१ मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळण...

१ मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार (Govt of India announces everyone above the age of 18 to be eligible to get vaccine)

सध्या देशातील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. यापूर्वी सर्वात आधी ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोव्हिड १९ लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

वाढत्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. देशातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण व्हावं, यासाठी सरकार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा

कोरोना लसीकरणाची तिसरी मोहीम १ मेपासून सुरु करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात आता राज्य सरकारे, खासगी रुग्णालये व औद्योगिक प्रतिष्ठाने थेट कंपन्यांकडून लसी खरेदी घेऊ शकतील. लस कंपन्यांना लसीच्या किमती करार होण्याआधीच जाहीर कराव्या लागतील. तथापि, देशातील कंपन्यांना आपल्या ५०% लसी केंद्राला द्याव्या लागतील. उर्वरित ५०% डोस कंपन्या राज्य सरकारे व खुल्या बाजारात विकू शकतील.

नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनावरील लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. नरेंद्र मोदींनी देशातील डॉक्टर आणि मेडिकल फार्मा कंपन्यांशी चर्चा केली. लहान शहरांत कोरोना वेगाने पसरत आहे. या शहरांत आरोग्य सुविधा वेगाने वाढवाव्या लागतील, असं मोदींनी जाहीर केलं आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत होती. आता तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक मिळून दर महिन्याला ८ कोटी डोस तयार करत आहेत. लसीकरणाची मासिक सरासरीही तेवढीच आहे. आता केंद्राकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर सीरम आणि भारत बायोटेक मिळून दरमहा १२ कोटी डोस तयार करतील. त्याशिवाय रशियन लस पुढील महिन्यात येईल. तथापि, तिची संख्या निश्चित नाही. त्याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांनाही विदेशातून लस आणण्याची सूट देण्यात आली आहे. अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली आहे.