अलविदा केके! सेल्समन ते बॉलिवूडचा टॉप गायक; असा...

अलविदा केके! सेल्समन ते बॉलिवूडचा टॉप गायक; असा झाला केकेचा जीवनप्रवास ! (Goodbye KK! From Salesman To Top Singer Of Bollywood- Top Lesser Known Facts KK)

प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर केकेंचं (Singer Kk) निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. त्यामुळं गायन विश्वातील आणखी एक सितारा हरपला आहे. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यानं गायन विश्वावर पुन्हा एकदा शोककळा पसरलीय. मंचावर गाता गाता आपणास मृत्यू यावा, अशी प्रत्येक गायकाची इच्छा असते, आणि तसंच झालं. परंतु केकेचा मृत्यू खरंच सगळ्यांना चटका लावून गेला.

केकेंनी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. ते त्यांच्या पिढीतील सर्वात अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. परंतु केकेंचा येथपर्यंतचा प्रवास सरळ आणि सोपा नव्हता. त्यांना त्यांच्या आयुष्यात बराच संघर्ष करावा लागला आहे. बॉलिवूडमध्ये गायक म्हणून ओळख मिळण्यापूर्वी त्यांनी आठ महिने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सेल्समनची नोकरी केली. प्रेमाखातर त्यांनी ती नोकरी स्वीकारली होती, पण ते काही वेगळे करण्यासाठी जन्मले होते. त्यामुळे नोकरीत त्यांचे मन रमले नाही.

लहानपणापासूनच ते संगीतात करिअर करु इच्छित होते आणि किशोरदांचे जबरदस्त चाहते होते. किशोर कुमार यांच्याप्रमाणेच केकेंनी संगीताचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नव्हते. गाणं ऐकून ते शिकत गेले. गाण्याची देणगी त्यांना जन्मतः प्राप्त होती.

कृष्णकुमार कुन्नाथ असं त्यांचं पूर्ण नाव आहे. २३ ​​ऑगस्ट १९६८ त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे शिक्षण दिल्लीमध्ये झाले. तेथेच त्यांनी ग्रुप बनवून जिंगल्स बनविण्यास सुरुवात केली. केके यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, एका कार्यक्रमामध्ये हरिहरण यांनी त्यांना पाहिले आणि मुंबईस येण्यास प्रेरित केले होते.

त्यानंतर केके यांनी मुंबई गाठली. येथे त्यांनी जवळपास ३५०० जिंगल्स बनवल्या. त्यांच्या पल या अल्बमने त्यांना खास ओळख दिली. त्यांनी ‘प्यार के पल’ हे गाणं गाऊन प्रत्येक तरुणाच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं. 1999 मध्ये आलेल्या ‘पल’ या अल्बमला संगीतप्रेमींसोबतच संगीत तज्ञांनी भरभरून दाद दिली.

‘प्यार के पल’ नंतर केकेंचं ‘यारों’ हे गाणंही खूप गाजलं. कित्येक दशकांपूर्वी गायलेलं केकेंचं हे गाणं आजही मैत्रीचं उदाहरण देण्यासाठी गुणगुणलं जातं. त्यानंतर गुलजार यांच्या माचिस चित्रपटापासून त्यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. या चित्रपटातील छोड आए हम वो गलियां या गाण्याला त्यांनी आवाज दिला.  

केके यांचं हम दिल दे चुके सनम मधलं, तडप तडप के इस दिल.. (Tadap Tadap Ke Is Dil) हे गाणं तर तुफान गाजलं. क्वचितच कोणी असेल, ज्यानं हे गाणं ऐकलं नसेल. हे गाणं ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. इतकं ते सुंदर गायलं गेलंय. त्यानंतर केके यांना मागे वळून पाहावं लागलं नाही. त्यांनी दस बहाने, आंखों में तेरी अजब सी अजब सी अदाएं हैं, खुदा जाने और दिल इबादत कर रहा है यांसारखी अनेक हिट गाणी गायली.

केकेंनी आपल्या कारकिर्दीत सर्व प्रकारची गाणी गायली, चाहत्यांचे भरघोष प्रेम मिळवले. परंतु इतकी हीट गाणी गाऊनही केकेंना त्यांच्या हक्काचा पुरस्कार मिळाला नाही. आज बॉलिवूडपासून चाहत्यांपर्यंत सर्वच जण साश्रू नयनाने त्यांना श्रद्धांजली देत आहेत…. अलविदा केके! कायम स्मरणात राहाल.