गोव्याच्या देवळात सजतात जाईचे अलंकार(Goddess In...

गोव्याच्या देवळात सजतात जाईचे अलंकार(Goddess In Goa Temple Is Garlanded With Jasmine Flowers:They Call It Jasmine Jewellery)

श्रावणात गोव्यात छान जाई फुलते. पूर्ण गावात जाई बहरली असते. गावातल्या प्रत्येक झाडावरची जाई वाट शोधत शोधत जवळच्या देवळात येते. देवळात अलंकार पूजा घातली जाते. अलंकार कसले तर ते जाईचे. अख्खे देऊळ जाईने सजवले जाते. घराघरावरच्या जाई मोठ्ठाले नशीब काढतात. शांतादुर्गा, म्हाळसा, कामाक्षी, महालक्ष्मी देव्या सुंदर जाईने नटवल्या जातात. रात्री गावकरी आपल्या घराच्या दाराच्या जाई देवळात पोहोचवतात आणि लागोलग देवालयातली कार्यस्थ मंडळी अवधी न दवडता जाई देवीला देवळाला सजावयला घेतात.

हजारो कलासक्त बोटे जाईचा अलंकार बांधायला घेतात. उत्तर रात्री कधीतरी सजवणूक पूर्ण होते, आणि रात्रीच्या चांदण्या प्रकाशात जाईची फुले चमकून उठतात. रात्र उलटत जाते, फुले फुलत जातात देवीच्या भोवती हा जाईचा चांदणहार फुलून निघतो. देवीचा मुखवटा अधिकाधिक देखणा दिसत जातो.

सूर्य येऊ होतो, त्या आधी आपली किरणं तो फुलात मिसळतो. आधी चंदेरी दिसणारी फुले आता वेगळी दिसू लागतात. किरणं फुलातून ओवली जातात आणि देवीला सुंदर जाई फुलांचा हार होतो. देवींची फुले देवीच्या सानिध्यात येतात. देवाने फुलवलेल्या फुलांचा यथोचित मानसन्मान ठेवला जातो. श्रावणात घरी दारी जशी एक तरी सत्यनारायण पूजा होते, तशीच गोव्याच्या देवळात एक तरी जाईची अलंकार पूजा होतेच होते.खरं तर अलंकार पूजा ही देवींची होते; पण म्हणणारे म्हणतात जाईची पूजा झाली. त्या जाईच्या अलंकार पूजेच्या निमीत्ताने देऊळ त्या निमित्ताने का होईना त्या दिवसाखातीर फुलांचे देऊळ होऊन जाते. देवीचे देऊळ; जाईच्या फुलांचे देऊळ.

सौजन्य-केदार अनंत साखरदान्डे (फेसबुक)