Covid – 19 : इम्युनिटी वाढवण्यासाठी सरकार...

Covid – 19 : इम्युनिटी वाढवण्यासाठी सरकारचे आहार नियोजन ; हळदीचे दूध, डार्क चॉकलेटचा समावेश (Government Has Suggested A Diet Plan To Boost Natural Immunity: Dark chocolate, Haldi Doodh in list of foods)

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की, करोना संसर्गाचा धोका वाढतो, असे डॉक्टर्स वारंवार सांगत आहेत. म्हणूनच करोनाशी लढत द्यायची असेल तर ती शक्ती वाढली पाहिजे. योग, प्राणायाम पासून ते आयुर्वेदिक उपचार, काढा अशा अनेक गोष्टी यासाठी आजमावून पाहिल्या जात आहेत. दरम्यान सरकारने काही आहारविषयक सल्ले दिले आहेत. ज्यायोगे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

सरकारच्या ट्वीटर हॅन्डलवर एका बेसिक डाएट प्लॅनची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये स्नायूंना बळकटी देणे व एनर्जी लेव्हल व्यवस्थित राहील, अशा गोष्टींचा समावेश आहे. कोविड बाधित पेशंटस्‌ना हळदीचे दूध, डार्क चॉकलेट आणि प्रोटीन संपन्न आहार घेण्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारी आहार नियोजनाप्रमाणे –

-करोना पेशंटने रागी, ओटस्‌ असे तंतूमय पदार्थ घेतले पाहिजेत.

-चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया असे प्रोटीन संपन्न खाद्यपदार्थ आहारात घेतल्याने इम्युनिटी वाढते.

-अक्रोड, बदाम, ऑलिव्ह ऑईल अशा फॅटस्‌युक्त पदार्थांची पण शिफारस करण्यात आली आहे.

-आवश्यक ती व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससाठी रंगीत फळे व हिरव्या भाज्या, दिवसातून ५ वेळा खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

-तणावमुक्त व सकारात्मक राहण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन करा, असेही सांगितले आहे.

-दिवसातून एकदा तरी हळदीचे दूध पिणे, इम्युनिटी वाढविण्यासाठी आवश्यक आहे.

-करोना झालेल्या रुग्णाला वास येत नाही आणि तोंडात चवही राहत नाही. भूक मरते व अन्न चावून खाण्याची शक्ती उरत नाही. तेव्हा त्यांनी थोड्या थोड्या वेळाने नरम पदार्थ खावेत, असे सुचविण्यात आले आहे.

-आमचूर खावे, तसेच आपल्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायामही करावेत.

-योग, प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम यांनी फायदा होईल.