‘मला खड्यासारखं बाजूला काढलं… १६ को...

‘मला खड्यासारखं बाजूला काढलं… १६ कोटींचं नुकसान झालं…’ हसरा गोविंदा सांगतोय्‌ आपली रडकथा!’ (Govinda opens up on how Bollywood betrayed him and how he suffered Rs 16 crore loss)

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील वशिलेबाजी, गटबाजी यांच्या चर्चेला उधाण आलं होतं. आता या गोष्टींवर उशिराने का होईना, पण गोविंदाला दुःखाचे कढ आले आहेत. त्याने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटसृष्टीची काळी बाजू उजेडात आणली आहे.

गोविंदाची ही मुलाखत चांगलीच गाजते आहे.
त्यामध्ये बॉलिवूडमधील बऱ्याच कट-कारस्थानांचा पर्दापाश तसेच आपल्या करिअरमध्ये काटे पेरणाऱ्या लोकांची लक्तरे त्याने वेशीवर टांगली आहेत. त्याने पुढे असंही म्हटलं आहे की, आता मी साधाभोळा गोविंदा राहिलेलो नाही. आता आपण दारू पितो व धूम्रपान देखील करतो, असा गौप्यस्फोट त्याने केला आहे.

मला खड्यासारखं बाजूला काढलं…
आपणसुद्धा बॉलिवूडमधील नेपोटिझम्‌ प्रवृत्तीला बळी पडलो आहे, असं गोविंदा म्हणतो. चित्रसृष्टीत विविध विभागात काम करणाऱ्या त्याच्याच काही लोकांनी त्याच्या विरुद्ध कारस्थाने रचलीत. ”मला खड्यासारखं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे माझं खूपच आर्थिक नुकसान झालं. मला चांगल्या भूमिका दिल्या जात नव्हत्या. माझे चित्रपट प्रदर्शित करण्यात अडथळे आणले गेले. गेल्या १४-१५ वर्षात मी सिनेमासाठी खूप पैसे खर्च केले. इतके की मला १६ कोटी रुपये नुकसान सोसावं लागलं. आपल्याच इंडस्ट्रीतील लोकांनी मला वाईट वागणूक दिली. त्यापैकी काही लोक तर माझं करिअर बरबाद करायला निघाले होते. पण तसं घडलं नाही. नशिबाची साथ नसेल तर आपलेच लोक आपले शत्रू बनतात.”

आता मी पार्ट्या झोडतो, दारू पितो, अन्‌ स्मोकिंगही करतो…
आता आपण चांगलेच व्यवहारी बनलो आहोत, असं गोविंदा म्हणतो. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेत नाही. आता आपण तद्दन व्यावसायिक झालो असल्याची कबुली त्याने दिली आहे. ”आता मी अधिकच भ्रष्ट आणि कडवट बनलो आहे. आजकाल पार्ट्या झोडतो, मस्त दारु पितो व सिगारेटी ओढतो. आधीचा गोविंदा खूपच पवित्र होता. माझा हळवा स्वभाव कामाच्या आड येत असे. पण आता मी अजिबात हळवा राहिलो नाही. आता सर्व गोष्टींकडे मी प्रोफेशनल पद्धतीने बिझनेस म्हणून पाहतो.”

सेक्स प्रदर्शन करायचे तर पॉर्न फिल्मस्‌ बनवा नं…
मी चित्रपट नाकारतो, अशा अफवा माझ्याबद्दल पसरविल्या गेल्या, असं गोविंदा म्हणतो. ”खरं म्हणजे, हे माझ्याविरुद्ध रचलेलं कट कारस्थान आहे. जे चित्रपट मी करू शकणार नाही, ते मला करण्यास सांगितले गेले. त्या चित्रपटात मोठ्या प्रमाणात सेक्स प्रदर्शन व हिंसाचार असायचा. असे चित्रपट मी करणार नाही, हे त्यांना कळत होतं. माझ्या त्या लोकांना असा प्रश्न आहे की, एवढा सेक्स जर तुम्हाला दाखवायचा आहे, तर सरळसरळ पॉर्न चित्रपट का नाही बनवत?”

मला ज्युनिअर आर्टिस्ट बनवू इच्छित होते…
एका ऑफिसात अशी चर्चा झाली होती की, गोविंदाला फक्त १५ सीन आणि २ गाणे द्या. नंतर एकच द्या आणि त्याचा भगवानदादा करून टाका. त्यानंतर ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम द्या. पण हे कारस्थान मी यशस्वी होऊ दिलं नाही. मीच त्यांचा बॅन्ड वाजवला. मी हिरो म्हणून परत आलो, अन्‌ चित्रपट निर्मिती देखील केली. या चित्रपटाला काही स्थान मिळालं नाही, हा वेगळा भाग झाला…

मी कोणाविरुद्ध बोलत नाही…
याच मुलाखतीत ‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेक बद्दल विचारलं, तर त्यानं काहीही सांगितलं नाही. ”मी कोणाविरुद्ध बोलत नाही. पण लोक मात्र माझ्याबद्दल बोलतात… ”, असं गोविंदा बोलला. पण या आधी एका मुलाखतीत गोविंदा दिग्दर्शक डेव्हीड धवन यांच्याबाबत बोलला होता. अन्‌ त्यांनी गोविंदा बद्दल चांगले उद्‌गार काढले नसल्याचाही त्याने दाखला दिला.

२०२१ साली मी नव्याने सुरूवात करणार…
या नवीन वर्षात आपण नव्याने सुरूवात करणार असल्याचे सांगून गोविंदा म्हणतो, ”२०२० साल मलाच नव्हे, तर सर्व जगाला कसे वाईट गेले, ते आपण जाणतो. आता आपल्याला ओटीटीच्या रुपाने एक नवा आणि चांगला मंच मिळाला आहे. मी ३-४ गोष्टी ऐकल्या आहेत. लवकरच त्यापैकी काही फायनल होईल…”

हृतिक रोशनची बायको सुझान खानचे उघडकीस आलेले प्रेमप्रकरण