शोकनायक दिलीपकुमारची प्रदीर्घ चित्रपट कारकीर्द ...

शोकनायक दिलीपकुमारची प्रदीर्घ चित्रपट कारकीर्द (Grand Film Career Of Tragedy King Dilip Kumar)

ट्रॅजेडी किंग अर्थात्‌ शोकनायक अशी उपाधी लाभलेला दिलीपकुमार प्रदीर्घ आयुष्य जगला. त्याची चित्रपट कारकीर्द देखील अशीच प्रदीर्घ आहे. नायक ते चरित्र नायकाच्या दमदार भूमिका करून दिलीपकुमार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला होता. त्याचे चाहते अगणित होते. लोकांच्या गळ्यातील तो ताईत झाला होता.

दिलीपकुमारचा जन्म ११ डिसेंबर १९२२ सालचा. पाकिस्तानातील पेशावरमध्ये त्याचा जन्म झाला. त्याचं खरं नाव होतं युसुफ खान. वडिलांचं नाव सरवर खान. अभिनय क्षेत्रात चमकण्यासाठी तरुणपणी तो मुंबईत आला. तेव्हा त्याची परिस्थिती हलाखीची होती. एका स्टुडिओच्या कॅन्टीनमध्ये सॅण्डवीच विकून तो गुजराण करत राहिला.

दिलीपकुमारचे वडील सरवर खान हे पेशावरमध्ये फळांचा व्यापार करत होते. पुढे तेही मुंबईत येऊन स्थायिक झाले. इथे त्यांनी सुका मेव्याचा व्यापार केला. मुंबईमध्ये खडतर जीवन जगत दिलीपकुमार आघाडीचा अभिनेता बनला. अन्‌ कमालीची लोकप्रियता त्याला मिळाली.

ज्या कॅन्टीनमध्ये सॅण्डवीच विकण्याचं काम दिलीपकुमार करत होता, त्या कॅन्टीनमध्ये त्याची देविका राणीशी भेट झाली. देविका राणी बॉम्बे टॉकिज या त्या काळच्या प्रख्यात चित्रपट कंपनीची एक मालकीण होती. देविका राणीने त्याला सिनेमात संधी दिली. अन्‌ त्याचं नामकरण दिलीपकुमार असं केलं. १९४४ साली आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण १९४७ साली आलेल्या ‘जुगनू’ या चित्रपटाने त्याला आघाडीचा नायक बनवलं.

दिलीपकुमारचे पुढे उडन खटोला, आझाद, आन, अंदाज, मुगल-ए-आझम, कोहिनूर, देवदास, नया दौर, पैगाम, फूटपाथ, इन्सानियत, मधुमती, गंगा जमना, राम और श्याम, दिल दिया दर्द लिया, क्रांति, कर्मा, शक्ती, गोपी, बैराग, संघर्ष, विधाता, मशाल, किला, सौदागर असे एकामागून एक हिट चित्रपट येत राहिले. अन्‌ आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. सुरुवातीच्या काही चित्रपटात प्रेमभंग झालेला अपयशी प्रेमवीर अशा भूमिका मिळाल्या. अन्‌ त्या त्याने इतक्या परिणामकारक वठविल्या की, त्याला ट्रॅजेडी किंग अशी उपाधी लाभली. या फिल्मी कारकीर्दीत दिलीपकुमारला ८ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले, तर १९ वेळा त्याचे नामांकन झाले होते.

रुपेरी पडद्यावर दिलीपकुमार व मधुबाला ही जोडी खास जमली होती. पडद्यावर प्रेमाचे प्रसंग रंगवत असतानाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण मधुबालाच्या पिताजींनी त्यांच्या प्रेमात खो घातला अन्‌ ठरवून देखील दिलीपकुमार तिच्याशी लग्न करू शकला नाही. असं म्हणतात की, याआधी त्याचं पहिलं प्रेम कामिनी कौशल होती. पण तिच्या भावाला हे प्रेमप्रकरण पसंत नव्हतं, म्हणून ते वेगळे झाले.

पुढे दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला ही जोडी ‘नया दौर’ पासून जमली. त्यांनी ६ चित्रपटांमध्ये कामे केली. त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होत राहिली. पण दोघांनीही त्याचा इन्कार केला.

असफल प्रेमप्रकरणांमुळे म्हणा किंवा सिनेसृष्टीमध्ये कामात राहिल्याने म्हणा, पण दिलीपकुमार वयाची चाळिशी उलटली तरी अविविाहित राहिला. पण १९६६ साली, वयाच्या ४४ व्या वर्षी त्याने सायरा बानूशी निकाह लावला. हे लग्न खूप गाजलं. कारण सायरा तेव्हा फक्त २२ वर्षांची होती.

चित्रसृष्टीत अत्यंत यशस्वी कारकीर्द घडविल्याने दिलीपकुमारला पद्मभूषण तसेच दादासाहेब फाळके गौरव पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय १९९८ साली पाकिस्तान सरकारने निशां-ए-इम्तियाज हा सर्वोत्कृष्ट नागरिक पुरस्कार दिला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे कित्येक महिने मृत्युशी झुंज देत, वयाच्या ९८व्या वर्षी या शोकनायकाने या जगाचा निरोप घेतला आहे.