कोविड साथीच्या काळात पालकत्त्वाची पुन्हा सुरुवा...

कोविड साथीच्या काळात पालकत्त्वाची पुन्हा सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines For Parenthood In Covid Pandemic)

कोविडसारख्या जागतिक साथीच्या काळात, अनेक लोकांना वेगाने पसरणाऱ्या संसर्गामुळे कठीण

परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या काळात ओव्ह्युलेशन इंडक्शन, इंट्रायूटरिन

इन्सेमिनेशन (आययूआय), इन विट्रो-फर्टिलायझेशन, ओयोसाइट आणि स्पर्म क्रियोप्रिझर्वेशन,

तसेच फ्रेश / फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर, यांसारखे प्रजननाचे उपचार स्थगित ठेवण्यात यावेत,

अशी शिफारस जगभरातील बहुतांश प्रजनन संस्थांनी केली आहे. अर्थात, यातील प्रत्येक संस्थेने असेही स्पष्ट केले आहे, की ज्या काही स्त्रियांना ऑन्कोलॉजिकल कारणांमुळे प्रजननाचे उपचार देण्यात येत आहेत, हे उपचार न घेता ते पुढे ढकलणे अधिक हानिकारक असू शकते. काही निवडक ठिकाणी (म्हणजेच: कमी ओव्हरियन रिझर्व्ह असलेल्या रूग्णांमध्ये) हे उपचार चालू ठेवता येतील. यामध्ये उपचार सुरू ठेवण्याजोगी परिस्थिती उपलब्ध आहे, याची खातरजमा संबंधित उपचार केंद्रांनी करून घेतली पाहिजे. मातृत्वाचे नियोजन खोळंबल्यामुळे अनेक जोडप्यांना या काळात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे. आपले पालक होण्याचे स्वप्न तात्पुरते का होईना, भंगल्यामुळे त्यांचा भावनिक कोंडमारा झाला आहे.

वरील टिप्पणी मुंबई फर्टिलिटी क्लिनिक व आयव्हीएफचे संचालक डॉ. जतीन शहा यांनी केली आहे आणि पालकत्त्वाची पुन्हा सुरुवात करु इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. ते पुढे म्हणतात – प्रजनन उपचारासाठी वैद्यकीय मदत घेणाऱ्या जोडप्यांचा पालकत्वाकडे जाण्याचा प्रवास

टाळेबंदीच्या काळात अचानक थांबला. आयव्हीएफ उपचार पुन्हा सुरू करायचे की ‘कोविड-१९’ च्या संसर्गाच्या भीतीमुळे हे उपचार नंतर घ्यायचे, अशा संभ्रमात अनेक जोडपी होती.

औषधोपचारांच्या इतर शाखांच्या तुलनेत, प्रजननाच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टरांना अनेकदा भेटणे, चाचण्या करून घेणे, काही उपचारपद्धती अनुसरणे, स्कॅनिंग करणे, समुपदेशन घेणे आणि नंतर गर्भधारणेच्या संपूर्ण ४० आठवड्यांचा कालावधी व्यतित करणे या सर्व गोष्टी कराव्या लागतात. इतर वैद्यकीय सेवांच्या तुलनेत यामध्ये रूग्णांचा रुग्णालयांशी संपर्क येण्याचे प्रमाण अधिक असल्याने, त्यांना विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोकाही जास्त असू शकतो. तसेच रुग्णालयांत किंवा दवाखान्यात जाऊन उपचार घेताना, तेथील स्वच्छतेच्या स्तराबाबत, सामाजिक अंतर राखण्याबाबत आणि कोविडचा संसर्ग होण्याची रुग्णांना भिती वाटू शकते.

परंतु, येथे काही घटकांचा विचार करणे महत्वाचे आहे. आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये मातृत्व हव्या असणाऱ्या स्त्रियांसाठी अनेक टप्पे आणि चक्र यांचा समावेश असतो. त्यासाठी एक महत्वाचा घटक म्हणजे वेळ. उपचारांना विलंब होणे याचा अर्थ, स्त्रियांमधील एग रिझर्व्ह कमी होत जाणे. त्यामुळे संबंधित महिला यशस्वीरित्या गर्भवती होण्याची शक्यता कमी होईल. महिलांनी हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की एग रिझर्व्ह आणि त्यांची गुणवत्ता या गोष्टी महिन्यागणिक कमी होत जातात आणि काही महिन्यांचा उशीर झाल्यास गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो.

रुग्णालये आणि प्रजनन केंद्रांमध्ये आता आयव्हीएफ प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानंतर, रुग्णांनी

विशेष काळजी घ्यायला हवी आणि आयव्हीएफ प्रक्रियेची निवड करताना काही मार्गदर्शक

तत्त्वांचे पालन करावे. त्यांनी नेहमीच फेसमास्क घालावा आणि क्लिनिकमध्ये सामाजिक अंतर

राखून वावरावे. सॅनिटायझरची बाटली आपल्यासोबत बाळगावी आणि क्लिनिकला भेट देण्यापूर्वी व नंतरही हात स्वच्छ ठेवावेत. उपचारादरम्यान आपण ज्या पृष्ठभागांना किंवा बेड्सना

स्पर्श करू, ती स्वच्छ आहेत, याची खात्री करावी. आयव्हीएफ उपचार सुरू करण्यापूर्वी कोविडची

चाचणी करून घेणे श्रेयस्कर ठरते.

कोविड-१९ आणि बाळंतपणातील मृत्यू यांच्यात थेट संबंध नसल्याचे अनेक पुरावे आहेत, ही

एक आशादायक बाब आहे. तसेच, सुदैवाने ‘कोविड-१९’ ने बाधित नसलेल्या स्त्रियांना झालेल्या

बाळांच्या तुलनेत, कोविड-१९ ने बाधित स्त्रियांना झालेल्या बाळांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते,

असेही कोठे आढळून आलेले नाही. बाधित मातेपासून बाळामध्ये विषाणू संक्रमित होण्याची

शक्यता नसल्याचेही सिद्ध झाले आहे. या निकालांची पुष्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात

अभ्यास करणे आवश्यक आहे; याव्यतिरिक्त, पहिल्या तिमाहीतील कोविड-१९ केसेसचा समावेश

करुन गर्भपातांच्या जोखमींबाबत त्यांचे मूल्यांकन केले जायला हवे.

एक गोष्ट लक्षात ठेवा : बाळासाठीचे नियोजन करताना, ‘उत्तम काळ’ अशी काही संकल्पना नसते. पालक होण्याच्या निर्णयावर बाह्य घटकांचा परिणाम होऊ नये, एवढेच.

घ्यावयाची काळजी :

१. टेलिमेडिसीन पद्धतीचा व ऑनलाईन शिक्षणाचा अधिक प्रमाणात अवलंब करा. यांकरीता

अद्ययावत उपलब्ध माहिती व लिंक यांच्या सहाय्याने वेबसाइट पाहा. ज्या उपचारांसाठी

रुग्णांना शारीरिकरित्या उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते, अशा सर्व टप्प्यांमध्ये पर्याय

म्हणून इलेक्ट्रॉनिक आरोग्य उपाययोजनांचा वापर करावा.

२. टाळेबंदीविषयक स्थानिक पातळीवर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे

आणि सामाजिक व शारीरिक अंतर राखण्याच्या नेहमीच्या आरोग्यविषयक खबरदारीचे पालन

करणे अत्यंत आवश्यक आहे.

३. एआरटी उपचार सुरू करण्यापूर्वी, दोन आठवडे अगोदर ऑनलाईन ट्रीएज करून घेण्याचा सल्ला रिप्रॉडक्टिव्ह अथॉरिटीजकडून देण्यात येतो. तसेच, क्लिनिकला भेट देताना प्रत्येक वेळी

ट्रीएजची पुनरावृत्ती करण्यासही सांगण्यात येते.

४. मधुमेह, उच्च रक्तदाब, अति लठ्ठपणा, तसेच फुफ्फुस, यकृत किंवा मूत्रपिंड यांचे आजार यांची

गुंतागुंत असलेल्या रूग्णांनी, आरोग्य अधिकाऱ्यांचा सुरक्षितेचा निर्वाळा घेऊनच एआरटी उपचार

सुरू करावेत.

५. गर्भाशयाच्या ‘हायपरस्टिम्युलेशन’सारखी गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यासाठी

औषधोपचारांची विशेष रचना केली पाहिजे.

६. ‘इम्यून सप्रेसंट’ व ‘इम्यून मॉड्युलेटर्स’ यांचा वापर टाळण्यासाठी अधिक उपाय योजले पाहिजेत.

७. पुरुष रूग्णांनी वीर्याचे नमुने घरातच निर्माण करून, नंतर ते प्रयोगशाळेत आणावेत, यासाठी

आयव्हीएफ युनिट्सनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

८. विषाणूजन्य संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी, ‘ओयोसाइट्स’ आणि ‘एम्ब्रियो’ यांचे

वारंवार वॉशिंग करावे.

९. आवश्यक असल्यास ‘हायस्टिरोस्कोपी’ प्रक्रिया ऑफिसमध्ये करावी. यासाठी ‘कॉन्शस सेडेशन’

किंवा स्थानिक भूल या पद्धतींचा वापर करावा. यामुळे कमीतकमी द्रवपदार्थाचा वापर होऊन

‘इंट्युबेशन’ आणि ‘एक्सट्यूबेशन’द्वारे विषाणूचा प्रसार होण्याचा धोका टाळता येतो.

‘सार्स-सीओव्ही ‐ २’ विषाणू जागतिक आरोग्य क्षेत्राला आणखी काही काळ सतावत राहणार

आहे. या विषाणूच्या अनुषंगाने कसे जगायचे, ते आपण शिकले पाहिजे.