आज जागतिक हास्य दिवस; वाचण्याजोगी ३ नवी विनोदी ...

आज जागतिक हास्य दिवस; वाचण्याजोगी ३ नवी विनोदी पुस्तके (Greetings For World Laughter Day)

जागतिक हास्य दिवसाच्या हसतमुखाने शुभेच्छा!

आजचा हा दिवस जगभरातील १०५ देशांमध्ये साजरा केला जातो. नेहमी हसत राहा, हसवत राहा आणि निरोगी राहा, असा संदेश देणारा हा दिवस…

अलीकडे चांगले विनोदी साहित्य निर्माण होत नाही. विनोदी लेखक निर्माण होत नाहीत, अशी खंत व्यक्त केली जाते. या विधानांना छेद देत उद्वेली बुक्सने विनोदी साहित्याची एकूण तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत.
मस्त हसविणार्‍या कथा


ज्येष्ठ मराठी कथाकार चंद्रकांत महामिने यांचा ’लागली कुणाची उचकी‘ हा उत्तम विनोदी कथांचा संग्रह आहे. या कथासंग्रहात महामिने यांच्या 12 गोष्टी आहेत. लेखक सातत्याने विनोदी कथा लिहीत आले आहेत. विविध दिवाळी अंकांतून त्यांच्या या विनोदी कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. महामिने यांनी आपल्या कारकिर्दीत विपुल साहित्य प्रसविले आहे. ’लागली कुणाची उचकी‘ हा त्यांचा 29वा कथासंग्रह आहे. यावरून त्यांच्या लेखनाचा आवाका आणि उत्साह लक्षात यावा.
सदर कथासंग्रहातील शीर्षक कथा, जितकी मजेदार आहे, तितक्याच इतर कथा देखील हसविणार्‍या आहेत. थ्रीजी घोटाळ्यात गजा, प्रेमाची अ‍ॅप्रेन्टिसशिप, बावीस नरवी कृष्णवर्णी, भेसळ, टाळूवरचं लोणी इत्यादी कथा विशेष उल्लेखनीय आहेत. कथांचा विनोदी गाभा आणि चुरचुरीत संवादांनी युक्त अशा या कथा चांगल्याच
मनोरंंजक आहेत.
लागली कुणाची उचकी
लेखक : चंद्रकांत महामिने
पाने : 144
मूल्य : 180

खुसखुशीत विनोदी कथा


‘हास्यबुफे‘ असे आकर्षक शीर्षक असलेला सतीश मोहोळे यांचा विनोदी कथासंग्रह वाचकांना चांगलाच विरंगुळा देतो. विविध मासिके व दिवाळी अंकातून मोहोळे यांच्या या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या या पहिल्याच विनोदी कथासंग्रहात 13 कथा आहेत. या कथा खुसखुशीत आहेत. ’आत्मघात व इतर एकांकिका‘ असा यांचा एकांकिका संग्रह यापूर्वी प्रसिद्ध झाला असून त्याला वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
’हास्यबुफे‘ या कथासंग्रहातील कथा आपल्या बदलत्या जीवनपद्धतीवर बेतलेल्या आहेत. त्यावर हसतखेळत टिप्पणी करतात. आसपासच्या घटनांचा वेध घेत नवनवीन विषयांची मांडणी त्यात केलेली आहे. बुफे, क्रेडिट कार्ड, प्युअर व्हेजिटेरियन, चवळीची शेंग कवळी, बार में आजा आजा, बच्चन आला रे, अशा कथा त्याची साक्ष पटवतात. लेखक सतीश मोहोळे नाट्यक्षेत्रातील व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे काही कथांचे लेखन बरेचसे संवादात्मक आहे. या चांगल्या कथांना सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांच्या व्यंगचित्रांची जोड लाभली आहे. त्याच्याने पुस्तकाची शोभा वाढली आहे.
हास्यबुफे

लेखक : सतीश मोहोळे
पाने : 172
मूल्य : 220

प्रदीर्घ कथांमधून साधलेला विनोद


अत्यंत वेगळे शीर्षक आणि वेगळे मुखपृष्ठ असलेला ’हासतीदंत‘ हा डॉ. रामचंद्र कबीर यांचा विनोदी कथासंग्रह वेगळाच म्हटला पाहिजे. कारण त्यात फक्त दोनच कथा आहेत. दोन प्रदीर्घ विनोदी कथांचा संग्रह चांगलाच विनोदी आहे. लेखक पेशाने डेंटिस्ट आहेत. आणि यू ट्यूब वरील स्टॅण्ड अप कॉमेडी कलाकार आहेत. त्यांनी पु. ल. देशपांडे आणि अशोक सराफ यांना गुरूजी मानून या कथांची निर्मिती केली आहे. ’मी थंड आहे’ आणि ’तिसावं वरीस धोक्याचं‘ अशा प्रदीर्घ कथा सादर केल्या आहेत. पहिल्या कथेत आपण कुल आहोत, हे दाखविण्यासाठी लोकांनी केलेले उपद्व्याप दिसतात, तर दुसर्‍या कथेत वयाच्या तिशीतच निर्माण होणार्‍या सामाजिक व आरोग्यविषयक समस्यांची उठाठेव दिसते. या वयात आरोग्याचा प्रवास खडतर होऊ शकतो, असा त्यांचा सूर आहे. या खडतर प्रवासाचं वर्णन विनोदी पद्धतीने केले आहे. आजच्या युगातील घटनांवर आधारित हे विनोदी लेखन खोचक शैलीत आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. मोहिनी पानसे म्हणतात, ”कशाला उगाच जिम आणि लाफ्टर क्लब आणि योगा व मेडिटेशनसाठी पैसे खर्च करताय्. डॉ. कबीर यांचं हे पुस्तक वाचा, तोच फायदा होईल.“ त्यांच्या या विधानांची प्रचिती देणारं हे पुस्तक आहे निश्‍चित.
हासतीदंत
लेखक : डॉ. रामचंद्र शामसुंदर कबीर
पाने : 232
मूल्य : 260
(वरील तिन्ही पुस्तकांचे प्रकाशक ः उद्वेली बुक्स, ठाणे)