अपूर्वा-शशांकच्या लग्नाचा धूमधडाका (Grand Marri...

अपूर्वा-शशांकच्या लग्नाचा धूमधडाका (Grand Marriage Celebrations Of Apurva And Shashank In Popular Serial)

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून या लग्नसोहळ्यात स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार उपस्थित राहणार आहे. लग्नसोहळा म्हटलं की आपल्या परिवाराशिवाय तो पूर्णच होत नाही. त्यामुळेच या खास सोहळ्यात स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार उपस्थित राहणार आहे. केळवण, मेहेंदी आणि हळद थाटात पार पडल्यानंतर आता लग्नाचा शाही थाट अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नुकताच या मालिकेने १०० भागांचा टप्पाही पूर्ण केला आहे.

जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. दोघांचे लग्नातील फोटो पाहतानाच अपूर्वाचा बिनधास्त स्वभाव आपल्या लक्षात येतो. शिवाय मुंडावळ्या वगैरे लावलेली साजशृंगार करून डोळ्यांना गॉगल लावून स्वतःचं लग्न मस्त एन्जॉय करणारी आत्ताच्या तरुण पिढीला आवडेल अशी वधू आपल्याला अपूर्वाच्या रुपात पाहावयास मिळते. दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले तरी दोघांना एकत्र जोडून ठेवणारा दुवा म्हणजे त्यांचं कुटुंबावरचं प्रेम. याच कुटुंबावरच्या प्रेमाने दोघांना एकत्र यायला भाग पाडलं आहे.

लग्न म्हणजे दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतला हा विवाहसोहळा फक्त वर्तक आणि कानेटकर परिवारच नाही तर संपूर्ण प्रवाह परिवार साजरा करणारा आहे.