घेऊन आला.  आता एक कुत्रा आपल्याकडे ठेवल्यावर दुसर्‍या कुत्र्याला वाईट वाटेल म्हणून गुलजार साहेबांनी दोन्ही कुत्रे ठेवून घेतले. त्यापैकी एक कुत्रा आपली पत्नी राखीला दिला आणि आपल्याकडे जो कुत्रा होता त्याचं नाव त्यांनी पाली असे ठेवले. गुलजार साहेबांचं फार प्रेम आहे त्याच्यावर. 
एकदा काय झालं, एका बांद्रा येथील कुत्रे पळवणार्‍या टोळीने तो कुत्रा पळवूनच नेला.  परंतु गुलजार यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये कुत्रा हरवल्याची जाहिरात दिली. तर त्या टोळीने हा पाली कुत्रा ज्या माणसाला विकला, त्यांनी ही जाहिरात पाहिली. आणि त्यांनी गुलजार साहेबांना फोन करून मोठ्या मनाने हा कुत्रा त्यांना परत आणून दिला. अशा तर्‍हेने आपला प्रेमळ कुत्रा पाली आणि गुलजार यांचे पुनर्मिलन झाले. फार चटका लावणारा प्रसंग आहे हा.
भरारी कशी घेतली?
तुम्हाला खोटं वाटेल की गुलजार हे मुंबई येथे विचारे यांच्या गॅरेजमध्ये मुंबईत मोटारीला रंग लावायचं काम करत होते. तेथून त्यांनी अशी ही भरारी घेतली. ती कशी घेतली हे गुलजार यांच्या शब्दातच वाचले पाहिजे….
“पाकिस्तानमधल्या दीना गावी माझा जन्म झाला. फाळणी 1947 साली झाली. दिल्लीला आलो. त्या वेळी मनाला झालेल्या जखमा अजून विसरलो नाही. कितीतरी कवितांमधून, गाण्यांमधून माझं ते दुःख व्यक्त झालं आहे. दिल्लीहून मुंबईला आलो आणि एक वेगळंच जग बघायला मिळालं. लहानपणापासून साहित्याची आवड. कवितांमध्ये रमून जाणं हा माझा स्वभाव. कवितेने नवं जग दाखवलं. स्वतःकडे आणि इतरांकडेही पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली. परीक्षेत नापास झालो. पुढे शिकावंसं वाटलं नाही. घरच्यांना वाटायचं मी चार्टर्ड अकाउंटंट व्हावं. पण माझी जगण्याची दिशा वेगळीच. प्रवास वेगळाच सुरू झाला.
ते जुने दिवस मला आठवतात. माझा एक मित्र एम.ए. झालेला. कुठेतरी काम करायचा. तो रडायचा. म्हणायचा की पदवीधर होऊन मी काय कमावलं? त्याचं रडणं मला अजून अस्वस्थ करतं. आजही त्याचं रडणं मी विसरलो नाही. मला मुंबईला एका रंगाच्या दुकानात सेल्समनची नोकरी लागली. दोनशे रुपये पगार मिळायचा. साठ रुपये कापून जात होते. हातात एकशे चाळीस रुपये मिळायचे. पण त्यात समाधान नव्हतं. पुस्तक वाचायला, कवितेत रमून जायला वेळच मिळत नव्हता. मी ती नोकरी सोडली.
विचारे मोटर्स या मोटार गॅरेजमध्ये नवीन नोकरी मिळाली. पगार फक्त दीडशे रुपये होता. पण त्यात आनंदी होतो. लिहायला-वाचायला भरपूर वेळ मिळत होता. त्या मोटार गॅरेजमध्ये माझं काम होतं अपघात झालेल्या मोटारींना रंग देण्याचं. रंग मॅच करायला तिथे शिकलो.

नवी दिशा मिळाली
मोटार गॅरेजमध्ये सिनेमाक्षेत्रातली अनेक माणसं यायची. बासू भट्टाचार्य, देबुसेन यांच्या तिथेच ओळखी झाल्या. शैलेंद्र आणि बिमल रॉय यांचे मतभेद झाले. त्यांना गाणं लिहिण्यासाठी कुणीतरी नवा गीतकार हवा होता. बासू भट्टाचार्य मला बिमलदांकडे घेऊन गेले. मोटर गॅरेजमधल्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. मी बिमल रॉयकडे ‘बंदिनी’साठी ‘मोरा गोरा रंग लई ले’ हे गाणं लिहिलं. आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तर अशा या बहुआयामी कवी मनाच्या व्यक्तिमत्त्वाचं लेखन आपण वाचलं पाहिजे. यामध्ये गुलजार यांच्या काही उर्दू आणि हिंदी कविता मूळ हस्तलिखित स्वरूपात दिलेल्या आहेत.  त्यादेखील अत्यंत वाचनीय आहेत. 
एकूणच हे पुस्तक संग्रही असावे असेच झालेले आहे.
या पुस्तकासाठी अरुण शेवते यांचं मी अभिनंदन करतो… !
-राजेंद्र मंत्री