या चांगल्या सवयींनी तुमचे रुप खुलवा! (Good Habi...

या चांगल्या सवयींनी तुमचे रुप खुलवा! (Good Habits Can improve Your Looks)

जसजसं वय वाढत जातं तसं आपल्या त्वचेवरून लोकांना आपल्या वयाचा अंदाज येऊ लागतो. काही जणांची त्वचा वय होऊनही सतेज व तरुण राहते तर काहींची अकाली सैल पडते. निस्तेज बनते. खरं म्हणजे त्वचेचं सौंदर्य टिकवणं हे आपल्या हातात असतं, परंतु त्यासाठी तरुणपणीच प्रयत्न करावे लागतात. एकदा त्वचा डल झाल्यानंतर ती पूर्ववत होण्यासाठी खूप प्रयत्न करूनही  फारसे यश मिळत नाही. आपल्या काही वाईट सवयीच आपल्या सौंदर्याला बाधा आणण्यास कारणीभूत असतात. आपण त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. असे न करता, चांगल्या सवयी जोपासा नि तुमचे रुप खुलवा !
– सगळ्यात महत्त्वाचं रात्री उशिरापर्यंत जागं राहून नेट सर्फिंग करणं, टी.व्ही. पाहणं, वाचन करणं बंद करा. योग्य वेळी झोपा आणि पहाटे लवकर उठा. झोप पूर्ण झाल्यास, त्वचा तजेलदार दिसते तसेच डोळ्यांभोवती काळी वर्तुळेही येत नाहीत.
– वर्तमानपत्र, लेख वा मासिक वाचायचे असल्यास ते मोबाईल वा लॅपटॉपवर वाचू नका. यामुळेही डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येऊ शकतात.
– झोपल्यानंतर सतत कुस बदलू नये. कुस बदलल्यामुळे चेहर्‍यावर सुरकुत्या पडतात. तेव्हा शक्यतो सरळ ताठ झोपण्याचा प्रयत्न करावा.

– थंडी, ऊन, पाऊस कोणताही ऋतू असो घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर अवश्य करा. दर तीन-चार तासानंतर ते परत लावा. यामुळे सनटॅन सोबतच प्रिमॅच्युअर एजिंगपासून वाचता येईल. सूर्याच्या अति तीव्र किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचेवर काळे डाग अन् सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक आहे.
-भारतात राहणार्‍यांनी कमीत कमी 30 एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरावे.

-चेहर्‍यास सनस्क्रीन लावताना डोळ्यांच्या आजूबाजूला, खाली व कोनामध्येही हलक्या हाताने सनस्क्रीन लावा. तसेच संपूर्ण शरीरास सनस्क्रीन लावा.
-मेकअप करताना ब्रशचा वापर करा. बोटांनी लावल्यास त्वचेवर अधिक दाब पडतो, त्वचा लालसर होते आणि मेकअप देखील व्यवस्थित ब्लेंड होत नाही.

-मेकअप ब्रशची स्वच्छता, दर्जा यावर लक्ष द्या. वेळोवेळी ब्रश बदला. खूप काळ एकच ब्रश वापरत राहिल्यास त्यावर बॅक्टेरिया जमा होतात जे आपल्या त्वचेचे नुकसान करू शकतात.
– इतरांनी वापरलेले मेकअप प्रॉडक्ट चुकनूही वापरू नका तसेच तुमचे स्वतःचे मेकअप किट कोणासोबत शेअर करू नका. त्यामुळे अ‍ॅलर्जी, इन्फेक्शन, त्वचा रोग होण्याची शक्यता असते.
– एक्सपायरी झालेली सौंदर्यप्रसाधने कितीही महाग असली तरी कृपया ती वापरू नका.
– अँन्टी एजिंग क्रीम, मॉयश्चरायजर, व्हाइटनिंग क्रीम वा सीरम चेहर्‍याला लावताना मान व गळ्यालाही लावा. बर्‍याच महिला आपल्या चेहर्‍याची काळजी घेताना दिसतात आणि मान व गळ्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे चेहरा आणि मानेच्या रंगामध्ये फरक दिसून येतो. यामुळे मानेची त्वचा लवकर कोरडी पडते आणि तेथे सुरकुत्या येतात.
– तुमचं वाढतं वय हे तुमच्या चेहर्‍यापेक्षाही तुमच्या हाता-पायाच्या रुक्ष त्वचेवरून लगेच दिसून येते. त्यामुळे अधूनमधून ब्युटीपार्लरमध्ये गेल्यानंतर चेहर्‍याच्या फेशिअल सोबत पेडिक्योर- मेनीक्योर देखील करून घ्या.

– घरच्या घरी स्क्रब आणि पॅक तयार करून हातापायांना लावता येतो. याच्या नियमित वापराने हातापायांची त्वचादेखील निरोगी राहते.
– त्वचेला नियमितपणे मॉइश्चराइज करा. आपापल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायजर निवडा आणि रोजचं स्किन केअर रुटीन फॉलो करा.
– डोळ्यांसाठीचं क्रीम, नाइट क्रीम यांचा अवश्य वापर करा. आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील सर्व मांसपेशी रिलॅक्स असतात. त्यामुळे अशा क्रीम्सचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

-आय क्रीम नियमित लावली तर ती अतिशय प्रभावी ठरते. त्यासाठी नियम घालून घ्या. रात्रीचे जेवण जेवण्यापूर्वीच चेहरा स्वच्छ धुवून आय क्रीम लावून ठेवा.
– केसांचीही नियमित व योग्य काळजी घेतली पाहिजे. केसांची चमक, पोत यावरून आपण निरोगी आहोत की नाही हे समजतं. आपल्या केसांच्या प्रकाराप्रमाणे शाम्पूचा वापर करा, नियमितपणे कंडीशनर लावा. अन् हेअर स्पा करून घ्या.

-हेअर कलर आणि हाईलाईट ही आजच्या काळाची गरज आणि सध्याचे फॅशन स्टेटमेंट आहे. नियमित केसांना तेल लावणं, मसाज करणं, सीरम तसेच हेअर पॅक लावून आपण आपल्या केसांना कमजोर, रुक्ष, निस्तेज आणि दुतोंडी होण्यापासून वाचवू शकतो.
– हेअर कलरमुळे साईड इफेक्ट होऊ शकतात. तसेच स्ट्रेटनिंग, पर्मिंग, आयर्न करण्याचे टाळा.
– केस आणि त्वचा यांस शक्य तेवढे केमिकलयुक्त पदार्थांपासून दूर ठेवा.
– केसात कोंडा होण्याची समस्या असेल तर त्यावर उपाय करा. तेल लावून तसेच हेअर मास्क वापरून कोंडा घालवता येतो. कोंड्यामुळे फक्त केसांचे नुकसान होते असे नाही तर कपाळ आणि चेहर्‍यावर मुरमं येण्यासही काही वेळा केसातील कोंडा कारणीभूत असतो.

-त्वचेसाठी वापरली जाणारी प्रसाधने हा वायफळ खर्च नसून ही गुंतवणूक आहे. तेव्हा चांगल्या दर्जाची प्रसाधने वापरा.
– जेवणात मीठाचं प्रमाण कमी करा. जास्त मीठामुळे शरीरात वॉटर रिटेनशनची समस्या निर्माण होते. यामुळे शरीर फुगलेले दिसते. तसेच डोळेही सुजल्यासारखे (पफी) दिसतात.
– त्वचेची लवचिकता अर्थात लचक आणि चमक व्यवस्थित राहावी यासाठी 8-10 ग्लास पाणी नियमित प्या. यामुळे शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा हायड्रेटेड राहते.
– सकाळची न्याहारी अवश्य करा. न्याहारीत ओट्स, कॉर्नफ्लेक्स, नट्स, मोड आलेली कडधान्ये, ताजी फळं असू द्या. दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या व दही जरुर खा.
– शिळं अन्न आणि जंक फूड खाऊ नका. त्याने लठ्ठपणा तर येतोच अन् त्वचेसही ते नुकसान करू शकते.
– नियमित व्यायामाची सवय लावा. यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहाल, तुमचे रक्ताभिसरण व्यवस्थित होईल आणि चेहर्‍यावर तेज येईल.

-सकारात्मक विचार करा आणि खळखळून हसा. त्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन जाईल. रक्ताभिसरण वाढेल आणि सौंदर्यही.
– ताणतणावापासून दूर राहा. नेहमी सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत राहा. कारण तणावामुळे लवकर वृद्धत्त्व येतं.
– कपाळाला आठ्या घालून, नाक मुरडून, भुवया उंचावून बोलण्याची सवय सोडून द्या. त्यामुळे अकाली सुरकुत्या पडतील.
– दिवसभरात 30 मिनिटं ताज्या हवेत राहा. नैसर्गिक तजेलपणाचा अनुभव घ्या. त्यामुळे डोळ्यांची चमक वाढेल आणि तुम्ही निरोगी राहाल.

– रोज प्रार्थना करा. यामुळे मानसिक शांती, शक्ती आणि ऊर्जा प्राप्त होते.
-फेस योग तसेच फेशिअल एक्सरसाइज करा. त्यामुळे चब्बी चिक्स, डबल चिन चा सामना करावा लागणार नाही.

-मनमोकळेपणाने हसा, तुमच्या निखळ हास्यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसता. हे सौंदर्य कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांनी मिळवता येणार नाही